सातारा : दुकानांसह वाहतूक उद्यापासून खुली; काळजी घेण्याची सूचना

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

जिल्हाचा समावेश नॉन रेड झोनमध्ये झाला आहे. त्यामुळे या ठिकाणच्या बहुतांश व्यवस्था सुरू करण्यास परवानगी मिळणार आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांव्यतिरिक्त कुठलीही सूचना किंवा आदेश मुख्य सचिवांच्या मान्यतेशिवाय जिल्हास्तरावर काढता येणार नाही, असे शासनाच्या आदेशात नमूद आहे. परंतु, जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सातारा : लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यामध्ये रेड झोनच्या बाहेरील (प्रतिबंधित क्षेत्र वगळता) परिसरासाठी विविध सवलती दिलेल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील बाजारपेठांमधील सर्व दुकानांसह सार्वजनिक वाहतूक शुक्रवारपासून (ता. 22) सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु, कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी या सवलतींचा स्वीकार करताना नागरिकांना शारीरिक अंतर आणि अन्य प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी लागणार आहे.

aschim-maharashtra/satara-no-water-distribution-two-days-295695" target="_blank">सातारकरांनाे, दाेन दिवस पाणी येणार नाही 

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यातील मार्गदर्शक सूचना काल राज्य शासनाने जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये रेड झोन आणि नॉन रेड झोन असे राज्याचे दोन भाग केले आहेत. रेड झोनमध्ये मुंबई महापालिकेसह मुंबई महानगर प्रदेश परिसरातील सर्व महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला आणि अमरावती हे महापालिका क्षेत्र रेड झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्याव्यतिरिक्तचा भाग हा नॉन रेड झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे सातारा जिल्हाही नॉन रेड झोनमध्ये 
आला आहे.
 
नॉन रेड झोन परिसरात शासनाने अनेक गोष्टींना सूट दिली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सर्व बाजारपेठा, दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु, बसमध्ये केवळ क्षमतेच्या 50 टक्केच प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये योग्य शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करण्यासह बसचे निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) करणेही बंधनकारक करण्यात आले आहे. बस सेवेबरोबर सर्व सार्वजनिक आणि वैयक्तिक वाहतुकीलाही परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामध्ये दुचाकीवरून एकाला, तीनचाकी वाहनातून चालक अधिक दोन तर, चारचाकी वाहनातूनही चालक आणि दोन प्रवाशांना प्रवासाची सवलत असणार आहे. त्यामुळे रिक्षा सुरू होण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे. 23 मार्चपासून बंद असलेली क्रीडा संकुले, खेळाची मैदाने तसेच सार्वजनिक खुल्या जागाही काही प्रमाणात सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही ठिकाणे केवळ व्यक्तिगत व्यायामासाठी खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु, प्रेक्षक आणि समूह व्यायामप्रकार किंवा खेळांना अद्यापही बंदीच असणार आहे. शारीरिक अंतर राखूनच वैयक्तिक व्यायाम करण्याचा नियम मात्र सर्वांना पाळावा लागणार आहे.
 
शासनाने अनेक गोष्टींमध्ये सूट दिली आहे. 22 मे पासून या सवलती लागू होणार आहेत. त्याचबरोबर परवानगी असलेल्या बाबी करण्यासाठी कोणत्याही शासकीय प्राधिकाऱ्याकडून परवानगी किंवा मंजुरी घेण्याची आवश्‍यकताही ठेवलेली नाही. परंतु, कुठेही गर्दी किंवा योग्य शारीरिक अंतराच्या नियमांचा भंग होणार नाही, याची काळजी सर्वांना घ्यावी लागणार आहे. ज्या ठिकाणी नियमांचे पालन होणार नाही, अशा ठिकाणांना बंद करण्याचे अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष 

जिल्हाचा समावेश नॉन रेड झोनमध्ये झाला आहे. त्यामुळे या ठिकाणच्या बहुतांश व्यवस्था सुरू करण्यास परवानगी मिळणार आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांव्यतिरिक्त कुठलीही सूचना किंवा आदेश मुख्य सचिवांच्या मान्यतेशिवाय जिल्हास्तरावर काढता येणार नाही, असे शासनाच्या आदेशात नमूद आहे. परंतु, जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सातारा : कोरोना बाधितांची संख्या वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांची स्ट्रॅटजी

ब्रेकिंग : सुखावलेल्या सातारा जिल्ह्यावासियांना काेराेनाचा दणका

Video : एक टाळी विशेष मुलांसाठी वाजलीच पाहिजे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Shopkeppers May Get Relief From Lockdown