कोल्हापुरात राजकीय समीकरणे बदलणार ? 2 दिवसांत उमेदवाराचं नाव निश्‍चित होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापुरात राजकीय समीकरणे बदलणार ?

मतांची गोळाबेरीज किती होऊ शकते, यावर उमेदवार कोण हे निश्‍चित करायचे ठरले.

कोल्हापुरात राजकीय समीकरणे बदलणार ?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोल्हापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या मागे राहू, अशी ग्वाही आमदार विनय कोरे व प्रकाश आवाडे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिल्याचे समजते. ताराबाई पार्कातील हॉटेलमध्ये बैठक झाली. शनिवारी (१३) उमेदवारीवर चर्चेसाठी पुन्हा बैठक घेण्याचेही ठरले. विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारीवर चर्चेसाठी श्री. पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला कोरे, आवाडे यांच्यासह माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, प्रा. जयंत पाटील, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे उपस्थित होते.

उमेदवार म्हणून श्री. हाळवणकर, शौमिका महाडिक, प्रा. जयंत पाटील, राहुल आवाडे इच्छुक असल्याचे सांगण्यात आले. याच चार-पाच नावांवरच चर्चा करताना प्रत्येकांकडे मते किती आहेत, याचाही अंदाज घेतला. मतांची गोळाबेरीज किती होऊ शकते, यावर उमेदवार कोण हे निश्‍चित करायचे ठरले. त्याचवेळी माजी खासदार महाडिक यांनीही भाजप जो उमेदवार देईल त्याच्या मागे ताकदीने उभा राहू अशी ग्वाही दिली. प्रा. पाटील यांनीही १२ वर्षांपूर्वी ही निवडणूक माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या विरोधात लढवली होती. त्यांचा २३ मतांनी पराभव झाला. त्यांनाही उमेदवारीबाबत विचारले असता आपल्यावर मर्यादा आहेत, पण भाजप देईल त्या उमेदवारांसोबत राहू असे सांगितल्याचे समजते.

हेही वाचा: एसटीला आर्थिक गर्तेत लोटू नका, महामंडळाचे कर्मचाऱ्यांना आवाहन

सुमारे दोन तास ही बैठक चालली. शनिवारी (ता. १३) पुन्हा यावर चर्चा करण्याचे ठरले. तत्पूर्वी चंद्रकांत पाटील माजी आमदार महादेवराव महाडिक यांची भेट घेणार आहेत. उद्याच (ता. १२) सकाळी दोघांत चर्चा होण्याची शक्यता आहे. १६ नोव्हेंबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. तत्पूर्वी एका नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

राजकीय समीकरण बदलणार

राज्याच्या राजकारणात भाजपसोबत असलेले कोरे व आवाडे यांनीच या बैठकीला उपस्थिती लावल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणेही बदलणार आहेत. नुकत्याच झालेल्या ‘गोकुळ’च्या निवडणुकीत श्री. कोरे यांनी श्री. महाडिक यांच्या विरोधात ताकद लावली होती. या निवडणुकीत पुन्हा महाडिक यांच्या कुटुंबातील उमेदवार असल्यास त्यांची भूमिका महत्त्वाची असेल.

हेही वाचा: काँग्रेस आमदाराच्या मुलाची आत्महत्या; सुसाइड नोट सापडली

दोन दिवसांत उमेदवार निश्‍चित

बैठकीबाबत श्री. कोरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘राज्याच्या राजकारणात आपण भाजपसोबत असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बोलवलेल्या बैठकीला उपस्थित होतो. येत्या दोन दिवसांत उमेदवारांचे नांव निश्‍चित होईल.’

"आज विधान परिषद निवडणुकीबाबत बैठक झाली. आमदार विनय कोरे व प्रकाश आवाडे राज्याच्या राजकारणात भाजपसोबत आहेत. त्यांची व भाजपची मते मिळून आमचा विजय होऊ शकतो, असा एक आत्मविश्‍वास बैठकीतून आला. शौमिका महाडीक, सुरेश हाळवणकर, समरजितसिंह घाटगे व राहुल आवाडे यांच्या नावांवर उमेदवारीबाबत चर्चा झाली. एक-दोन दिवसांत उमेदवार निश्‍चित होईल. कोण म्हणत असेल ही निवडणूक एकतर्फी आहे तर तसे काही नाही."

- चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

हेही वाचा: राज्यात लसीकरणाचा औरंगाबाद पॅटर्न राबवणार ?

loading image
go to top