

Kolhapur Paper Leak
esakal
गडहिंग्लज : पेपर फुटीची एकापाठोपाठ एक प्रकरणे आणि त्या पाठोपाठ विद्यार्थ्यांची आंदोलने याचा भलताच धसका शासकीय यंत्रणेने घेतल्याचे दिसत आहे. आता शासकीय रेखाकला परीक्षेच्या पेपर फुटीच्या धास्तीने प्रश्नपत्रिका चक्क फळ्यावर लिहिण्याची सक्ती केली आहे. कला संचनालयाचा हेतू चांगला असला, तरी अंमलबजावणीत अनेक अडचणी येण्याची शक्यता आहे.
कला संचालनालयाकडून दरवर्षी शासकीय रेखाकला परीक्षा घेतली जाते. यंदा २८, २९, ३० सप्टेंबर व १ आक्टोबरला ही परीक्षा होत आहे. इलेमेंटरी आणि इंटरमिजिएटसाठी प्रत्येकी चार पेपर होतात. यामध्ये स्थिर चित्र (वस्तू चित्र), स्मरण चित्र, संकल्प चित्र, भूमिती व अक्षरलेखन यांचा समावेश आहे. या परीक्षेत मिळणाऱ्या ग्रेडनुसार दहावी परीक्षेत गुणांचा लाभ मिळतो. तसेच करिअरच्या संधी उपलब्ध होत असल्याने या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे.
अलीकडच्या काळात नीटसह विविध परीक्षांच्या पेपर फुटीची प्रकरणे बाहेर आली. या प्रश्नावरून ‘जेन-झी’ने मोठ्या प्रमाणात आंदोलने उभारली. त्यापुढे सरकारलाही नमते घ्यावे लागले. या साऱ्याचा भलताच धसका शासकीय यंत्रणांनी घेतल्याचे दिसत आहे. रेखाकला परीक्षेचेही पेपर फुटतील याची धास्ती घेतली आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका न देता पर्यवेक्षकांनी ती फळ्यावर लिहिण्याची सक्ती केली आहे.
गोपनीयतेचा भंग होऊ नये, पेपर फुटू नये, हा कला संचालनालयाचा हेतू चांगला आहे; पण रोज दोन-दोन पेपर आहेत. त्यामध्ये एक तासाचे अंतर आहे. या एका तासात पर्यवेक्षकांनी परीक्षार्थींच्या उत्तरपत्रिका गोळा करून जमा करायच्या की, पुढील पेपरची प्रश्नपत्रिका फळ्यावर लिहायची हा प्रश्न आहे. प्रत्येक केंद्रात मोठे फळे असतीलच असे नाही. प्रत्येक पेपरसाठी वेगवेगळ्या सूचना आहेत. त्या लिहिण्यासाठी वेळ पुरेल का, हा प्रश्न आहे. शिवाय एकाच केंद्रावर मराठी, इंग्रजी, ऊर्दू माध्यमाचे विद्यार्थी असतील, तर भाषेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. दुर्गम भागातील केंद्रावर प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्याची अडचण येऊ शकते.
"रेखाकला परीक्षेचे शुल्क वाढविले आहे. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वेळेत मिळत नाहीत, यासह विविध प्रश्न आहेतच. त्यात आता फळ्यावर प्रश्नपत्रिका लिहिण्याच्या सूचना आल्या आहेत. गोपनीयता राखण्याचा हेतू चांगला असला, तरी यातून अनेक नवे प्रश्न निर्माण होणार आहेत. याचा विचार करून पूर्वीप्रमाणेच प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना द्याव्यात. "
- रमजान मुल्ला, सचिव, जिल्हा कला अध्यापक संघ
कला संचनालयानाच्या संकेतस्थळावरून ज्या-त्या दिवशीचा पेपर डाऊनलोड करून घ्यायचा आहे. दोन्ही पेपरच्या आधी चार तास हे संकेतस्थळ खुले होणार आहे. राज्यभरातून एकाच वेळी हे काम केले जाणार असल्याने सर्व्हर डाऊनचा तांत्रिक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी बाल चित्रकला परीक्षेवेळी कला शिक्षकांनी हा अनुभव घेतलेला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.