Sugar Production Season : उन्हाच्या झळा वाढल्याने साखर हंगाम कासावीस ; हंगाम अर्धवट टाकून कामगार परतीच्या दिशेन

वाढत्या उन्हामुळे शेवटच्या टप्प्‍यातील साखर हंगाम कासावीस होत आहे. गेल्‍या पंधरा दिवसांत ऊस पट्ट्यातील तापमानाने चाळिशी गाठल्याने कामगारांना ऊस तोडणी असह्य झाली आहे.
Sugar Production Season
Sugar Production Seasonsakal

कोल्हापूर, ता. ६ : वाढत्या उन्हामुळे शेवटच्या टप्प्‍यातील साखर हंगाम कासावीस होत आहे. गेल्‍या पंधरा दिवसांत ऊस पट्ट्यातील तापमानाने चाळिशी गाठल्याने कामगारांना ऊस तोडणी असह्य झाली आहे. उन्‍हाचा तडाखा सहन होत नसल्‍याने ऊस तोडणी मध्येच टाकून मजूर गावाकडे परतत आहेत. त्यामुळे पूर्ण राज्यातच ऊसतोडणीची परिस्थिती गंभीर बनली आहे.

ऊस तोडणी संथ होत असल्याने अनेक साखर कारखान्यांचे गाळप गेल्‍या पंधरा दिवसांपासून क्षमतेच्‍या पन्नास टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. यामुळे उन्‍हाच्या तडाख्याबरोबर मजूरटंचाईच्या झळा कारखान्यांनाही बसत आहेत. काही भागातील कारखान्यांनी ऊस कमी आहे म्हणून बाहेरून ऊस गाळपासाठी आणला. यामुळे अंतिम टप्प्यात कार्यक्षेत्रातील ऊसच शिल्लक राहात आहे. तोडणी न झाल्याने ऊस उत्पादकांचा रोष वाढत आहे. त्यामुळे या कारखान्यांना तोडणी यंत्रणेची जुळणी करताना नाकी नऊ येत आहेत. ऊस हंगाम अंतिम टप्प्यात येत आहे. ३ एप्रिलअखेर २०७ पैकी १५७ साखर कारखाने बंद झाले आहेत. अजूनही ५० साखर कारखान्यांचा हंगाम सुरू आहे. या कारखान्यांपुढे आता पूर्ण ऊस गाळपाचे आव्हान आहे.

साखर आयुक्तालयाकडून राज्यातील शिल्लक उसाचा आढावा घेण्यात येत आहे. सध्या तरी वाढता उष्मा ऊसतोडणीतला सर्वात मोठा अडथळा ठरत आहे. राज्यात पश्चिम महाराष्ट्राबरोबर विदर्भ, मराठवाड्यातही उसाचे क्षेत्र मोठे आहे. मराठवाड्यात सध्या सातत्याने पारा ४० अंशांच्या वर आहे. केवळ कडक ऊनच नाही तर वाढत्या आर्द्रतेमुळे उन्हाची मोठी झळ ऊस तोडणी कामगारांना बसत आहे. बागायती असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातही पारा ३९ ते ४० च्या दरम्‍यान आहे, याचा प्रतिकूल परिणाम ऊस तोडणीवर होत आहे.

Sugar Production Season
Sugar Production : राज्यातील साखर उत्पादन यंदा कमी ; आतापर्यंत ८०६.१६ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण

जादा रक्कम देऊन मजुरांची जुळवाजुळव

ऊस तोडणी कामगाराबरोबर पूर्ण हंगामाचा करार केला जातो. त्या कामी त्यांना कारखान्यांकडून उचलही मिळते. ऊस तोडणी झाल्यानंतर हिशोब करून शिल्लक रक्कम कामगारांना दिली जाते. एखादा कामगार मधूनच गेला तर त्‍याला उर्वरित रक्कम मिळत नाही. हा धोका असूनही वाढत्या उन्हाने तोडणी अशक्य झाल्‍याने अनेक मजूर हंगाम संपण्यापूर्वीच गावी परतत आहेत. तोडणी पूर्ववत राहण्यासाठी अन्‍य ठिकाणांहून जादा मजुरी देऊन कामगारांची जुळवाजुळव करावी लागत आहे.

नगर, पुणे विभागांत तोडणी रेंगाळली

सध्या नगर, पुणे विभागांत विशेष करून ऊस तोडणी रेंगाळत आहे. या विभागात अजून ४० ते ५० टक्के कारखाने सुरू आहेत. कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड विभागात पाच ते सात कारखाने ३ एप्रिलअखेर सुरू आहेत. नागपूरमध्ये हंगाम सुरू केलेले चारही कारखाने अद्याप गाळप करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com