सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांची धुराडी मार्चअखेरपर्यंतच...

तीन हजार हेक्टर उसावर संकट सीमाभाग, कोल्हापुरातील कारखान्यांकडून उचल
Sangli sugar factories
Sangli sugar factories sakal

सांगली : सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी हंगामातील सुमारे ६० टक्के उसाचे गाळप केले आहे. कारखान्यांकडे नोंद झाल्यापैकी तीन हजार हेक्टर उसाच्या गाळपाची चिंता आहे. कर्नाटकातील सीमाभाग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्याकडून सध्या उसाची उचल सुरू असल्याने गाळपाचा बराच ताण हलका होणार आहे. जिल्ह्यातील १८ पैकी ५ कारखाने बंद आहेत. १३ कारखान्यांपैकी चार कारखाने वगळता अन्य साखर कारखान्यांची धुराडी मार्च अखेर बंद होणार आहेत. साखर आयुक्तांच्या आदेशानुसार कारखाने नोंदणीकृत तसेच कार्यक्षेत्रातील बिगरनोंदणी झालेल्या ऊस गाळपाचे नियोजन करीत आहेत.

sugarcane 3 thousand hectare sifting

जिल्ह्यात उसाचा गळीत हंगाम अंतिम टप्प्याकडे जात आहे. मार्चअखेरपर्यंत कारखान्यांची धुराडी बंद होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बऱ्याच कारखान्यांनी कारखान्यांच्या बंद करायच्या तारखादेखील जाहीर केल्या आहेत. जिल्ह्यात १३ कारखान्यांनी जानेवारी २०२२ अखेर ५८ हजार ८४६ हेक्टर उसाचे गाळप केले आहे. ५७.२२ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. सर्व साखर कारखान्यांकडे नोंद ४७ हजार ३१० हेक्टर ऊस शिल्लक आहे. येत्या दोन महिन्यांत सर्वसाधारण ४४.४७ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट आहे. याचा अर्थ सध्या तरी ३ हजार हेक्टरवरील उसाबद्दल चिंता आहे. अर्थात सीमा भागातील शिवशक्ती, अथणी शुगर, कागवाड, उगार कारखान्यांकडून जिल्ह्यातील ऊस गाळपास मोठ्या प्रमाणावर जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा कारखान्यांकडून पश्‍चिम भागातील ऊस मोठ्या प्रमाणावर जात आहे. तरीही शेतकऱ्यांना यंदा कारखान्याच्या कार्यालयांत चकरा मारूनही तोड मिळत नाही. अनेकांच्या उसाला उशिरा तोड मिळत असल्याने साहजिकच परिणाम वजन घटण्यात झाल्याचे दिसत आहे. शिवाय तोडणीसाठी मजुरांकडून एकरी चार-पाच हजारांची मागणी होत असल्यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.

या कारखान्यांचे गाळप मार्चनंतरही

जिल्ह्यातील राजारामबापू, उदगिरी, सोनहिरा आणि क्रांती या चार कारखान्यांचे गाळप मार्च २०२२ नंतरही सुरू राहण्याची अशी शक्यता आहे. त्यावेळी हे कारखाने ५० टक्केपेक्षा कमी क्षमतेने म्हणजेच तोट्यात चालवावे लागणार आहेत.

कारखान्यांचे नियोजन (आकडेवारी जानेवारी २०२२ अखेर)

कारखाना शिल्लक ऊस (हेक्टरमध्ये) कारखाने बंदचा अंदाज

हुतात्मा वाळवा २४४७.२८ १६ एप्रिल

राजारामबापू, साखराळे ३७०६ ३१ मार्च

राजारामबापू, वाटेगाव २१०६ २५ मार्च

राजारामबापू, कारंदवाडी १४३६ २० मार्च

राजारामबापू, तिप्पेहळ्ळी १६९६ २५ मार्च

मोहनराव शिंदे, आरग २५८३.३३ २५ मार्च

विश्‍वासराव, चिखली ३०५० १५ मार्च

क्रांती, कुंडल ६८०० १० एप्रिल

सदगुरू, राजेवाडी ५२८० १५ एप्रिल

पतंगराव कदम, वांगी ४१६६ १० एप्रिल

श्री दत्त इंडिया (वसंतदादा, सांगली) ४१०० २५ मार्च

उदगिरी, खानापूर ७८२९ ३१ मार्च

निनाईदेवी (शिराळा) २१०९ ३१ मार्च

साखर आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे सर्वच कारखान्यांकडून सध्या गाळपाचे नियोजन करीत आहेत. ऊस शिल्लक राहणार नाही, याची दक्षता घेत आहेत. अगदी अंतिम टप्प्यात मार्चनंतरही कमी क्षमतेने ऊस गाळप करण्याची सर्व कारखान्यांची तयारी आहे.

- मृत्युंजय शिंदे, उपाध्यक्ष, श्री दत्त इंडिया (वसंतदादा), सांगली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com