मूडच नाही...! त्यांना आता वेध खवय्यांचे

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 September 2020

प्रत्येक हॉटेलची पार्सलची उलाढाल अवघी २० ते २५ टक्केपर्यंतच आहे. तर जिल्ह्यात २५ टक्के हॉटेलमधूनच पार्सलची सुविधा सुरू आहे.

सांगली : कोरोनाचा फटका हॉटेल व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. पार्सलची सुविधा दिल्यामुळे थोडाफार दिलासा मिळाला आहे; परंतु प्रत्येक हॉटेलची पार्सलची उलाढाल अवघी २० ते २५ टक्केपर्यंतच आहे. तर जिल्ह्यात २५ टक्के हॉटेलमधूनच पार्सलची सुविधा सुरू आहे. इतर हॉटेलना पार्सलऐवजी ग्राहकांनी हॉटेलमध्ये येण्याची प्रतीक्षा आहे.

हेही वाचा - सांगलीत किसान क्रेडिट कार्ड योजनेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष...

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पहिल्या टप्प्यात लॉकडाउन जाहीर केल्यानंतर हॉटेल, ढाबे, नाष्टा सेंटर बंद करण्याचे आदेश झाले. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो हॉटेल बंद झाली. तर बऱ्याच हॉटेलमधील परप्रांतीय आणि परजिल्ह्यातील कामगार गावाकडे परतले. लॉकडाउननंतर अनलॉकची प्रक्रिया जाहीर करताना हॉटेल आणि नाष्टा सेंटर यांना पार्सल सुविधेचा पर्याय दिला. तर ज्या हॉटेलमध्ये लॉजिंगची व्यवस्था असेल तेथे ग्राहकांना थेट बसून खाण्यास परवानगी दिली.

पार्सल सुविधा सुरू केल्यानंतर त्यासाठी सायंकाळी ७ पर्यंत मुदत दिली आहे. पार्सलसाठी परवानगी दिल्यानंतर लॉकडाउन काळात नुकसान सोसलेल्या काहीजणांनी तातडीने हॉटेल्स, नाष्टासेंटर सुरू केली. परंतू त्यांना सुरवातीच्या काळात ग्राहकांची प्रतिक्षा करावी लागली. अद्याप ग्राहकांच्या मनात कोरोनाची धास्ती आहे. तशातच कोरोनाचे रूग्ण वाढत असल्यामुळे मध्यंतरी पार्सलकडे ओढा असलेल्या ग्राहकांनी घरच्या खाण्याला पसंती दिली आहे. सध्याचे जिल्ह्यातील चित्र बघितले तर गेल्या काही दिवसात बऱ्याच हॉटेल्सनी पार्सल सुविधा सुरू केली आहे. परंतू जिल्ह्यातील हॉटेल्सच्या तुलनेत अवघ्या ५० टक्के मालकांनी पार्सल सुविधा सुरू केली आहे. तसेच त्यांची दिवसाची उलाढाल इतरवेळीपेक्षा २० ते २५ टक्के इतकीच आहे.

हेही वाचा -  पेड पाझर तलावाच्या पिचिंगवर झाडे उगवल्याने धोका...

नावाजलेल्या हॉटेल्स व नाष्टासेंटरची उलाढाल बऱ्यापैकी आहे. इतर हॉटेल्स सध्या नुकसान सोसून ग्राहकांची प्रतिक्षा करत आहेत. तर शहराबाहेरील काही हॉटेल्स व ढाबा चालकांनी किती काळ नुकसान सहन करायचे म्हणून बिनधास्तपणे ग्राहकांना बसून जेवणाची सुविधा देऊ केली आहे. सध्या प्रशासन व पोलिस देखील कोरोनाच्या सावटाखाली असल्यामुळे त्यांच्याकडून कारवाईबाबत उदासिनता दिसून येते. हॉटेल व्यवसायिक कोरोनामुळे संकटात सापडले असून त्यांना ग्राहक हॉटेलमध्ये येण्याच्या आदेशाची प्रतिक्षा लागून राहिली आहे.

"सध्या जिल्ह्यातील २५ टक्के हॉटेल्समधूनच पार्सलची सुविधा आहे. उलाढाल देखील कमी आहे. परगावच्या ग्राहकांना पार्सल घेतल्यानंतर ते कोठे खायचे असा प्रश्‍न आहे. शासनाने पार्सलसाठी रात्री ९ पर्यंत वेळ वाढवण्याची गरज आहे. तसेच लवकरात लवकर ग्राहकांना थेट हॉटेल्समध्ये बसून खाण्यासाठी आदेश काढावा अशी आमची मागणी आहे."

-लहू भडेकर, (जिल्हाध्यक्ष, खाद्यपेय विक्रेता मालक संघ)

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: only 25 percent parcel service provided by a hotel in corona period