अबब... ! सोलापुरात कांदा पोचला 11 हजारांवर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

0 आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आवक वाढूनही भाव तेजीतच 
0 सोलापुरात आज 205 गाड्यांची झाली आवक 
0 सरासरी भावामध्ये दिवसेंदिवस वाढ 
0 बाजार समितीमध्ये एक दिवसात सात कोटी 80 लाख

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कांद्याच्या भावाने इतिहास केला आहे. मागील आठवड्यात नऊ हजारांवर गेलेला कांदा चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी 11 हजारांवर पोचला. बाजार समितीमध्ये आज 205 ट्रक गाड्यांची आवक झाली होती. आजच्या भाववाढीचे वैशिष्ट्ये म्हणजे बाजारात आवक वाढूनही भाव मात्र तेजीतच असल्याचे दिसून आले.

हेही वाचा : भावी गुरजींच्या खांद्यावर परीक्षांचे ओझे 

बाजार समितीमध्ये 21 नोव्हेंबरला आठ हजार, 22 नोव्हेंबरला नऊ हजार तर 23 नोव्हेंबरला नऊ हजार 600 रुपयांपर्यंत कांद्याचा भाव गेला आहे. आज नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कांद्याच्या भावाने इतिहास घडवत 11 हजाराचा टप्पा पार केला. 11 नोव्हेंबरला सात हजार 700 रुपयांचा भाव एका क्विंटलला मिळाला होता. 
यंदाच्या विक्रमी पावसामुळे अनेक भागातील कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांद्याचे नुकसान झाल्याने साहजिकच बाजारात येणारा कांदा खूपच कमी आहे. सोलापूर बाजार समितीमध्ये यापूर्वी सर्वाधिक 180 ट्रक गाड्यांची आवक झाली होती. मात्र, आज त्यामध्ये वाढ होऊन गाड्यांची संख्या 205 वर गेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरासरी भावामध्येही दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. यापूर्वी तीन हजार 200 रुपयांचा असलेला सरासरी आव आज तीन हजार 800 रुपयांवर पोचला आहे. सोलापूर बाजार समितीमध्ये येणारा कांदा हा बाहेरील राज्य व बाहेरील जिल्ह्यातील आहे. मागील वर्षीची तुलना केली असता त्यामध्ये खूपच फरक पडल्याचे दिसून येते. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये कांदा 500 ते 700 रुपये क्विंटल दराने विकला गेला होता. त्यामुळे सरकारला शेतकऱ्यांना कांद्याला अनुदान द्यावे लागले होते. यंदाच्या वर्षी मात्र चित्र पूर्णपणे पालटले असल्याचे यावरून दिसून येते. 

हेही वाचा : छोट्या पाहुण्याच्या आगमनाचे दांपत्याने केले 'असे' ही स्वागत 

20 हजार क्विंटल कांद्याला सात कोटी 80 लाख 
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 20 हजार 536 क्विंटल एवढ्या कांद्याची आवक झाली. या कांद्याची उलाढाल जवळपास सात कोटी 80 लाख एवढी झाली. म्हणजेच 20 हजार क्विंटल कांद्याला सात कोटी 80 लाख रुपये शेतकऱ्यांना मिळाले. 

हेही वाचा :  एक एकर सीताफळातून ४ लाखांचे उत्पन्न

भाव चढेच राहतील 
दरम्यान, पावसाने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे कोणत्याही स्थितीत सध्या बाजारात येणाऱ्या कांद्याचे प्रमाण कमीच आहे. त्यामुळे भविष्यातही कांद्याचे भाव चढेच राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion reached 11,000 rupay in Solapur