मोदींची डिग्री कोणत्‍या विद्यापीठाची

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 January 2020

लोकशाहीच्या निर्देशांकामध्ये भारत 41 व्या स्थानावर होता. आता तो 51 व्या स्थानावर घसरला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय संविधान असुरक्षित असल्याची भावना आहे. हा कायदा सरकारने रद्द करावा. भारताचे सध्याचे दरडोई उत्पन्न दोन हजार डॉलर आहे. ते दुपटीने वाढविले पाहिजे. मोदींच्या नेतृत्वाखाली अर्थव्यवस्थेचा विकास ढासळला आहे, असा आरोपही श्री. चव्‍हाण यांनी केला.

सातारा : अर्थसंकल्पाच्या बैठका पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा हे स्वत:च घेत आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना या बैठकांना बोलावतही नाहीत. कोणत्या विद्यापीठातून डिग्री घेतली, ते मोदी सांगू शकत नाहीत. त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची? स्वत:ला सगळे काही कळते असे समजून त्यांनी अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले आहे, अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केली. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वांत भ्रष्टाचारी सरकार फडणवीसांचे होते. ते थांबविण्यासाठीच तीन पक्ष एकत्र आले, असेही त्यांनी नमूद केले. 

हे वाचा - म्‍हणून अल्‍पवयीन प्रियकर, मुलीने केला बापाचा खून

येथील कॉंग्रेस भवनात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, ""केंद्रीय अर्थसंकल्प घोषित करण्यासाठी वेळापत्रक निश्‍चित केले जाते. अर्थमंत्री हे विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची बैठक घेतात. यावेळी पहिल्यांदाच ही परंपरा खंडित झाली. अर्थसंकल्पासाठी झालेल्या 13 बैठका या नरेंद्र मोदी, अमित शहा यांनीच घेतल्या. अर्थमंत्री सीतारामन यांना बैठकांना बोलाविलेही नव्हते. त्यांची कामगिरी सुमार आहे, त्यांच्यावर विश्‍वास नसेल तर महिलेचा अवमान करण्यापेक्षा त्यांनी अर्थमंत्री बदलावा.'' 

आणखी वाचा - राज ठाकरे यांच्या हिंदुत्वामागे शरद पवार यांचं डोकं

भारताचे सध्याचे दरडोई उत्पन्न दोन हजार डॉलर आहे. ते दुपटीने वाढविले पाहिजे. मोदींच्या नेतृत्वाखाली अर्थव्यवस्थेचा विकास ढासळला आहे. माजी आर्थिक सल्लागार सुब्रह्मण्यम यांनी मोदी सरकार विकासदराचे आकडे 2.5 टक्‍क्‍यांनी फुगवून सांगत आहेत, असा आरोप केला आहे. त्यावरून हा विकासदर केवळ दोनच टक्‍के आहे, असे समोर येत आहे. आमच्या सरकारच्या काळात 2010-11 मध्ये हा विकासदर 10.8 टक्‍के होता, असेही त्यांनी नमूद केले. 

नोटाबंदीने अर्थव्यवस्थेवर तर, आता "सीएए', "एनआरसी'ने संविधानावर हल्ला केला आहे, अशी टीका करत श्री. चव्हाण म्हणाले, ""सीएए, एनआरसी या कायद्यांत मूलभूत बदल करून देशाच्या संविधानावर हल्ला केला आहे. शहा, मोदींमध्ये विसंगती आहे. मोदींना शहांनी खोटे पाडले आहे. लोकशाहीच्या निर्देशांकामध्ये भारत 41 व्या स्थानावर होता. आता तो 51 व्या स्थानावर घसरला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय संविधान असुरक्षित असल्याची भावना आहे. हा कायदा सरकारने रद्द करावा.'' 

हेही वाचा - आरोग्याचा धुरळा... तुम्‍ही आहात याचे शिकार?

राज्यात 2014 च्या निवडणुकीनंतर भाजप अल्पमतात होते. त्यावेळी शिवसेनेबरोबर सरकार का झाले नाही, हा प्रश्‍न वेगळा आहे. त्यावेळी शिवसेनेबरोबर जाण्याची परिस्थिती नव्हती. त्यावेळी निर्णय घ्यायला हवा होता, हे आता वाटते, असे सांगून श्री. चव्हाण यांनी राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माझे चांगले जुळते, असेही त्यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prithviraj Chavan Criticizes PM Narendra Modi