पाहुण्याच्या मृत्यूचा अहवाल आला पॉझिटिव्ह अन् चुकला कोळकीकरांचा काळजाचा ठोका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू न देण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामधील घरांमध्ये मागणीनुसार अत्यावश्‍यक वस्तू पुरवण्यात येतील अशी माहिती सरपंच पुष्पांजली नाळे यांनी दिली.

कोळकी (जि.सातारा) ः येथील अक्षतनगरमध्ये मुंबई येथून आलेल्या एका कोरोना पॉझिटिव्ह पाहुण्याच्या मृत्यूने नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या संपर्कातील 15 जणांची डोकेदुखी वाढली असून, त्यांना विलगीकरण कक्षात हलवले आहे.
 
मुंबईच्या कुर्ला भागातून ता. 18 रोजी 74 वर्षांचे एक वयोवृद्ध व्यक्ती हे अक्षतनगरमधील पाहुण्यांकडे आले होते. आल्यानंतर दोन तासांतच अचानक त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर त्यांचा कोरोना अहवाल मिळविण्यासाठी स्वॅब तपासणीसाठी पाठवला होता. त्याचा अहवाल काल रात्री पॉझिटिव्ह आल्याने परिसरामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी अक्षतनगरचा हॉटेल ब्रह्मापासून बस स्टॉप ते आरोग्य उपकेंद्रपर्यंतचा संपूर्ण भाग संक्रमणशील क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. त्यानंतर गटविकास अधिकारी अमिता गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा भाग सील करण्यात आला असून, या भागामधील सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्याचे, तसेच कोणीही व्यक्ती घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीमार्फत परिसर सील करून औषध फवारणीचे काम सुरू झाले आहे. आरोग्य केंद्रामार्फत या भागातील घराघरांत तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये डॉ. जगदाळे, डॉ. शिंदे, खंदारे, दोन आशाताई व एक अंगणवाडी सेविकेचा समावेश आहे. नागरिकांनी प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले.

मृत्युमुखी पडलेल्या बाधिताच्या संपर्कात 12 हाय रिस्क व तीन लो रिस्क व्यक्ती आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्या सर्वांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्या अहवालाकडे आता कोळकीकरांचे डोळे लागले आहेत. पोलिसांनी या भागामध्ये गस्त वाढवली आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू न देण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामधील घरांमध्ये मागणीनुसार अत्यावश्‍यक वस्तू पुरवण्यात येतील. 
- पुष्पांजली नाळे, सरपंच

सातारा : कोरोना बाधितांची संख्या वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांची स्ट्रॅटजी

सातारा : एसटीची चाके फिरणार; 31 बसच्या 101 फेऱ्या

पृथ्वीराज चव्हाणांचे विचार स्तुत्यच; कॉंग्रेसचा पूर्णतः पाठिंबा

ठाकरे सरकार लक्ष देईना; शेतकऱ्यांच्या डाेळ्यांत अश्रु

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara 12 Citizens Are Afrain Kolki