ढेबेवाडी खोऱ्यात अशी झाली कोरोनाची एन्ट्री

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

आज ढेबेवाडी खोऱ्यातील अनेक गावांनी स्वतःला अक्षरश कोंडून घेतल्याचे चित्र दृष्टीला पडत आहे. बनपुरी व त्या परिसरातील वाड्यावस्त्या लॉकडाउन झाल्या असून, प्रमुख मार्गांवर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. बनपुरीतील घरोघरी आरोग्य तपासणी सुरू असून, रस्त्यांवर व गल्लीबोळात जंतुनाशकाची फवारणी करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिस पाटील दत्तात्रय कुंभार यांनी सांगितले.
 

ढेबेवाडी ( जि.सातारा) : गेल्या दोन महिन्यांपासून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवित असलेल्या ढेबेवाडी खोऱ्यात अखेर मुंबईमार्गे कोरोनाने एन्ट्री केल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाच दिवसांपूर्वी (शनिवारी) मुंबईहून गावी बनपुरी (ता.पाटण) येथे आलेल्या आणि तेथील माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीत क्‍वारंटाइन केलेल्या 43 वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे काल रात्री स्पष्ट झाल्याने संपूर्ण परिसर लॉकडाउन करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गतिमान पावले उचलत संबंधित महिलेच्या कुटुंबीयांसह निकट सहवासीतांना पाटण येथील विलगीकरण कक्षात दाखल केले आहे.
सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

ढेबेवाडी विभागातील बहुसंख्य नागरिक कुटुंबीयांसह बाहेरगावी राहतात. त्यामध्ये मुंबईकरांची संख्या सर्वाधिक आहे. लॉकडाउन सुरू झाल्यानंतर सुमारे 17 हजार पुणे-मुंबईकर गावी आले आहेत. शनिवारी (ता. 16) मुंबईहून मिनीबसमधून 21 प्रवासी परिसरात आले होते. त्यामध्ये बनपुरीतील एकाच कुटुंबातील आठ जणांचा समावेश होता. दक्षता समिती व ग्रामपंचायतीने गावालगतच्या माध्यमिक विद्यालयात त्यांना क्वारंटाइन केले होते. त्या विद्यालयाजवळच त्यांचे घर आहे. दुसऱ्या दिवशी (रविवारी) दुपारी त्यातील एका महिलेचा अकस्मात मृत्यू झाल्याने आरोग्य विभागाने अंत्यसंस्कारापूर्वी तिच्या घशातील स्रावाचे नमुने घेऊन तपासणीस पाठवले. काल रात्री त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण ढेबेवाडी खोरे गॅसवर गेले आहे. रात्री प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार समीर यादव, पोलिस उपअधीक्षक अशोकराव थोरात, तालुका आरोग्य अधिकारी आर. बी. पाटील, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, सहायक पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे, मंडलाधिकारी प्रवीण शिंदे यांच्यासह आरोग्य व महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भेट देवून माहिती घेतली. प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सूचना देण्यात आल्या. संबंधित महिला दहिसर-मुंबई येथून कुटुंबीयांसह गावी आली होती. त्यांच्यासोबत अन्य प्रवासीही असल्याची माहिती मिळाल्याने यंत्रणेने त्याबाबत माहिती काढून सोबत प्रवास करणाऱ्या व निकट सहवासीतांना पाटण येथील विलगीकरण कक्षात ठेवले आहे. 
दरम्यान, संबंधित महिलेच्या मृत्यूमुळे तसेच म्हासोली (ता.कऱ्हाड) येथील कोरोनाबाधित रुग्ण परिसरातून फिरून गेल्याने ढेबेवाडी आणि तळमावले येथील बाजारपेठ काही दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी संघटना व ग्रामपंचायतीने यापूर्वीच घेतलेला होता. आता तो आणखी कडक करून पुढील सूचना येईपर्यंत बंद वाढविल्याचे सांगण्यात आले. 

भागातील गावांनी घेतले कोंडून 

आज ढेबेवाडी खोऱ्यातील अनेक गावांनी स्वतःला अक्षरश कोंडून घेतल्याचे चित्र दृष्टीला पडत आहे. बनपुरी व त्या परिसरातील वाड्यावस्त्या लॉकडाउन झाल्या असून, प्रमुख मार्गांवर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. बनपुरीतील घरोघरी आरोग्य तपासणी सुरू असून, रस्त्यांवर व गल्लीबोळात जंतुनाशकाची फवारणी करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिस पाटील दत्तात्रय कुंभार यांनी सांगितले.

पृथ्वीराज चव्हाणांनी करुन दाखवलं 

सातारा : कोरोना बाधितांची संख्या वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांची स्ट्रॅटजी

जिल्हाधिकाऱ्यांनी दिला म्हासोली ग्रामस्थांना कानमंत्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Report How Coronavirus Entered In Dhebhewadi