आता पाणी पिण्यासाठीही मुलांना सुटी! 

संजय आ. काटे 
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

शाळेतील बहुतांश विद्यार्थी नियमित पाणी पीत नाहीत. विद्यार्थ्यांनी भरपूर पाणी प्यावे, यासाठी दर दोन तासांनी पाणी पिण्यासाठी "वॉटर बेल' वाजविली जाते. दोन मिनिटांची विश्रांती दिली जाते.

श्रीगोंदे : केरळमधील शाळांच्या धर्तीवर आर्वी पुनर्वसन शाळेत "वॉटर बेल' उपक्रमाची सुरवात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना रोज किमान तीन लिटर पाणी पिण्याची सवय लावण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. "वॉटर बेल' उपक्रम राबविणारी आर्वी पुनर्वसन शाळा ही नगर जिल्ह्यातील पहिली शाळा असावी, असे सांगण्यात आले. 

हेही वाचा बिबट्याच्या दहशतीखाली जगतोय माणूस 

पाणी पिण्यासाठी विश्रांती 
मुख्याध्यापक शरद गावडे, शिक्षक अशोक गुंजाळ व आर्वी-अनगरे ग्रामपंचायतीचे आदर्श ग्रामसेवक अमीर शेख यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला. उपक्रमाची माहिती देताना शेख म्हणाले, ""शाळेतील बहुतांश विद्यार्थी नियमित पाणी पीत नाहीत. विद्यार्थ्यांनी भरपूर पाणी प्यावे, यासाठी दर दोन तासांनी पाणी पिण्यासाठी "वॉटर बेल' वाजविली जाते. दोन मिनिटांची विश्रांती दिली जाते. त्यामुळे विद्यार्थी त्या वेळेत पाणी पितात. पाणी कमी प्यायल्याने डिहायड्रेशन, थकवा येणे, चिडचिड होणे, मूत्रमार्गात संसर्ग होणे, अशा अनेक समस्या निर्माण होतात. विद्यार्थ्यांनी दिवसातून दोन ते तीन लिटर पाणी प्यावे, यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.'' 
सरपंच ज्ञानेश्वर परकाळे, उपसरपंच जालिंदर घोलप, राजश्री इथापे, नंदा घोलप, सचिन घोलप, जयश्री परदेशी, राजेंद्र चव्हाण, युवराज घोलप, बाबूराव शिर्के, अशोक शिर्के आदींच्या उपस्थितीत या उपक्रमाची सुरवात करण्यात आली. 

हेही वाचा ...इथून जाते मृत्यूकडे वाट 

अन्य शाळांत सुरू करणार 
आर्वी येथे तीन जिल्हा परिषद शाळा असून, परिसरात क्षारयुक्त पाणी असल्याने ते पिण्यास अयोग्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पाणी पिण्याचे प्रमाणच कमी आहे. एका शाळेत हा उपक्रम सुरू झाला असून, अन्य शाळाही "वॉटर बेल' उपक्रम सुरू करण्याच्या तयारीत आहेत. 

मुलांसाठी आवश्‍यक उपक्रम : गावडे 
नदीकाठी गाव असल्याने पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळणे मोठी समस्या आहे. त्यामुळे शाळेतील मुलांसह गावातील नागरिकांचे पाणी पिण्याचेच प्रमाण कमी झाले आहे. मुलांचे पाणी पिण्याचे प्रमाण कमी झाल्याने विविध आजार बळवण्यास सुरवात झाली होती. त्यामुळे "वॉटर बेल' उपक्रम सुरू केला असून, गावातील नागरिकांना जास्तीत जास्त पाणी पिण्याबाबत सूचना केल्या आहेत. 
- शरद गावडे, मुख्याध्यापक, आर्वी पुनर्वसन शाळा 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now hault for kids to drink water!