मुंबईकर म्हणतात शाळांत क्वारंटाइन नकाे रे बाबा

मुंबईकर म्हणतात शाळांत क्वारंटाइन नकाे रे बाबा

ढेबेवाडी (जि.सातारा) : गावच्या शाळेत तुमच्या मुक्कामाची सोय केली आहे. घरात थांबायचे झाल्यास चौदा दिवस बाहेर पडता येणार नाही. त्यामुळे काय ते ठरवा आणि आम्हाला कळवा, असे निरोप पाटण तालुक्‍यातील गावागावांतून मुंबईत पोचल्याने तिकडे अडकून पडलेल्या अनेक कुटुंबांची अवस्था "इकडे आड आणि तिकडे विहीर' अशीच झाली आहे. गावाकडे जावे की आहे तिथंच थांबावे..? अशा द्विधा मनःस्थितीत सध्या ही कुटुंबे आहेत.
 
लॉकडाउनच्या काळात वाहतूक बंद असतानाही मुंबईसह बाहेरगावी असलेल्या पाटण तालुक्‍यातील सुमारे 68 हजार नागरिकांनी नवनव्या युक्‍त्या शोधत घर गाठले. मात्र बाकीचे तिकडेच अडकून पडले आहेत. आता लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर नोंदणी, पासेस, आरोग्य तपासणी या प्रक्रिया करून होम क्वारंटाइन करून घेण्याच्या अटीवर त्यांना गावी जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र छोटी घरे, स्वतंत्र खोल्यांचा अभाव, दाटीवाटीची लोकवस्ती यामुळे गावच्या घरात या मंडळींना होम क्वारंटाइन करणे अनेक ठिकाणी शक्‍य नाही. त्यामुळे गाव व परिसरातील शाळांमध्ये त्यांना ठेवण्याचेही नियोजन करण्यात येत आहे. त्याबाबतची माहिती मोबाईलद्वारे मुंबईकरांपर्यंत पोचल्याने तिकडे अडकून पडलेल्या अनेक कुटुंबांची अवस्था इकडे आड आणि तिकडे विहीर अशीच काहीशी झालेली आहे. गावाकडे जावे, की आहे तिथेच राहावे..? अशा द्विधा मनःस्थितीत सध्या अनेक कुटुंबे आहेत. त्यामुळे काही कुटुंबांनी पुणे- मुंबईत जिथे आहे तिथेच थांबणे पसंत केल्याची चर्चा आहे. पाटण तालुक्‍यातील लाखभर नागरिक अजून पुणे, मुंबई, कऱ्हाड, आगशिवनगर, मलकापूरसह अन्य शहरांमध्येच असून, हळूहळू ते गावी यायला सुरुवात झाली आहे. मात्र हा ओघ म्हणावा तेवढा मोठा दिसत नाही. जिल्हा हद्दीवर शिरवळ येथे पूर्ण तपासणी आणि चौकशी करूनच विविध तालुक्‍यात प्रवेश दिला जात असला, तरी पाटण तालुक्‍यातही पोलिस उपअधीक्षक अशोकराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कोयनानगर, निसरेफाटा व काढणे येथील हद्दीवर पोलिसांनी बॅरिकेड्‌स लावून आजपासून चेकनाके सुरू केले आहेत.
 

...तर त्यांच्यावरही गुन्हे 

मुंबईसह बाहेर गावाहून चेक नाक्‍यांवर येणाऱ्यांची संपूर्ण माहिती घेऊन कागदोपत्री तपासणी व नोंद करूनच त्यांना त्यांच्या गावी पाठवले जात आहे. संबंधित गावातील दक्षता समितीलाही तेथूनच अलर्ट केले जात आहे. या नाक्‍यांवर आल्यावर क्वारंटाइन काळातील सर्व सूचना पाळण्याबाबतच्या नोटिसाही पोलिसांकडून बजावल्या जात आहेत. जे रीतसर पास व परवानगी न घेता बाहेरगावाहून तालुक्‍यात येतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी सांगितले. 

Video : जे तमिळनाडूने केले तेच महाराष्ट्र सरकारनेही करावे

लॉकडाऊनमध्येही चक्क ज्ञानेश्‍वरी पारायण 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com