बापरे.. पैशाच्या कारणावरून केले विद्यार्थ्याचे अपहरण अन्‌...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 जानेवारी 2020

मी अमीरला उसने दीड हजार रुपये दिले होते. तो पैसे देण्यासाठी नेहमी टाळाटाळ करत होता. त्यामुळे मी त्याला नान्नज ते मार्डी रोडवरील प्रशांत बुचडे यांच्या शेताजवळ नेवून दारू पाजविली. रुमालाने गळा आवळला.

सोलापूर : उसने घेतलेले दीड हजार रुपये परत देत नसल्याने 14 वर्षीय मित्राचे अपहरण करून खून केल्याची घटना नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथे घडली. याप्रकरणी अरबाज आयुब शेख (वय 20, रा. नान्नज, ता. उत्तर सोलापूर) यास अटक केली असून त्याची चार दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. 

हेही वाचा -  अश्‍लील इमोजीमुळे अडकला फेसबुक फ्रेंड!

शेतात आढळला आमिरचा मृतदेह
अमीर अल्ताफ मुजावर (वय 14) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अल्ताफ मुजावर (वय 43, रा. नान्नज, ता. उत्तर सोलापूर) यांनी सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुजावर यांचा बेकरीचा व्यवसाय आहे. ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. नान्नज ते मार्डी रस्त्यावरील प्रशांत बुचडे यांच्या शेतात अमीरचा मृतदेह आढळून आला. अमीर हा नान्नज येथील हिंदुस्थान कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूलमध्ये आठवीमध्ये शिक्षण घेत होता. गावातील अरबाज शेख हा मुलगा नेहमी अमीर याच्याकडे येत होता. सायंकाळच्या सुमारास अरबाज हा अमीरच्या घरी आला होता. दोघेही घराच्या छतावर कबूतर पाहत थांबले होते. त्यानंतर ते दोघेही बाहेर निघून गेले. रात्रीचे नऊ वाजले तरी अमीर घरी परत आला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. गावात सर्वत्र विचारणा केली मात्र तो सापडला नाही. अमीरचा मोबाईल बंद लागत होता. 

हेही वाचा - माहिती आहे का? 'मिडल ईस्ट'ला जाताहेत सोलापूरचे मासे!

खोटे बोलल्याने अरबाजवर आला संशय
अमीरचे वडील अल्ताफ मुजावर यांनी गावातील शैलेश राजगुरू, सागर टोणपे, अमीर शेख यांच्याकडे विचारणा केली. अमीरला त्याचा मित्र अरबाज याच्यासोबत जाताना पाहिल्याचे त्यांनी सांगितले. त्या वेळी अमीरच्या वडिलांनी अरबाजला त्याच्या मोबाईलवर संपर्क साधला. तो फोन घरच्यांनी उचलला. अरबाज बाहेर गेल्याचे त्यांनी सांगितले. रात्री नऊ वाजता अरबाज घरी आल्याचे त्याच्या घरच्यांनी अमीरच्या वडिलांना कळविले. तेव्हा मुजावर यांनी फोनवरून मुलगा अमीर कोठे आहे याबाबत विचारणा केली. अमीर हा मार्डी येथे शुभमकडे गेला आहे असे अरबाजने खोटे सांगितले. त्या वेळी मुजावर यांनी शुभम याला संपर्क साधला. अमीर माझ्याकडे आला नाही. मी सायंकाळी अमीरला फोन केला तेव्हा अरबाज हा फोनवर बोलल्याचे शुभमने सांगितले. 
सर्वांना अरबाजचा संशय आला. अमीरच्या वडिलांनी सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्या ठिकाणी संशयित अरबाज याला बोलविण्यात आले.

हेही वाचा -  सुरक्षा रक्षकाने मुलीला दाखवले खाऊचे आमिष! अन्‌..

खून केल्याची दिली कबुली
"मी अमीरला उसने दीड हजार रुपये दिले होते. तो पैसे देण्यासाठी नेहमी टाळाटाळ करत होता. त्यामुळे मी त्याला नान्नज ते मार्डी रोडवरील प्रशांत बुचडे यांच्या शेताजवळ नेवून दारू पाजविली. रुमालाने गळा आवळला. त्यानंतर दगडाने डोक्‍यात मारून त्याचा खून केला आहे.' अशी कबुली अरबाजने सर्वांसमोर दिली. या घटनेनंतर अमीरचे कुटुंबीय आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी गेले. तिथे अमीर हा गंभीर अवस्थेत पडल्याचे दिसून आला. त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र तोवर त्याचा मृत्यू झाला होता, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात संशयित अरबाज यास अटक करण्यात आली असून त्याची चार दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of a school student