भाजपच्या हातून सत्ता हस्तगत करण्यासाठी राष्ट्रवादीचा 'येथे' ऍक्‍शन प्लॅन

NCP Action Plan In Sangli To Take power from BJP
NCP Action Plan In Sangli To Take power from BJP

इस्लामपूर ( सांगली ) - जिल्हा परिषदेत भाजपच्या हातून सत्ता हस्तगत करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा ऍक्‍शन प्लॅन इस्लामपूर मुक्कामी तयार करण्यात आला. अर्थमंत्री जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार सुमनताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीच्या सदस्यांशी बैठक झाली. त्याला गटनेते शरद लाड यांच्यासह पंधरा सदस्यांनी हजेरी लावली होती. 

जिल्हा परिषदेची अध्यक्ष निवड दोन जानेवारी रोजी होत आहे. येथे सध्या भाजपची सत्ता आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर तोच पॅटर्न जिल्हा परिषदेत राबविण्याबाबत राज्य पातळीवर हालचाली सुरू आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीची बैठक घेतली. सत्ता बदलाची पुरेपूर संधी हाती असल्याची खात्री झाल्याने त्यांनी कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांसोबत चर्चा करण्याचा निर्णय घेतला. त्याची सुरवात शिवसेना मंत्री, जिल्हा संपर्क नेते दिवाकर रावते यांच्याशी संपर्क साधून करण्यात आली. शिवसेनेच्या चिन्हावरील तीन, शिवसेनेत आलेल्या अजितराव घोरपडे गटाचे दोन आणि नायकवडी गटाच्या एक अशा एकूण सहा सदस्यांची संपूर्ण जबाबदारी रावते यांच्यावर सोपवण्यात आली. ते चर्चा करुन जयंत पाटील यांना पुढील माहिती देतील आणि पुढे स्थानिक पातळीवर बैठक होऊ शकेल. 

निश्चित प्लॅन तयार

रावते यांच्या चर्चेनंतर आमदार अनिल बाबर, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्यासह वैभव नायकवडी यांच्याशीही जयंत पाटील चर्चा करतील, अशी माहिती सांगण्यात येत आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत फूट पडू नये, सारे सदस्य एकजूट राहावेत, यासाठीही निश्‍चित प्लॅन तयार करण्यात आल्याचे समजते. दरम्यान, भाजपमध्ये फूट पाडण्याची तयारीही राष्ट्रवादीने केली आहे. जत तालुक्‍यातील भाजप नाराजांशी चर्चेची जबाबदारी आमदार विक्रम सावंत यांच्यावर सोपवण्यात आली आहे. खासदार संजय पाटील समर्थक सदस्यांच्या हालचालींवरही लक्ष ठेवले जाणार आहे. 

कसरत अटळ 

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सत्तेसाठी जुळवाजुळव सुरू केली असली तरी काही सदस्य भाजपच्या गळाला लागतील का, अशी शक्‍यताही वर्तवली जात आहे. एक सदस्य भाजपसोबत सहलीला रवाना झाले असल्याचेही खासगीत सांगितले जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सत्तेचे गणित जमवताना कसरत मानली जात आहे. 

दिवाकर रावते यांच्याशी चर्चा 

जयंत पाटील यांनी शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला. आमदार अनिल बाबर, माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि नायकवडी या तीनही नेत्यांशी त्यांनी बोलावे आणि महाविकास आघाडी बनवण्यास मदत करावी, अशी विनंती जयंतरावांनी केली. मी तातडीने यात लक्ष घालतो, तिघांशीही बोलून घेतो, काही काळजी करू नका, असे रावते यांनी जयंतरावांना आश्वस्त केल्याची माहिती मिळाली आहे. 

कॉंग्रेसची बैठक 

कॉंग्रेसने महाविकास आघाडी बनवण्याबाबतच्या घडामोडीत ताकदीने एकजूट दाखविण्यास सुरुवात केली आहे, असे कॉंग्रेस नेत्यांकडून सांगण्यात आले. आमदार मोहनराव कदम, आमदार विक्रम सावंत, युवा नेते विशाल पाटील यांच्यासोबत कॉंग्रेसच्या सात सदस्यांची बैठक झाली. महाविकास आघाडी बनवण्यासाठी सर्वांनी एकजूट दाखवावी, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com