esakal | सोशल मीडियावरून ‘रंगभूमी सुरू करा’ अभियान
sakal

बोलून बातमी शोधा

सोशल मीडियावरून ‘रंगभूमी सुरू करा’ अभियान

सोशल मीडियावरून गावागावांतील रंगकर्मी विविध फोटो, व्हिडिओ आणि मिम्सच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

सोशल मीडियावरून ‘रंगभूमी सुरू करा’ अभियान

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोनाच्या महामारीत राज्यभरातील रंगभूमीवरील सर्वच प्रयोग बंद झाले. दोन महिन्यांतील काही प्रयोगांचा अपवाद वगळता एकूणच रंगभूमी थांबली असून, आता किमान पन्नास लोकांसाठी का होईना ‘रंगभूमी सुरू करा’ या मागणीने जोर धरला आहे. त्यासाठी सोशल मीडियावरून गावागावांतील रंगकर्मी विविध फोटो, व्हिडिओ आणि मिम्सच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

हेही वाचा: भारीच ! कोल्हापूर जिल्ह्यातील वारकऱ्यांची पंढरीत होणार मोफत सोय

प्रसिध्द दिग्दर्शक अतुल पेठे, अभिजित झुंजारराव आदी मंडळींनी चार दिवसांपूर्वी याबाबतचे आवाहन सोशल मीडियावरून केले आणि बघता बघता ही मोहीम राज्याच्या कानाकोपऱ्यात पोचली. जिल्ह्यातील रंगकर्मींनी याच मोहिमेचा भाग म्हणून आता अभिव्यक्त व्हायला सुरवात केली आहे. या साऱ्या भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोचवल्या जाणार असून, लवकरात लवकर सकारात्मक कार्यवाहीची मागणी होत आहे.

हेही वाचा: सोमवारपासून कोल्हापूर होणार अनलॉक; प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

‘‘आम्ही सारे नाटक करणारे कलावंत आहोत. आम्हाला पूर्ण कल्पना आहे की सारे जग गेले दीड वर्ष अतिशय संकटातून जात आहे. विविध क्षेत्रांसमोर जीवघेणे प्रश्न कोरोनाने उभे केले आहेत. या संकटातून बाहेर पडण्याकरता आम्हीही आपापल्या कुवतीने मदत केली आहे. पहिली लाट ओसरल्यावर मराठी रंगभूमीवर काही लोकांनी सर्व काळजी घेऊन नाट्यप्रयोग केले. सभा, समारंभ, मंडई, हॉटेल अशा जागांपेक्षा 'थिएटर' ही अधिक सुरक्षित जागा आहे, याचा आम्ही अनुभव घेतला आहे. त्यामुळे निदान ५० लोकांकरता छोट्या स्वरूपातील प्रयोग करायला परवानगी द्यावी. त्यामुळे समाजात मनस्वास्थ्य टिकायला मदत होईल, अशा आशयाचे निवेदन या माध्यमातून केले आहे.’’

हेही वाचा: कोल्हापूर जिल्ह्यातील 78 गावात 100 टक्के लसीकरण पूर्ण

स्थानिक रंगभूमीवर

गेली दीड वर्षे स्थानिक रंगभूमीही पूर्णपणे ठप्प आहे. पहिली लाट ओसरल्यानंतर कोरोना नियमांचे पालन करत मार्चमध्ये ‘गगन दमामा बाज्यो’ या नाटकाचा एक प्रयोग संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात झाला, तर सर्जनशाळेतर्फे भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्रात काही प्रयोग झाले. मात्र, त्यानंतर पुन्हा लॉकडाउन जाहीर झाले आणि सर्वच उपक्रम थांबले.

loading image