ट्रकवर वाळू उतरवण्याचे काम करणाऱ्यांनी कशा केल्या २४ घरफोड्या ? वाचा

Police Investigate 24 House Robbery Case Three Arrested
Police Investigate 24 House Robbery Case Three Arrested

कोल्हापूर - ट्रकवर वाळू उतरविण्याचे काम करणाऱ्या दोघांनी जिल्ह्यात घरफोड्या केल्याचे उघड झाले आहे. खून प्रकरणात तपास करताना पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. या दोघा संशयितांनी साथीदारांच्या मदतीने जिल्ह्यात केलेल्या 24 घरफोड्यांसह 28 गुन्हे केल्याचे उघड करण्यात करवीर पोलिसांना यश आले. चोरीतील सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा व्यवहार करणारा उचगाव (ता. करवीर) येथील सराफासह तिघांना या प्रकरणी अटक केली. त्यांच्याकडून 1 किलो पाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने, तीन किलो 880 ग्रॅमचे दागिने असा 33 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

सुनील श्रीहरी शिंदे (वय 24, रा. अकलूज, ता. सोलापूर), रामलू निळबा चव्हाण (वय 34, रा. तमलूर, ता. देगलूर, नांदेड), सराफ अशोक मनोहर सावंत (वय 50, रा. लक्ष्मी गल्ली, पापाची तिकटी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांचा साथीदार धनाजी श्रीहरी शिंदे (रा. अकलूज) या संशयितांचा शोध सुरू आहे. 

गोकुळ शिरगावमध्ये घरफोडी

गोकुळ शिरगाव, खापरे मळा येथे 1 फेब्रुवारीला खिडकीचा आधार घेत घरफोडे रात्री आत शिरले. त्यांनी घरातील मीना संकपाळ (वय 55) व त्यांचे पती विठ्ठल संकपाळ यांच्यावर हत्याराने हल्ला केला. त्यानंतर घरातील साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे दागिने पळविले केले होते. हल्ल्यात जखमी झालेल्या संकपाळ यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा करवीरचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांच्या टीपवरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छडा लावला होता. याप्रकरणी संशयित सुनील शिंदे व रामलू चव्हाण यांना अटक केली होती. दाखल घरफोडीच्या गुन्ह्यातील तपासासाठी त्या दोघांना करवीर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. यावेळी अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, करवीर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर उपस्थित होते. 

असा लागला छडा... 

जीवबा नानापार्क येथे घरात झोपलेल्या महिलेवर प्राणघातक हल्ला करून घरातील ऐवज लूट केल्याच्या गुन्ह्याची चौकशी संशयित सुनील शिंदे व रामलू चव्हाण यांच्याकडे पोलिस निरीक्षक सुनील पाटील व त्यांच्या पथकाने सुरू केली. सुरवातीला त्या दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्या दोघांचे मोबाईल लोकेशन तपासले. त्यात घरफोडी दिवशी त्या दोघांचे मोबाईल जिवबा नाना पार्क येथे असल्याचे दाखवत होते. त्यानुसार त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी सुरू केली. त्यात सुनील त्याचा भाऊ संशयित धनाजी शिंदे साथिदार रामलूच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्या तिघांचे मोबाईल लोकेशन सापडेल त्या त्या ठिकाणी झालेल्या 24 घरफोड्यासह 28 गुन्हे उघडकीस आणले. चोरीचा ऐवजाचा खरेदी विक्रीचा व्यवहार त्या तिघांनी उचगाव येथील सराफ अशोक सावंतशी केल्याची माहिती पुढे आली. त्याच्यावरही गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली. त्या तिघांकडून चोरीचे 105 तोळे वजनाचे सोन्याचे, 3 किलो 880 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा 33 लाख 10 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले. 

सराफाबरोबर साधली जवळीक... 

संशयित सुनील शिंदे, रामलू चव्हाण यांच्यावर सोलापूर जिल्ह्यात घरफोडीसह विविध गुन्हे दाखल झाले होते. पोलिसांच्या कारवाईच्या भितीने ते दोघे कोल्हापुरात वास्तव्यास होते. ट्रकवर वाळू उतरण्याचे काम करत असताना ते पाणी मागण्याच्या बहाण्याने बंगले हेरायचे. त्यानंतर घरफोड्या करायचे. वाळू उतरविण्याचे काम करत असताना संशयित सुनील शिंदे हा उचगाव येथील अशोक सावंतच्या दुकानात गेला. तेथे त्याची तोंडओळख झाली. त्यानंतर तो दुकानाजवळ बसून असायचा. त्यातून त्या दोघांची ओळख वाढली. त्याने अशोककडून सोन्याचे दागिने करून घेतले. त्यानंतर वाढलेल्या संपर्काचा फायदा घेत त्याने चोरीचे दागिने त्याला विकण्यास सुरवात केली. त्याने त्याच्या आठ सराफ मित्राच्या मदतीने चोरीच्या दागिन्यांचा व्यवहार केला. पापाची तिकटी जवळ राहणारा सावंत हा गेल्या 35 वर्षापासून सराफ व्यवसायक करतो. तो चोरीतील सोन्याचा व्यवहार इतर सराफांच्या ओळखीचा फायदा घेऊन करत होता. गिऱ्हाईकाला पैशाची अडचण असल्याचे सांगून सोने गहाण ठेवत असल्याची माहिती तपासात पुढे आल्याचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी सांगितले. 

उघड झालेले पोलिस ठाणे अंतर्गत गुन्हे... 

गोकुळ शिरगाव 3 
शिरोली एमआयडीसी - 1 
गांधीनगर - 4 
गोकुळ शिरगाव - 3 
कागल - 2 
मुरगूड - 4 
वडगाव - 2 
राजारामपुरी - 2 
जुना राजवाडा - 2 
यात खूनासह जबरी चोरीचा 1, घरात घुसून जबरी चोरी 2, चोरी घरफोडीचे 24 व मोटारसायकल चोरीचा 1 गुन्ह्याचा समावेश आहे. 

तपासी अधिकारी कर्मचारी... 

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, करवीरचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील, सहायक पोलिस निरीक्षक अरविंद कांबळे, उपनिरीक्षक विवेकानंद राळेभात, विक्रम चव्हाण, कर्मचारी प्रशांत माने, राजेंद्र जरळी, सुहास पाटील, गुरुप्रसाद झांबरे, दीपक घोरपडे, युक्ती ठोंबरे, राम माळी यांनी या प्रकरणाचा यशस्वी तपास केला. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com