शेलारांचे शालजोडीतील..."बापू' सहकारनिष्ठ, "पुत्र' खासगीनिष्ठ 

rajendra nagawade privet sector
rajendra nagawade privet sector

श्रीगोंदे : ""दिवंगत ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे यांनी आयुष्यभर सहकार वाढविण्यासाठी कष्ट घेतले. ते सहकारनिष्ठ होते. त्यांनी नेहमीच सहकार टिकविण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांचेच वारसदार असलेले नागवडे कारखान्याचे चालक राजेंद्र नागवडे आता दोन खासगी कारखान्यांचे मालक झालेत,'' अशी खोचक टीका "राष्ट्रवादी'चे प्रदेश उपाध्यक्ष घनश्‍याम शेलार यांनी केली. 

नागवडे कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभासदांचा मेळावा आज शहरात झाला. कारखान्याचे उपाध्यक्ष केशव मगर यांच्या पुढाकारातून, मतदारयादीतून अपात्र होणाऱ्या सभासदांना एकत्रित बोलाविले होते. 

अपात्रचे पाप करू नका 
त्या वेळी शेलार म्हणाले, ""ज्यांनी खासगी कारखाने विकत घेतले, त्यांना सहकारनिष्ठ बापूंचा वारसा आणि संस्कार सांगण्याचा अधिकार नाही. राजेंद्र नागवडे यांनी परभणी येथील उसाचा, तर कोल्हापूर जिल्ह्यात एक गुऱ्हाळाचा, असे दोन खासगी कारखाने विकत घेऊन ते चालवीत आहेत. येथे सहकारी कारखान्यातील मालक असणाऱ्या सभासदांना अपात्र ठरविण्याचे पाप नागवडे कारखान्याच्या अध्यक्षांनी केले.'' 

बापू हेच दैवत 
मगर म्हणाले, ""नागवडे कारखाना हे कुटुंब असून, त्याचा प्रमुख चांगला निवडण्याची गरज आहे. बापू हेच आमचे दैवत आहेत. ते होते तोपर्यंत सर्वांना न्याय मिळत होता. मात्र, आता परिस्थिती बदलल्याने सभासदांनी टाकलेल्या जबाबदारीच्या जाणिवेतून आपण सत्ताधाऱ्यांपासून बाजूला जाण्याचा निर्णय घेतला. सभासदांनी आदेश दिला, तर नागवडे कारखान्याच्या निवडणुकीत आम्ही ताकद लावू.'' 
प्रा. तुकाराम दरेकर, अण्णा शेलार, राजकुमार पाटील, बाळासाहेब काकडे, जिजाबापू शिंदे, दीपक भोसले, विजय मोकाशी, गणपतराव काकडे, डी. एस. नागवडे, सुभाष काळाणे, विलास वाबळे, कैलास पाचपुते, माणिकराव पाचपुते, श्रीपाद खिस्ती, अनिल ठवाळ आदी उपस्थित होते. 

चुका कबूल करून ठराव करा : दरेकर 
प्रा. दरेकर म्हणाले, ""विरोध तयार झाल्यावर सत्ताधारी न्यायालयाची भाषा करीत आहेत; मात्र त्यांना सगळ्या सभासदांना न्याय देण्यासाठी न्यायालयात जाण्याची गरज नाही. संचालक मंडळाच्या मासिक बैठकीत चुका कबूल करून, सगळे सभासद मतदानासाठी पात्र करण्याचा ठराव केला तरी चालेल.'' 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com