संगमनेर : विहिरीत उडी घेत युवकाची आत्महत्या

हरिभाऊ दिघे
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास कहांडळवाडी (ता. सिन्नर) शिवारात ही घटना उघडकीस आली.

तळेगाव दिघे (जि. नगर) : संगमनेर तालुक्यातील देवकौठे येथील एका विवाहित युवकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सोमनाथ दशरथ कहांडळ (वय ३३) असे त्याचे नाव आहे. गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास कहांडळवाडी (ता. सिन्नर) शिवारात ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी वावी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

देवकौठे येथून सकाळी दहा वाजेच्या सुमारास सोमनाथ दशरथ कहांडळ हा घरातून बाहेर पडला होता. मात्र तो घरी परतला नव्हता. दरम्यान कहांडळवाडी (ता. सिन्नर) शिवारात भास्कर चांगदेव पवार यांच्या शेतातील विहिरीत दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगतात आढळून आला. याबाबत रहिवाशांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी येवून विहिरीतून मृतदेह बाहेर काढीत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलविला. पोलिस पाटील रविंद्र गभाजी खरात यांनी खबर दिली. त्यानुसार वावी (ता. सिन्नर) पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यू रजि. क्र. ३६ / २०१७ सीआरपीसी १७४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.

सहायक पोलिस निरीक्षक रणजित आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक राजेंद्र केदारे अधिक तपास करीत आहे. सोमनाथ कहांडळ याने कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून आत्महत्या केल्याचे समजते. त्याच्या पश्चात आई,वडील, भाऊ, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. सायंकाळी शोकाकुल वातावरणात त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने देवकौठे गावावर शोककळा पसरली आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: nagar news sangamner one commits suicide