esakal | संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी तीन हजार पोलिसांना खडा पहारा ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. 
sakal

बोलून बातमी शोधा

सांगलीत काय सुरु, काय बंद? संचारबंदीची होणार कडक अंमलबजावणी

सांगलीत काय सुरु, काय बंद? संचारबंदीची होणार कडक अंमलबजावणी

sakal_logo
By
स्नेहल कदम

सांगली : जिल्ह्यातील करोना संसर्गाची साखळी तोडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आज रात्रीपासून 1 मे 2021 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. विनाकारण फिरल्यास एक हजार रुपयांच्या दंडासह गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिला आहे. अत्यावश्‍यक सेवा सुरुच राहणार आहेत. दवाखाने, मेडिकल, बॅंका, शासकीय कार्यालये, भाजीपाला विक्री सुरु राहील. संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी तीन हजार पोलिसांना खडा पहारा ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

राज्यात रुग्णसंख्या भीतीदायक गतीने वाढत असून आरोग्यसुविधा, लसीकरण वाढवत असताना कोरोनाची संसर्गसाखळी तोडण्याची गरज आहे. जिल्ह्यातही कोरोनाची दुसरी लाट आली असून येणारा वीस दिवसांचा कालावधी कोरोनाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील आहे. या पार्श्वभूमीवर ऍक्‍शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. कोविडच्या पहिल्या लाटेमध्ये कोविड-19 च्या उपचारांसाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक गंभीर असून वेगाने वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाने 1 मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. विनाकारण फिरल्यास एक हजार रुपयांच्या दंडासह गुन्हा दाखल केला जाईल. ज्या व्यक्तींना बाहेर जायचे आहे. त्यांची चेक नाक्‍यावर चौकशी केली जाणार आहे, त्याबाबतचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.

गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनप्रमाणे सर्व व्यवहार या काळात बंद राहणार नाहीत. जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने, पेट्रोलपंप, सार्वजनिक वाहतूक, रिक्षा-टॅक्‍सी, आरोग्य सेवा सुरू राहणार असल्या तरी सबळ कारणांशिवाय कोणालाही रस्त्यावर फिरता येणार नाही तसेच खासगी वाहने रस्त्यावर आणता येणार नाहीत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात येत आहेत. या काळात आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा देण्यासाठी अन्नधान्य आणि अर्थसाह्य शासन आदेशाप्रमाणे देण्यात येईल.

पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक गंभीर असून वेगाने वाढत आहे. कोविडच्या पहिल्या लाटेमध्ये कोविड-19 च्या उपचारांसाठी उपयोगात आणलेली सर्व हॉस्पीटल्स पुन्हा तयार ठेवण्यात आली आहेत. बाधित रूग्णांच्या उपचारासाठी पुरेशा प्रमाणात बेड्‌स, औषधे व ऑक्‍सिजनसह आवश्‍यक त्या उपाययोजना केल्या जात असल्या तरी पुढील पंधरा दिवस रुग्णवाढीचा वेग वाढणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे संसर्गाची साखळी तोडण्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी स्पष्ट केले.

पोलिसांचे पेट्रोलिंग होणार...

संचारबंदीच्या अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांचा खडा पहारा राहणार आहे, त्याबाबतच्या सूचना पोलिसांना देण्यात आला आहे. चेकपोस्ट, चौकाचौकात पोलिसांचे पथक कार्यरत राहिल. विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अत्यावश्‍यक सेवेमध्ये दुकानांचा समावेश असला तरी त्याठिकाणी गर्दी झाल्यास पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल.

दुकानात गर्दी झाल्यास बंद

जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने तसेच खाद्य पदार्थांची दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्याठिकाणी गर्दी होत असल्यास अशा बाजारपेठा किंवा दुकाने बंद करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनास देण्यात आले आहेत. गर्दी झाल्यास दुकाने बंद केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. चोधरी यांनी सांगितले.

हे सुरु राहणार

 • दवाखाने, हॉस्पिटल, मेडिकल,

 • किराणा दुकाने,

 • भाजीपाला, फळ विक्री

 • सरकारी कार्यालये, जिल्हा परिषद, महानगरपालिका

 • सरकारी, सहकारी व खासगी बॅंका

 • एस. टी. सेवा ( अत्यावश्‍यक सेवेसाठी 15 पेक्षा जादा प्रवाशी आल्यासच बस सोडणार)

 • विमा कंपनी

 • न्यायालये-लवादाशी संबंधित वकिलांची कार्यालये

 • सरकारी कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश बंदी.


हे बंद राहणार

 • जीवनावश्‍यक वस्तू वगळता सर्व दुकाने

 • शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवण्या

 • बिअर बार, हॉटेल

 • उद्याने, चित्रपटगृहे, नाटयगृहे, जीम

 • मॉल्स, व्यापारी संकुले

 • धार्मिकस्थळे

 • केशकर्तनालये, स्पा, ब्युटीपार्लर