माझ्‍यासमोरच अंगणवाडी सेविकेचा खून 

Dhom Wai Murders Case
Dhom Wai Murders Case

सातारा : अंगणवाडी सेविका मंगला जेधे हिचा इंजेक्‍शन देऊन संतोष पोळने माझ्यासमोर खून केला. त्यानंतर तिच्या अंगावरील दागिने व रोख रक्कम लुटल्याची साक्ष वाई- धोम हत्याकांडातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरेने काल (शुक्रवारी) जिल्हा न्यायालयात दिली. पोळच्या सांगण्यावरून तिचा मोबाईल घेऊन पुण्याला जाऊन ती जिवंत असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केल्याचेही ती म्हणाली. 

संपूर्ण जिल्ह्याला हादरवणाऱ्या व राज्यात चर्चेच्या ठरलेल्या या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश एन. एल. मोरे यांच्यासमोर सुरू आहे. विशेष सरकारी वकील उज्वल निकम सरकार पक्षातर्फे काम पाहात आहेत. कालपासून या खटल्यात माफीची साक्षीदार बनविण्यात आलेली पोळची साथीदार ज्योती मांढरे हिची साक्ष सुरू आहे. काल तिने पोळने माझ्यासमोर तीन खून केल्याचे तसेच यापूर्वी तीन खून एकट्याने केल्याचे त्याने सांगितले, अशी साक्ष दिली होती. आज तिची पुढील साक्ष घेण्यात आली. या वेळी मंगला जेधे हिचा खून कशा पद्धतीने करण्यात आला, हे तिने सांगितले. 

ज्योती म्हणाली, ""16 जून 2016 ला संतोषने मंगला यांच्या खूनचा प्लॅन मला सांगितला होता. त्यासाठी सोने दुप्पट करून देतो, असे त्याने मंगला यांना सांगितले होते. मंगला यांना त्यांच्या मुलीच्या बाळंतपणासाठी पुण्याला जायचे होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडील सर्व सोने व दीड लाख रुपये रोख रक्कम सोबत घेतले होते. पोळच्या सांगण्यावरून 16 ला पहाटे मी त्यांना दुचाकीवरून पोळच्या पोल्ट्री फार्मवर आणले होते.

त्यानंतर लांबचा प्रवास करायचा असल्याने थकवा न येण्यासाठी इंजेक्‍शन देतो, असे सांगून पोळने त्याच्याकडील विषारी इंजेक्‍शन त्यांना दिले. इंजेक्‍शन दिल्यानंतर त्या तडफडू लागल्या. त्यामुळे मी व पोळने त्यांचे हातपाय पकडून धरले. त्यांचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर पोळने ""अब मर गई साली'' असे म्हणत त्यांच्या अंगावरील सोने, तसेच त्यांच्या बॅगमधील दीड लाख रुपये काढून घेतले.

आणखी वाचा - Republic Day 2020 : जाणुन घ्या... महाराष्ट्राचे चित्ररथ केव्हा नव्हते संचलनात
 
त्यानंतर मंगला जिवंत असल्याचे, तसेच त्याच्याकडीलच सोने लुबाडून गायब झाल्याचे भासवण्यासाठी पोळनेच त्यांचा मोबाईल माझ्याकडे दिला व पुण्याला जाण्यास सांगितले. पुण्यात गेल्यानंतर मंगला यांचा मोबाईस सुरू कर, कोणाचा फोन आला तर तो घ्यायचा; पण काहीही बोलायचे नाही असेही त्याने सांगितले होते. त्यानुसार मी पुण्यात गेल्यावर मंगला यांचा फोन सुरू केला. मात्र, फोन आल्यावर पोळने सांगितल्याप्रमाणे काही बोलली नाही. त्या वेळी पोळचाही फोन आला होता. त्याने ""मॅडम तुम्ही माझे सगळे काही घेऊन गेला आहात, प्लिज माझा फोन घ्या,'' असे तो फोनवर म्हणत होता. त्यानंतर त्याच दिवशी दुपारी तीनला त्याने फोन करून मला वाईला बोलवून घेतल्याचेही ज्योतीने सांगितले. 

संतोषने तिच्या वडिलांना एक चिठ्ठी वाचायला लावून मंगला यांचे अपहरण झाल्याचे भासविण्याचाही प्रयत्न केल्याचे ज्योती साक्षीत म्हणाली. ती म्हणाली, ""30 जून 2016 ला पोळच्या सांगण्यावरूनच मी वडिलांना घेऊन कोल्हापूरला गेले. तिथे पोळने लिहून दिलेली एक चिठ्ठी त्यांना वाचण्यास सांगितले. त्या चिठ्ठीवर ""तुझे पोलिस ठाणे मे जाने की इतनी क्‍या जल्दी थी'' असे लिहिले होते. त्यानंतर पोळचा फोन आला. त्याने माझ्या वडिलांना चिठ्ठीवरील मजकूर वाचण्यास सांगितले. तो त्याने फोनवर रेकार्ड केला.

त्यामाध्यमातून त्याने मंगला यांचे अपहरण झाल्याचा बनाव केला, असेही ज्योती म्हणाली. या वेळी पोळने मंगला यांचा खून करण्यासाठी वापरलेले इंजेक्‍शन, विषारी औषधाची बाटली, तसेच मंगला यांच्याकडील बॅग न्यायालयात आज ओळखली. या खटल्याची पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com