esakal | ग्रामीण भागात याला गावठी औषध म्हणूनही ओळखले जाते. कारण याच्या प्रत्येक भागाचा उपयोग औषधे तयार करण्यासाठी होतो.

बोलून बातमी शोधा


चैत्र पाडव्यादिवशी कडूलिंब खाणे का महत्वाचे; वाचा सविस्तर
चैत्र पाडव्यादिवशी कडूलिंब खाणे का महत्वाचे; वाचा सविस्तर
sakal_logo
By
स्नेहल कदम

कोल्हापूर : माणसाच्या दैनंदिन आरोग्यासाठी कडुलिंबाचे विशेष महत्व आहे. अगदी आयुर्वेदातही या पानांना महत्व आहे. याच्यामुळे बरेच छोटे मोठे आजार लवकर बरे होतात. बऱ्याच अंशी डॉक्टरही कडुलिंबाची पाने खाण्याचा सल्ला देतात. कडुलिंब म्हणजे कडूपणा, तोंड कडवट करणारा. त्याच्या या गुणामुळे त्याला अनेकजण नापसंत करतात. मात्र याच्या औषधी गुणर्धांमांमुळे याला उच्चस्थानी ठेवले आहे. कडूलिंबाची पानं कडू असतात परंतु यातील अँटिबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीपॅरासिटीकसारखे गुण याला खास बनवतात. ग्रामीण भागात याला गावठी औषध म्हणूनही ओळखले जाते. कारण याच्या प्रत्येक भागाचा उपयोग औषधे तयार करण्यासाठी होतो.

आज चैत्र प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. आजपासून हिंदु नववर्षाची सुरुवात होते. घरोघरी गुढ्या उभा करुन, पुरणपोळीचा गोडधोड स्वयंपाक करुन नववर्षाचे जल्लोषी वातावरणात स्वागत केले जाते. यादरम्यान निसर्गातही अनेक बदल होतात. शिशिर ऋतुतील झाडांची पानगळ संपुन वंसताच्या नव्या पालवीने जन्म घेतलेला असतो. बहरणारी झाडे, बकुळाची फुले आणि कोकीळेचा आवाज अशा आनंदाच्या वातावरणात नव्या वर्षाची सुरुवात होते.

या दिवशा गोड पुरणपोळी सोबत कडुलिंबाच्या पाने खाण्यालाही तितकेच महत्व आहे. शिमग्यात होळीचे दहन झाल्यानंतर वातावरणात उष्णता वाढायला लागते. त्यामुळे बदलत्या वातावरणात कांजण्या, गोवर असे त्वचेचे विकार, सर्दी पडशांसारखे लहान सहान आजार होण्याची शक्यता असते. यावेळी शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी होते. ती वाढवण्यासाठी आणि वर्षभर शरीराचे स्वाथ्य राखण्यासाठी नववर्षाची सुरूवात कडूलिंबाची पाने खाऊन केली जाते.

कडूलिंबाचे फायदे -

रक्त शुद्ध करण्यास मदत

सध्या धावपळीच्या जीवनात सर्वांचे स्वत:कडे, आरोग्याकडे दुर्लक्ष होते. अशा लाईफस्टाइलमध्ये बरेच लोक आजारी पडतात. आपले रक्त शुद्ध नसल्याने हे आजार होतात. चेहऱ्यावर डाग, अॅक्ने, त्वचा रोग इत्यादींमुळे ही लक्षणे समजून येतात. या साऱ्या आजारांवर कडूलिंब एक शक्तीशाली औषधी वनस्पती म्हणून काम करते. शरीराला आवश्यक ती पोषक तत्व आणि ऑक्सीजन देण्यासाठी फायदेशीर ठरते. शिवाय याच्या सेवनाने शरीरातील हानिकारक आणि दूषित पदार्थांपासून सुटका मिळण्यास मदत होते.

डायबिटीससाठी औषध म्हणून उपयोगी

डायबिटीस अर्थात मधुमेह रोखण्यासाठी कडूलिंबाचा सर्सास वापर केला जातो. तसेच साखर म्हणजेच शुगर नियंत्रणात आणण्यासाठी याच्या पानांचा उपयोग होतो. अनेक अभ्यास आणि संशोधनातुन हे सिद्धही झाले आहे. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी रोज रिकाम्या पोटी कडूलिंबाची पाने खाल्ल्यास या आजारापासुन त्यांची लवकर सुटका होऊ शकते.

त्वचेसाठी कडूलिंबाचा वापर

कडूलिंबाच्या पानांचा ज्याप्रमाणे आरोग्यासाठी उपयोग केला जातो, त्याचपद्धतीने सौंदर्यासाठीही या पानांचा वापर होतो. कडूलिंबाच्या पानांमध्ये अनेक अँटिऑक्सिडंट्स असतात. जे आपल्या त्वचेची काळजी घेतात. शिवाय त्वचारोगासंबंधीचे आजारही बरे करण्यास मदत करतात. त्यामुळे आज बाजारामध्ये मिळणाऱ्या अनेक कॉस्मेटिकमध्ये या पानांच्या पेस्टचा हमखास वापर असतो.

कॅन्सरसाठी कडूलिंबचा वापर

कडूलिंबामध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकचा हानिकारक प्रभाव थांबवू शकतात. त्यामुळे शरीरामध्ये कॅन्सर होण्याचा धोका टळतो. त्याशिवाय कडूलिंब हृदयरोगासाठीही औषध म्हणून काम करते. त्यामुळे कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी पानांच्या सेवनाचा सल्ला दिला जातो.

याप्रमाणे भारतीय वेदांमध्ये औषधी गुणधर्म म्हणून कडूलिंबाचे नाव घेतले जाते. सर्व प्रकारच्या रोगांवर निवारण करणारी औषधी वनस्पती म्हणून याकडे पाहिले जाते. कडूलिंब हे दोन प्रकारचे असतात. एक गोड आणि एक कडू कडूलिंब. दोन्हींमध्येही औषधी गुणधर्म आढळतात. मात्र तुलनेत कडू कडूलिंबामध्ये याचे प्रमाण जास्त असते.