"नातीगोती' मध्ये उलघडले मतीमंद अन् त्यांच्या पालकांचे भावविश्व

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

मतिमंद मुलांचं भावविश्‍व आजवर अनेक चित्रपटातून मांडलं गेलं. "चौकट राजा' असो किंवा "आम्ही अस लाडके' असे चित्रपट असो किंवा जयवंत दळवी यांचे हेच "नातीगोती' नाटक. मतिमंदत्वावर भाष्य करताना पालकांची होणारी परवड आणि त्यातही नाती प्रेमानं जपत सुरू असलेला हा सारा प्रवास नाटकातून उलगडत जातो.

कोल्हापूर - नेहमीच कौटुंबिक किंबहुना नातेसंबंधावरचं नाटक घेऊन स्पर्धेत उतरणाऱ्या सेनापती कापशी येथील श्री राणी अहिल्याबाई वाचन मंदिर संस्थेच्या टीमनं बुधवारी जयवंत दळवी लिखित "नातीगोती' या नाटकाचा प्रयोग सादर केला. मतिमंद मुलगा आणि त्याच्या पालकांचं भावविश्‍व उलगडताना नात्यांचा सुरेख गोफ विणण्याचा प्रामाणिक प्रयत्न या टीमनं केला. विशेष म्हणजे मतिमंद किंवा विशेष मुलांचा सांभाळ अगदी प्रेमानं करणाऱ्या तमाम पालकांना हे नाटक या टीमनं समर्पित केले. 

मतिमंद मुलांचं भावविश्‍व आजवर अनेक चित्रपटातून मांडलं गेलं. "चौकट राजा' असो किंवा "आम्ही अस लाडके' असे चित्रपट असो किंवा जयवंत दळवी यांचे हेच "नातीगोती' नाटक. मतिमंदत्वावर भाष्य करताना पालकांची होणारी परवड आणि त्यातही नाती प्रेमानं जपत सुरू असलेला हा सारा प्रवास नाटकातून उलगडत जातो. मराठी रंगभूमीवर पहिल्यांदा हे नाटक आलं आणि त्यावेळी अनेक बक्षिसांची लयलूट या नाटकानं केली. अर्थात तगडी स्टारकास्ट या नाटकात होती. मात्र, त्यानंतरही हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेच्या निमित्ताने कोणत्या ना कोणत्या केंद्रावर हमखास होतेच. नाटकाचे दिग्दर्शक मिलिंद चिक्कोडीकर यांची मुलगी भाग्यश्री ही मतिमंद आहे. तिचा अगदी प्रेमाने आम्ही सांभाळ करत असून अशा तमाम पालकांना सलाम करण्यासाठी हे नाटक स्पर्धेत सादर करत असल्याचे ते आवर्जुन सांगतात. 

हृदयस्पर्धी प्रयोग

मध्यमवर्गीय काटदरे कुटुंब आणि या कुटुंबात जन्माला आलेला बच्चू हा मतिमंद. बच्चू सोळा वर्षांचा झाला आहे आणि याच मध्यवर्ती कथेवर नाटक बेतले आहे. आई शैला आणि वडील काटदरे आपापल्या नोकऱ्या इमाने-इतबारे करत असतात. पण, त्यांच्या मनात आपल्या पश्‍चात बच्चूचे काय होणार, हा सतत सतावणारा प्रश्‍न. मात्र, त्यांनी वास्तव स्वीकारलेले असते आणि बच्चूसाठी म्हणून एखादा ट्रस्ट स्थापन करण्याचा त्यांचा संकल्प. त्यासाठी आपल्या साऱ्या इच्छा, आकांक्षांना तिलांजली देत पै-पै ही मंडळी जमवत असतात. एकूणच साऱ्यांच्याच काळजाला हात घालणारं हे नाटक. प्रेमाची विलक्षण नाती आणि त्यातून मग होणारी मनाची घालमेल असा हा हृदयस्पर्शी प्रयोग स्पर्धेत अनुभवायला मिळाला. 

पात्र परिचय...

सायली कुलकर्णी - प्रभावळीकर (मिसेस काटदरे), मिलिंद चिक्कोडीकर (मिस्टर काटदरे), प्रा. विजय मेस्त्री (पंडित), धनाजी शिरगुप्पीकर (गायतोंडे), यशवंत बुवा (व्यंकटरमण), अवधूत आठवले (बच्चू). 
दिग्दर्शक - मिलिंद चिक्कोडीकर 
नेपथ्य -  प्रवीण पाटील, विठ्ठल आणुसे 
प्रकाश योजना - अभिजित आठवले 
संगीत - राम चिक्कोडीकर, आनंदराव जाधव 
वेशभूषा -  गुरूप्रसाद जोशी, अरुण घोरपडे 
रंगभूषा - सदानंद सूर्यवंशी 
निर्मितीप्रमुख - धनश्री चिक्कोडीकर, स्वाती आठवले 

आज रंगणार "हत्ती इलो रे' 

वारणानगर येथील प्रज्ञान कला अकादमीची टीम स्पर्धेत आज (शुक्रवारी) अजय कांडर लिखित "हत्ती इलो रे' या नाटकाचा प्रयोग सादर करणार आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात सायंकाळी सातला प्रयोग होईल. श्री. कांडर लिखित "हत्ती इलो रे' या दीर्घ कवितेचे हे नाट्य रूपांतर असून जागतिक पातळीवर आजवर झालेल्या राजकीय बदलांचा एकूणच समाजव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांचा शोध या नाटकातून घेतला आहे.  

राज्य नाट्य स्पर्धेच्या बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा -

‘तुघलक’ नाटकाचा देखणा प्रयोग 

‘विच्छा माझी पुरी करा’ तून चंदगडची पोरं हुश्शारचा संदेश 

‘लग्न शांतूच्या मेहुणीचं’ अस्सल ग्रामीण बाजातील नाटक 

‘थिंक पॉईंट’ नाटकात घेतलाय या प्रश्नांचा वेध 

एका फक्कड प्रयोगाची अनुभूती नटरंगने दिली 

राज्य नाट्य स्पर्धेत प्रथमच यांची दमदार एंट्री

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Natigoti drama present in State Drama Competition Kolhapur