साताऱ्यात हाेऊ शकत नाही ते माढ्यात हाेणार ?

साताऱ्यात हाेऊ शकत नाही ते माढ्यात हाेणार ?

सातारा : राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत प्रत्येक जिल्हास्तरावर आधुनिक सुविधांनीयुक्त आयुष रुग्णालय मिळू शकते. परंतु, त्यासाठी जिल्ह्याच्या मुख्यालयात जागा उपलब्ध करणे प्रशासकीय अधिकाऱ्यांना जमेना झाले आहे. त्यामुळे माढ्याच्या लोकप्रतिनिधींच्या मागणीवरून जिल्ह्याचे मुख्यालय सोडून हे रुग्णालय आता जिथे उपजिल्हा रुग्णालय चालू शकले नाही, अशा झिरपवाडी (ता. फलटण) येथील जागेत नेण्याबाबत चाचपणी सुरू झाली आहे. हे संपूर्ण जिल्ह्यातील रुग्णांवर अन्यायकारक ठरणार आहे. तेव्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांसह साताऱ्यातील लोकप्रतिनिधींनी हे रुग्णालय जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी राहण्यासाठीच प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. केंद्र शासनाने प्राचीन आरोग्यसेवांचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ मिळावा, यासाठी आयुष विभागाच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. 2009 मध्ये आघाडी शासनाच्या काळात जिल्हा रुग्णालयात आयुष विभागाला सुरवात झाली. त्यामध्ये आयुर्वेदिक, होमिओपॅथी व युनानी उपचारपद्धतीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांपासून तशा लांब असलेल्या या सुविधा केवळ केसपेपरच्या खर्चात उपलब्ध होऊ लागल्या. आज सुमारे 150 ते 200 रुग्ण बाह्यरुग्ण विभागात या सुविधांचा लाभ घेत आहेत.
 
भाजप सरकारच्या काळात या विभागाकडे अधिक लक्ष देण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यासाठी या सरकारने स्वतंत्र आयुष मंत्रालयाचीही स्थापना केलेली आहे. त्या माध्यमातून केवळ बाह्यरुग्ण विभाग असलेल्या आयुष्य विभागात आंतररुग्ण (रुग्ण दाखल करून उपचार करण्याची) सुविधाही सुरू करण्याचे धोरण शासनाने घेतले आहे. त्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र आयुष्य रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 30 बेडचे हे रुग्णालय असणार आहे. त्यामध्ये या विभागातील उपचारासाठी आवश्‍यक असलेल्या अत्याधुनिक साधनसामुग्री उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार हे रुग्णालय जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी प्रामुख्याने जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच बांधावे, अशी तरतूद आहे. तिथे जागा उपलब्ध नसल्यास शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी, जनतेला सोयीस्कर ठरेल, अशा ठिकाणी उपलब्ध असलेल्या जागेचाच विचार व्हावा, असे स्पष्टपणे निर्देशित करण्यात आले आहे. परंतु, चार महिने झाले प्रशासकीय अधिकाऱ्यांना साताऱ्यामध्ये त्यासाठी जागा उपलब्ध करणे शक्‍य झालेले नाही.

हेही वाचा -   राजेच म्हणतात शिवजयंती एकच असावी

जरुर वाचा - सव्वा लाख सातारकर नोकरीच्या प्रतीक्षेत

आता तर, हे रुग्णालय थेट फलटणला नेण्याची चाचपणी सुरू झालेली आहे. माढ्याच्या खासदारांनी मागणी केल्यानंतर ती सुरू झाली. फलटणच्या ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा वाढवून ते उपजिल्हा रुग्णालय करण्याचा निर्णय झाला. त्यासाठी 50 खाटांचे रुग्णालय झिरपवाडी येथे बांधण्यात आले. परंतु, फलटणच्याच नागरिकांना ती जागा सोयीची नव्हती. तिथे जाणेही नागरिकांना शक्‍य होत नव्हते. त्यामुळे झिरपवाडीचे रुग्णालय बंद पडले. बांधून पूर्ण झालेली इमारत गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. आता तिथे खिडक्‍याही शिल्लक राहिलेल्या नाहीत. नागरिकच न गेल्याने त्या रुग्णालयाचे खंडर झाले आहे. त्यामुळेच फलटणच्या रुग्णालयाचा दर्जा उपजिल्हावरून ग्रामीण रुग्णालयाचा आणावा लागला. जी जागा फलटणच्या नागरिकांनाच सोयीची ठरली नाही, ती जिल्ह्यातील नागरिकांना कशी सोयीची ठरणार, याचा विचार अधिकाऱ्यांनी करणे आवश्‍यक आहे. 
वास्तविक जिल्हा रुग्णालयामध्ये जिल्ह्याच्या विविध भागांतून नागरिक तज्ज्ञ आरोग्य सुविधांसाठी येतात. त्यामुळे जिल्ह्यातून आलेल्या रुग्णांना जिल्हा रुग्णालयामधील आयुष विभागातील सुविधांचाही लाभ घेता येतो. त्यांना खास त्यासाठी दुसरीकडे जावे लागत नाही. त्यामुळे आयुष रुग्णालयासाठी जिल्हा रुग्णालयातील जागाच अत्यंत फायदेशीर आहे. सध्या असलेल्या आयुष विभागाची इमारत व त्यावर आणखी बांधकाम करूनही आयुष रुग्णालय उभारता येणे शक्‍य आहे. जिल्हा रुग्णालयामध्ये मोकळ्या असलेल्या जागेचा वापर वनौषधी बागेसाठी केला जावू शकतो. तशी विभागलेली एक एकर पेक्षा जास्त जागा जिल्हा रुग्णालयाच्या आवारात उपलब्ध होऊ शकते. वास्तविक रुग्णांचा विचार केल्यास याच जागेबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आग्रही राहणे आवश्‍यक आहे. परंतु, जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांची ती मानसिकता दिसत नाही. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही त्याबाबत निर्णय घेता आलेला नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वी महाबळेश्‍वरचा विचारही पुढे आला होता. त्यामुळे हे रुग्णालय रुग्णांसाठी की पर्यटकांसाठी काढायचे, याबाबतची भूमिका अधिकाऱ्यांमध्ये स्पष्ट आहे, असे दिसत नाही. त्यामुळे नव्याने पदभार स्वीकारलेल्या जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनीच याबाबत ठोस निर्णय घेणे अवश्‍य आहे. लोकप्रतिनिधींच्या ऐवजी नागरिकांच्या सोयीचा निर्णय ते घेतील, अशी सातारकरांची अपेक्षा आहे. 


हेही वाचा - महाराष्ट्रातील 16 गावांत पेटले पाणी

जरुर वाचा - साताऱ्याचा हवालदार नडला पुण्याच्या पोलिस अधीक्षकांना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com