Kolhapur Flood Update : कळंबा १८ फुटांवरच, जिल्ह्यात महापुराची स्थिती; तरीही तलाव न भरल्याने भीती

जिल्ह्यात महापुराची स्थिती; तरीही तलाव न भरल्याने भीती
कळंबा तलाव
कळंबा तलाव esakal

कळंबा : पाणलोट क्षेत्रात बांधकामाला दिलेली परवानगी, त्यातून पडलेले प्लॉट आणि या प्लॉटधारकांनी अडवलेले जलस्रोत यामुळे जिल्ह्यात एकीकडे महापुराची स्थिती असूनही कळंबा तलाव मात्र अजून १७ फुटांवर आहे. गेल्यावर्षी याच दिवशी कळंबा तलाव ओसंडून वाहत होता. सांडव्यावरून पाणी वाहत होते, मग यावर्षीच तलाव अजून भरला का नाही, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

कात्यायनी डोंगरामधून उगम पावलेली जयंती नदीसह अनेक ओढे, नाले पावसाळ्यात दुथडी भरून वाहतात. याच नाल्यांचे पाणी येऊन कळंबा तलावाला मिळते. त्यामुळे तलावाची पाणी पातळी वाढते; मात्र अलीकडेच तलावाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये शासनाने पन्नास एकरहून अधिक क्षेत्रामध्ये (पिवळा पट्टा) रहिवासी झोन टाकल्यामुळे शेतीमध्ये प्लॉट पाडले जात आहेत.

त्यामुळे या परिसरात दिवसेंदिवस नागरी वस्ती व औद्योगिक क्षेत्राचे प्रमाण वाढत आहे. त्यातून तलावाला मिळणाऱ्या अनेक ओढ्या नाल्यांचे नैसर्गिक जल स्रोतांचे मार्ग बदलले आहेत, तर काही जलस्रोतामध्ये अडथळे आल्याचे चित्र आहे. त्याचा परिणाम कळंबा तलावाच्या पाणीसाठ्यावर झाला आहे.

कळंबा तलाव
Kolhapur Flood Update : धरणे भरली नाहीत, मग पूर का आला ?

याचा कळंबा गावच्या पाणीपुरवठ्यावर गंभीर परिणाम होणार आहे. तलावातील पाणी उपसा बंद झाल्यामुळे ऐन पावसाळ्यामध्ये गावाला टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने पर्यायी व्यवस्था म्हणून गाव विहीर व कूपनलिकातून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे.

कळंबा तलावातील पाणीसाठा पावसाच्या पाण्यावरती अवलंबून आहे. यंदा जून महिना कोरडा गेला. जुलैमध्येही गेले वीस दिवस अनियमित पाऊस पडला आहे, परंतु गेल्या पाच-सहा दिवसांपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे तलावाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून, पातळीत दहा फुटांनी वाढ झाली आहे.

कळंबा तलाव
Kolhapur Rain Alert : भूस्खलनाची भीती पन्हाळ्यात काळीज चिरतेय...

एकीकडे पंचगंगेच्या पातळीत मोठी वाढ होत असताना गेल्यावेळी ओसंडून वाहणाऱ्या कळंबा तलावाच्या पातळीत तुलनेने पाणीसाठा कमी झाला आहे. ही धोक्याची घंटा आहे. पुढील दहा ते पंधरा दिवसांमध्ये पावसाचा जोर असाच राहिला तर तलाव तुडुंब भरून पाणी पातळी २७ फुटांवर जाईल; पण तलावाला मिळणारे नैसर्गिक जलस्त्रोतच रोखले असतील किंवा त्याचा मार्ग अडवला असेल तर कळंबा तलावातील पाणीसाठ्यावर त्याचा विपरित परिणाम शक्य आहे.

११० एकर पाणलोट क्षेत्र

कोल्हापूर इचलकरंजी प्रादेशिक उद्यानाअंतर्गत कळंबा तलावाचे ११० एकर पाणलोट क्षेत्र राखीव ठेवले होते. तलावाचे कवच कुंडल म्हणून या क्षेत्राला संबोधले जात होते. मात्र, शासनाने या क्षेत्रामध्ये ५० एकरहून अधिक क्षेत्रामध्ये निवासी झोन टाकल्यामुळे येथील शेत जमिनीचे प्लॉट पाडले जात आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील अंतर्गत विकासकामे करण्यासाठी कळंबा तलावाला मिसळणाऱ्या नैसर्गिक जलस्रोताचे प्रवाह बदलले आहेत. त्यामुळे तलावाच्या भरतीला विलंब होत असल्याचा सूर आहे.

कळंबा तलाव
Kolhapur Rain Flood Update : पंचगंगा नदीचे पाणी इशारा पातळीवर, ३ रेस्क्यू पथके, ७२ अग्निशमन जवान; १२ बोटी तैनात

कळंब्याचा रंकाळा तलाव होणार?

कळंबा तलावाच्या परिसरामध्ये नागरी वस्ती होणार आहे. तसेच अनेक उद्योग व्यवसाय उभारले जाणार आहेत. त्यामुळे येथील तैलमिश्रित व सांडपाण्याचा लोंढा तलावात सरळ मिसळणार आहे. त्यामुळे तलावातील जलसाठा मोठ्या प्रमाणात प्रदूषित होऊन रंकाळ्यासारखी त्याची अवस्था होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

कळंबा तलावाच्या परिसरामध्ये बेकायदेशीर बांधकाम, हॉटेल व्यवसाय व इतर उद्योग सुरू करून तलाव प्रदूषित करणाऱ्या घटकावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत संबंधितांना ग्रामपंचायत प्रशासनाकडून नोटीस पाठवली असून, न्यायालयीन कारवाईसाठी प्रयत्न सुरू आहेत.

-सुमन गुरव, सरपंच, दिलीप तेलवी, ग्रामविकास अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com