Video : शिवप्रेम जागले घरा घरांत; आकर्षक देखावे, सजावटही

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 April 2020

या वर्षी कोरोनांचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या महिनाभरापासून लॉकडाऊन आहे. त्यामुळे शिवजयंतीच्या उत्साहावर पाणी फिरले आहे.

कऱ्हाड ः शहरासह परिसरात दर वर्षी पारंपरिक शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होते. येथील शिवजयंतीची शाही दरबार मिरवणूक पाहण्यासाठी विविध ठिकाणांहून शिवप्रेमी येतात; परंतु यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे अनेक शिवप्रेमींनी घरातच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, पुतळ्यांची प्रतिष्ठापना केली, तर अनेकांनी सजावटीतून कोरोनामुक्तीचा संदेश दिला.
 
शहरात पारंपरिक शिवजयंतीला निघाणाऱ्या शाही दरबार मिरवणुकीचा पश्‍चिम महाराष्ट्रात लौकिक आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह अनेक ठिकाणाहून मिरवणूक पाहण्यासाठी शिवप्रेमी येतात. दर वर्षी शहरात तीन दिवस शिवजयंती साजरी होते. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्याबरोबरच आकर्षक देखावे, सजावट केलेली असते. ध्वनिक्षेपकांवर पोवाड्याचे आवाज, भगव्या पताकांमुळे दर वर्षी कऱ्हाडनगरी शिवमय बनते. या वर्षी कोरोनांचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या महिनाभरापासून लॉकडाऊन आहे. त्यामुळे शिवजयंतीच्या उत्साहावर पाणी फिरले आहे.

मात्र, शिवप्रेमींनी त्यातूनही आपले शिवप्रेम दाखवत घरोघरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची, प्रतिमेची प्रतिष्ठापना केली. त्यात बहुतेक जणांनी कोरोनाचा संदेश देणारी सजावट व देखावे केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने सोमवार पेठेतील तेजस जाधव, मेघना जाधव या बहिण- भावांनी घरात कोरोनामुक्तीचा संदेश देणारी सजावट केली आहे. भाजप व हिंदू एकताचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी त्यांच्या निवासस्थानी शिवजयंती साजरी केली. मोहित शिंदे व आयुष नलवडे यांनी भात्यानाच्या साहाय्याने घरी केलेली सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. काही ठिकाणी रांगोळीतून छत्रपतींची प्रतिकृती साकारली आहे. मंगळवार पेठेतील दत्तात्रय तारळेकर यांनीही घरात शिवप्रतिष्ठापना केली असून, दर वर्षीचा शाही मिरवणुकीच्या मार्गाचा देखावा सादर केला आहे. शहरात काहींनी घरात तर काहींनी चक्क गॅलरीत छत्रपती शिवरायांची प्रतिष्ठाना व सजावट केली आहे.

हे म्हणजे असं झालं...चार आण्याची काेंबडी अन् बारा आण्याचा मसाला

Video : साहेब एक संधी द्या, आम्ही खांद्याला खांदा लावून काम करु
सातारा : आता शाळांत प्रवेश घ्या ऑनलाइन

Breaking : अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलावे : शिवेंद्रसिंहराजे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Shivjayanti Celebreated At Home In Karad