सातारा : एसटीची चाके फिरणार; 31 बसच्या 101 फेऱ्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

शासनाच्या निर्देशाची उद्यापासून (ता. 22) अंमलबजावणी होणार असल्यामुळे प्रवाशांची सेवा करण्यासाठी एसटीच्या अधिकाऱ्यांनी उत्साहाने आज गाड्यांचे नियोजन केले.

सातारा : लॉकडाउनमुळे तब्बल दोन महिने "प्रवाशांच्या सेवेसाठी' या आपल्या ब्रीद वाक्‍यापासून दूर गेलेली लालपरी उद्यापासून पुन्हा सर्वसामान्य नागरिकांसाठी रस्त्यावर धावणार आहे. त्यासाठी जिल्ह्यामधील प्रामुख्याने तालुक्‍यांच्या ठिकाणांवरून 31 एसटी बसच्या 101 फेऱ्यांचे राज्य परिवहन महामंडळाने नियोजन केले आहे. 

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी 23 मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाउन घोषित करण्यात आले. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाची एसटी बससेवाही बंद झाली आहे. स्थापनेपासून प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्‍य घेऊन "बंद'चा अपवाद वगळता लालपरीची चाके राज्यातील रस्त्यांवर अहोरात्र फिरत होती. इतिहासात कधीही एवढ्या दीर्घकाळ एसटीची चाके थांबली नव्हती. एसटी बंद असली की महाराष्ट्राचा श्‍वासच थांबल्यासारखी परिस्थिती व्हायची. परंतु, कोरोना संसर्गाच्या धास्तीने गेले तब्बल दोन महिने एसटीची सेवा सर्वसामान्यांसाठी बंद आहे.
 
चौथ्या लॉकडाउनमध्ये झोनचे वर्गीकरण करण्याचे अधिकार केंद्राने राज्यांना दिले. त्यानुसार राज्याने रेड झोन व नॉन रेड झोन अशा दोन वर्गांत राज्याची विभागणी केली. नॉन रेड झोनमध्ये जिल्हाअंतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्यास राज्य सरकारने नुकतीच परवानगी दिली आहे. नव्या निकषांत तिसऱ्या लॉकडाउनमध्ये रेड झोनमध्ये असलेला सातारा जिल्हा हा रेड झोनच्या बाहेर आलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एसटी बस सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. शासनाच्या निर्देशाची उद्यापासून (ता. 22) अंमलबजावणी होणार असल्यामुळे प्रवाशांची सेवा करण्यासाठी एसटीच्या अधिकाऱ्यांनी उत्साहाने आज गाड्यांचे नियोजन केले. सुरवातीच्या टप्प्यात प्रवाशांचा प्रतिसाद कसा मिळतो, हे पाहण्यासाठी तसेच एकदम गर्दीची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी तालुका ठिकाणांपर्यंत जाणाऱ्या 31 बसगाड्यांच्या 101 फेऱ्यांचे नियोजन विभागीय कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. 

...या मार्गावर धावणार बस 

सातारा आगारातून सातारा-पुसेसावळी चार फेऱ्या, कऱ्हाड आगारातून कऱ्हाड-शिरवळ दोन फेऱ्या, पारगाव-खंडाळा आगाराच्या शिरवळ-कऱ्हाड दोन तर, लोणंद-सातारा अशा चार फेऱ्यांचे नियोजन आहे. कोरेगाव आगारातून कोरेगाव-कऱ्हाड सहा फेऱ्या, फलटण आगारातून फलटण- सातारा सात फेऱ्या, फलटण-लोणंद सहा फेऱ्या, वाई आगारातून वाई-सातारा सहा, पाटण आगारातून पाटण-सातारा आठ तर, पाटण-कऱ्हाड सहा फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. दहिवडी आगारातून दहिवडी-सातारा चार, दहिवडी-कऱ्हाड तीन, दहिवडी-म्हसवड सहा, महाबळेश्‍वर आगारातून महाबळेश्‍वर-सातारा आठ, महाबळेश्‍वर-वाई 12, मेढा आगारातून मेढा-सातारा सात, वडूज आगारातून वडूज-सातारा चार, वडूज-कऱ्हाड चार, औंध-सातारा दोन फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. 

सरपंच म्हणतात मुंबईकर आमच्या जिवा भावाचाच पण...

एका बसमध्ये फक्‍त 20 प्रवासी 

प्रवाशांची सेवा एसटी पुन्हा सुरू करत आहे. यावेळी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार गाड्यांचे सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे. एसटीत चढणाऱ्या प्रवाशांचे हातही सॅनिटायझर्स केले जाणार आहेत. शारीरिक अंतर राखण्यासाठी एका एसटीतून केवळ 20 प्रवाशांनाच नेले जाणार आहे. तसे असले तरी, तिकीट दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. परंतु, 20 प्रवासी झाल्यानंतरच एसटी हलविण्यात येणार असल्याची नोंद प्रवाशांनी घ्यावी. प्रवाशांचा प्रतिसाद विचारात घेऊन आणखी गाड्या सोडण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे विभागीय वाहतूक अधिकारी विजय मोरे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

सातारा : दुकानांसह वाहतूक उद्यापासून खुली; काळजी घेण्याची सूचना

मग अर्णवचा मृत्यू कशामुळे ?

सासरे अन्‌ जावयाने वाढवली गादेवाडीकरांची चिंता


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara State Transport Bus Service Starts From Friday