कंकणाकृती सूर्य ग्रहण हाेते कसे ..?

Sangli -Kolhapur  Bracelet Sun Information :
Sangli -Kolhapur Bracelet Sun Information :

सांगली : कंकणाकृती सूर्य ग्रहण हा सर्व ग्रहणांतील अत्यंत देखणा नजारा येत्या 26 डिसेंबरला पहायला मिळणार आहे. या पुढे असा अविष्कार 2034 साली घडेल. त्यामुळे 15 वर्षे वाट पहाण्यापेक्षा प्रत्येकाने कोणतीही भिती न बाळगता आत्ताच ही संधी साधावी. 

चंद्र-सूर्यांमधील लपंडावा पहा 

येत्या 26 डिसेंबरला सकाळी 8 वाजून 4 मिनिटांपासून आकाशाच्या विशाल पडद्यावर चंद्र-सूर्यांमधील लपंडावाचे हे महानाट्य सुरु होईल. त्याचे मध्यांतर 9 वाजून 22 मिनिटांनी असेल. तर शेवट (मोक्ष) 10.55 मिनिटांनी असेल. तब्बल 2 तास 51 मिनिटांचा अद्‌भूत नजारा असेल.

सांगली, कोल्हापूरमधे 83.58 टक्‍क्‍ये सूर्य ग्रहण

सांगली, कोल्हापूरमधून 83.58 टक्‍क्‍यांपर्यंत दिसेल. केरळ, कर्नाटक व तामिळनाडू मधील काही भागांत ते पूर्ण कंकणाकृती दिसेल. उर्वरित भारतातून मात्र ते खंडग्रास दिसेल. सौदी अरेबिया, कतार, दक्षिण भारत व इंडोनेशिया या देशांच्या भूप्रदेशावरून 118 किलमोटीर रुंदीचा प्रतिछायेचा (Antumbra) पट्टा जात असलेने या भागातून सूर्यबिंब कंकणाकृती दिसेल. 

सूर्य ग्रहणासाठी सरळ रेषेत तीन्ही  ग्रह महत्वाचे

सूर्य ग्रहणासाठी अमावस्येची तिथी (सूर्य-पृथ्वीच्या मध्ये चंद्र अशी स्थिती) शिवाय हे तीनही आकाशस्त गोल एका सरळ रेषेत येणे आवश्‍यक असते. पृथ्वी-चंद्र हे गोल स्वयंप्रकाशीत नसलेने, सूर्य प्रकाशामुळे त्यांच्या मोठाल्या सावल्या (गडद, विरळ) अंतराळात सदोदित पडलेल्या असतात. जेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते तेव्हा गडद सावलीच्या पट्ट्यातील लोकांना चंद्रबिंबाच्या आड सूर्य पूर्णपणे झाकलेला (खग्रास) दिसतो, तर विरळ पट्ट्यातून सूर्याचा काही भागच ग्रासलेला (खंडग्रास) दिसतो. 

अमावस्येची स्थिती नेमकी कशी

चंद्राची भ्रमण कक्षा लंबवर्तुळाकार असलेने काही वेळा तो पृथ्वीच्या जवळ उपभू बिंदूवर (3,56,500 किलोमीटर) तर काही वेळा दूर ( 4, 06,700 किलोमीटर) अपभू बिंदूवर असतो. अपभू स्थितीत असताना चंद्र बिंबाचा आकार नेहमीपेक्षा थोडा लहान दिसतो. अशा वेळी अमावस्येची तिथी आणि हे तीनही गोल सरळ रेषेत आले तर सूर्य ग्रहण घडते. पण लहान दिसणारा चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. परिणामी सूर्य बिंबाचा कडेचा भाग एखाद्या रिंगेप्रमाणे तेजस्वी दिसत राहतो. या खगोलीय घटनेस कंकणाकृती सूर्य ग्रहण म्हणतात.

15 कोटी किलोमीटरवरील सूर्य झाकला जाणार

यावेळी चंद्र दूर अंतरावर असलेने त्याची गडद सावली पृथ्वीवर पोहोचत नाही. या सावली खालील भागातून कंकणाकृती, तर विरळ सावलीतून खंडग्रास सूर्य ग्रहण पाहायला मिळते. कंकणाकृती आविष्कार अत्यंत देखणा, विलक्षण नयनरम्य, मंत्रमुग्ध करणारा असतो. हे कंकणाकृती सूर्य ग्रहण अंतराळात खूप दूरवर घडणार आहे. 15 कोटी किलोमीटरवरील सूर्य, 4 लाख किलोमीटरवरील चंद्राच्या आड काही काळ झाकला जाणार आहे. 
शंकर शेलार, खगोल अभ्यासक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com