इन्कलाब झिंदाबाद...! गोविंद पानसरे जयंतीदिनी रंगला नाट्यप्रयोग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गगन दमामा बाज्यो

इन्कलाब झिंदाबाद...! गोविंद पानसरे जयंतीदिनी रंगला नाट्यप्रयोग

कोल्हापूर: भारतीय स्वातंत्र्याच्या धगधगत्या इतिहासातील शहीद भगतसिंग यांचा तितकाच धगधगता प्रवास आज ‘गगन दमामा बाज्यो’ या नाटकातून उलगडला. ‘माणसांची हत्या केली तरी त्यांचा विचार कधीच मरत नाही’ असा संदेश या नाटकाने दिला. ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या जयंतीनिमित्त येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीतर्फे या नाटकाचे आयोजन झाले. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात रंगलेल्या या प्रयोगाला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त हजेरी लावली. कोरोना नियमांचे पालन करतच प्रयोगाचे आयोजन झाले.

हेही वाचा: पालकमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ; धनंजय महाडिक यांचा आरोप

शहीद भगतसिंग यांच्या जीवनचरित्रातील विविध प्रसंग आणि लाईव्ह संगीत असा एकत्रित अनुभव या नाटकाच्या निमित्ताने मिळाला. शहीद भगतसिंगांच्या जीवनावरील अशा पध्दतीचे हे मराठीतील पहिलेच नाटक असून स्थानिक तीसहून अधिक कलाकार व तंत्रज्ञांनी हा दिमाखदार प्रयोग सादर केला. पीयूष मिश्रा यांच्या हिंदी नाटकाचा सतीश तांदळे यांनी अनुवाद केला असून शंतनू पाटील यांचे दिग्दर्शन होते. सतीश तांदळे (भगतसिंग), चैतन्य कुलकर्णी (राजगुरू), अक्षय पोळके (सुखदेव), उत्कर्ष केसरकर (यतींद्र दास), संग्राम देसाई (शिववर्मा), पार्थ कोठावळे (चंद्रशेखर आझाद) यांच्यासह सतरा कलाकारांनी हा प्रयोग रंगवला. लाईव्ह संगीत आणि प्रकाशाचा सुरेख मेळ साधत रंगलेल्या या प्रयोगाला टाळ्यांच्या गजरात रसिकांनीही ‘इन्कलाब झिंदाबाद' अशी उत्स्फूर्त दाद दिली. दरम्यान, चिल्लर पार्टीचे मिलिंद यादव यांनी स्वागत केले.

हेही वाचा: एसटी सुरू होण्याच्या प्रतीक्षेने कोल्हापूरात प्रवासी बस स्थानकातच

चळवळ व्यापक व्हावी...

ज्येष्ठ अभिनेते दिलीप बापट यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रयोगाला प्रारंभ झाला. चिल्लर पार्टी ही १० वर्षे सुरू असलेली चळवळ येत्या काळात अधिक व्यापक होणे गरजेचे आहे. शालेय विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी या चळवळीतर्फे विनामूल्य सिनेमे व विविध उपक्रम राबवले जातात. आता तर वाड्या-वस्त्यांवर जावून तेथील मुलांसाठी सिनेमे दाखवले जात आहेत. या चळवळीला समाजातील सर्वच घटकांनी पाठबळ दिले पाहिजे, असे सांगून श्री. बापट यांनी स्वतः दहा हजार रूपयांचा निधी चळवळीसाठी जाहीर केला.

loading image
go to top