esakal | बेळगाव: पहिल्‍याच प्रयत्‍नात सत्ता, भाजपची जोरदार मुसंडी
sakal

बोलून बातमी शोधा

bjp

बेळगाव: पहिल्‍याच प्रयत्‍नात सत्ता, भाजपची जोरदार मुसंडी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव: महापालिका निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले. ५८ पैकी ३५ जागांवर विजय मिळवत भाजपने महापालिकेत ‘कमळ’ फुलविले. तब्बल २५ वर्षांनंतर भाजपने पहिल्यांदा पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली. त्यानुसार सत्तेच्या जादूई आकड्याला गवसणी घातली आहे. हा महाराष्ट्र एकीकरण समितीला धक्का मानला जात आहे.

हेही वाचा: बेळगाव निवडणुकीत 40 पराभूत उमेदवार जाणार न्यायालयात

बेळगाव महापालिका निवडणुकीचा सोमवारी (ता. ६) लागलेला निकाल अनपेक्षित लागला. महाराष्ट्र एकीकरण समितीला सर्वाधिक जागा मिळतील, तर भाजप दुसऱ्या स्थानी राहील, अशी अटकळ बांधली जात होती. तसेच त्रिशंकू स्थिती उद्‍भविण्याची शक्यताही वर्तविली जात होती. परंतु, भाजपने राजकीय विश्‍लेषकांचे अंदाज फोल ठरवत एकहाती सत्ता मिळविली.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे अनेक वर्षांपासून महापालिकेत वर्चस्व होते, पण या निवडणुकीत भाजपने सत्तांतर घडविले. बेळगाव महापालिकेत सत्तांतर घडविल्यामुळे भाजपची आणि पर्यायाने आमदार अभय पाटील आणि आमदार अनिल बेनके यांची ताकद वाढली असल्याचे मानले जात आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी अस्मिता आणि भाषेचा मुद्दा उचलून धरला होता.

हेही वाचा: सदाभाऊ खोत यांच्या मुलाकडून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्याला मारहाण

तर भाजपने विकासासाठी मत देण्याचे आवाहन करत जनतेला साद घातली होती. त्यावर जनतेने विश्‍वास दाखवत भाजपच्या बाजूने कौल दिला. बेळगाव विधानसभेच्या निवडणुकीला जवळपास दीड वर्ष शिल्लक आहे. महापालिकेतील यशाचा नक्कीच फायदा भाजपला मिळेल, असे मानले जात आहे. लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजप उमेदवार मंगल अंगडी यांना निसटता विजय मिळाला. त्यामुळे मतदारांचा कल महाराष्ट्र एकीकरण समितीकडे असल्याचे वाटत होते; परंतु भाजपने विजयाचा तुरा शिरपेचात खोवला आहे.

मतविभागणीचा फायदा

बेळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे २३ अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती; मात्र ही यादी घोषित करताना रिंगणातील म. ए. समितीचे पदाधिकारी किंवा मराठीभाषक उमेदवारांचा अर्ज मागे घेण्यासाठी अपेक्षित प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये मराठी विरुध्द मराठी लढ्याचा फायदा भाजपला झाल्याचे दिसून आले आहे.

loading image
go to top