कांद्याला विक्रमी भाव 

विनायक दरंदले
सोमवार, 2 डिसेंबर 2019

घोडेगाव येथे आज सकाळी अकरा वाजता लिलाव सुरू होताच जुन्या गावरान कांद्याला आठ ते दहा हजार भाव मिळू लागला. काही वेळातच हा भाव 13 हजार पाचशे रुपयांपर्यंत गेला. नगर जिल्ह्यासह औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यांतूनही कांद्याची एकूण 6117 गोण्या आवक आज झाली.

सोनई : नेवासे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव (ता. नेवासे) येथील उपबाजार आवारात आज कांद्याला साडेतेरा हजार रुपये प्रतिक्विंटल असा विक्रमी भाव मिळाला. राज्यातील हा विक्रमी भाव असल्याचे सांगण्यात आले. बाजार समितीच्या नोंदीनुसार लिलावात आज अवघ्या दोन तासांत दोन कोटींची, तर व्यापाऱ्यांच्या मते अडीच ते पावणेतीन कोटींची उलाढाल झाली. 

6117 गोण्या आवक 
घोडेगाव येथे आज सकाळी अकरा वाजता लिलाव सुरू होताच जुन्या गावरान कांद्याला आठ ते दहा हजार भाव मिळू लागला. काही वेळातच हा भाव 13 हजार पाचशे रुपयांपर्यंत गेला. नगर जिल्ह्यासह औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यांतूनही कांद्याची एकूण 6117 गोण्या आवक आज झाली. त्यात जुन्या गावरान कांद्याच्या 836 गोण्या होत्या. त्यांपैकी 325 गोण्यांतील कांद्याला व्यापाऱ्यांनी 12 हजार ते 13 हजार पाचशे रुपये भाव दिला. त्यातीलच क्रमांक दोनच्या कांद्याला सहा ते नऊ हजार आणि क्रमांक तीनच्या कांद्याला दोन ते साडेचार हजार रुपये भाव मिळाला. 

हेही वाचा बंधाऱ्यात बुडून युवकाचा मृत्यू 

37 गोण्यांच अडीच लाख 
दरम्यान, घोडेगावच्या बाजारात आज नव्या लाल कांद्याचीही पाच हजार 281 गोण्या आवक झाली. त्यालाही दोन ते पाच हजार रुपये भाव मिळाला. बाजारात पस्तीस आडतदार असून, सर्वच ठिकाणी कांद्याचा भाव तेजीत होता. जुन्या कांद्याला सर्वाधिक भाव मिळालेल्या शिरसगाव येथील शेतकऱ्याला 125 गोण्यांची आठ लाख 33 हजार रुपयांची आणि खुपटी येथील शेतकऱ्याला 37 गोण्यांची अडीच लाख रुपयांची पट्टी मिळाल्याचे सांगण्यात आले. सन 2003 पासून सुरू असलेल्या घोडेगावच्या कांदालिलावात प्रथमच एवढा विक्रमी भाव निघाल्याचे बाजार समिती सचिव देवदत्त पालवे यांनी सांगितले. 

कांद्याला विक्रमी भाव दिल्याबद्दल आडतदार सुदाम तागड, संजय सिकची व भाऊराव बऱ्हाटे यांचा शेतकऱ्यांनी सत्कार केला. या वेळी सुनील झिने, ज्ञानदेव झिने, शरद सोनवणे, प्रकाश झिने हे शेतकरी उपस्थित होते. 

पारदर्शी व्यवहार 
आमदार शंकरराव गडाख यांच्या विशेष प्रयत्नातून घोडेगावला कांदालिलाव सुरू झाला. आदर्श व पारदर्शी व्यवहारांसाठी त्यांचा नेहमीच आग्रह व लक्ष आहे. यामुळेच शेतकरीहिताचे काम होत आहे. 
- सुदाम तागड, कांदाआडतदार 

शेतकरीहिताची बाजार समिती 
बाजार समितीचा कांदालिलाव पारदर्शी व शेतकरीहिताचा आहे. येथे कुठलीही साखळी पद्धत व अडवणूक होत नाही. 
- विलास लंघे, शेतकरी, शिरसगाव 

क्‍लिक करा इथं पाणी पण मिळत नाही 
 

नेप्ती, वांबोरीत दहा हजारांपर्यंत भाव 
नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार आवारात लाल व गावरान कांद्याची एकूण 19 हजार 324 गोण्या आवक झाली. त्यात फक्त 325 गोण्या गावरान कांद्याच्या होत्या. वांबोरी उपबाजारात 1764 गोण्या आवक झाली. त्यात 161 गोण्या गावरान कांद्याच्या होत्या. गावरान कांद्याची आवक मंदावल्याने त्याला दोन्ही ठिकाणी आठ ते दहा हजार रुपये भाव मिळाला. 

गावरान कांद्याचा प्रतवारीनुसार भाव ः 
वांबोरी ः क्रमांक एक ः 8000 ते 10000, दोन ः 6500 ते 7900, तीन ः 2000 ते 6400, गोल्टी ः 7500 ते 8100. 
नेप्ती ः क्रमांक एक ः 8100 ते 10000, दोन ः 6100 ते 8000, तीन ः 4100 ते 6000. 

लाल कांद्याचा प्रतवारीनुसार भाव ः 
नेप्ती ः क्रमांक एक ः 8100 ते 10000, दोन ः 6100 ते 8000, तीन ः 3100 ते 6000 
वांबोरी ः क्रमांक एक ः 7000 ते 9200, दोन ः 3000 ते 6500, तीन ः 500 ते 2900, गोल्टी ः 4500 ते 5000. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion record prices