

Kolhapur Ganesh Visarjan
esakal
कोल्हापूर : विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होणारी मंडळे, भाविकांचा उत्साह मोठा असतो. पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या मंडळांसोबत अंमलदारांनी वाद न घातला वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून घ्यावे. मिरवणूक सर्वांसाठी असल्याने वाद निर्माणच होऊ नये, असे प्रयत्न ठेवा. संपूर्ण मिरवणुकीचे रेकॉर्डिंग केले जाणार असून, मंडळांनीही शिस्त पाळावी. प्रेशरमीड, लेसर, ड्रोनचा वापर टाळण्यासह ‘टायमर’चे काटेकोर पालन करण्यासाठी ‘पुश स्कॉड’ने लक्ष द्यावे, अशा सूचना पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी पोलिसांना केल्या.
अनंत चतुर्दशी मिरवणुकीसाठी चार हजारांवर पोलिसांचा बंदोबस्त आहे. आज सकाळी पोलिस मुख्यालय येथे बंदोबस्ताचे वाटप करण्यात आले. यावेळी पोलिस अधीक्षकांनी सूचना केल्या. यानंतर मिरवणूक मार्गावर रंगीत तालीमही झाली. सायंकाळपासूनच कोणी मिरवणूक मार्गावर वाहने उभी करणार नाहीत, याची तपासणी करण्यासाठीही पथके तैनात केली.
सिग्नल लाल असताना थांबा, हिरवा होताच मार्गस्थ व्हा.... यंदाच्या मिरवणुकीत टायमरचा वापर केला जाणार असल्याने याबाबत मंडळांसह पोलिसांमध्येही उत्सुकता आहे. मिरजकर तिकटी ते गंगावेस या मार्गावर सात ठिकाणी सिग्नल उभारले आहेत. सिग्नल लाल असल्यास जागेवरच थांबावे. एका मंडळाला एकाच ठिकाणी २० मिनिटे थांबता येणार आहे, तर सिग्नल हिरवा होताच पुढे जावे लागणार आहे.
मंडळांना पुढे घेऊन जाण्यासाठी तीन अधिकाऱ्यांसोबत अंमलदारांची पथके तैनात आहेत. मिक्सिंग पॉईंटवर उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी मिरजकर तिकटी चौकात उपअधीक्षक सुवर्णा पत्की, बिनखांबी गणेश मंदिर चौकात उपअधीक्षक प्रिया पाटील, पापाची तिकटी येथे गृह उपअधीक्षक राजेंद्र मस्के, इराणी खण येथे शाहूवाडीचे उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, तर पर्यायी मार्गावर गडहिंग्लजचे उपअधीक्षक विवेक पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी व जलदकृती दलाची पथके असतील.
पोलिसांना प्रशिक्षण सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष, नॉईज लेवल मीटरच्या मदतीने साउंड सिस्टीमचे नमुने घेणे, सिग्नलद्वारे मिरवणुकीवर नियंत्रण यांचे प्रशिक्षण पोलिस अंमलदारांना दिले आहे. आज दुपारी मिरवणूक मार्गावर सिग्नलची प्रात्यक्षिकेही झाली. वाहतूक पोलिसांच्या मदतीने या सिग्नलची यंत्रणा मिरवणूक काळात सुरू राहील. विनापरवाना ड्रोन पाडणाऱ्या ॲन्टी ड्रोन गनची प्रात्यक्षिकेही सायंकाळी घेण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.