esakal | पदाधिकारी, नगरसेवकांना भोवणार अतिक्रमणाचे अभय?
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur

पदाधिकारी, नगरसेवकांना भोवणार अतिक्रमणाचे अभय?

sakal_logo
By
वेणुगोपाळ गाडी

प्रभाग क्रमांक तीनमधील घोंगडे वस्ती येथील अतिक्रमित घरांना अभय दिल्याप्रकरणी महापौरांसह 15 जणांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी आयुक्तांकडे केली.

सोलापूर : प्रभाग क्रमांक तीनमधील घोंगडे वस्ती येथील लेंडकी नाल्यानजीकच्या अतिक्रमित घरांना अभय दिल्याप्रकरणी महापौरांसह 15 जणांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील (Bharatiya Janata Party corporator Suresh Patil) यांनी आयुक्तांकडे केली आहे. यावरून राजकीय वाद पेटण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. नगरसेवक सुरेश पाटील यांच्या तक्रारीवरून महापालिकेने 16 जून रोजी घोंगडे वस्ती येथील लेंडकी नाल्यानजीकची पावसाळी पाण्याच्या प्रवाहाला अडथळा आणणारी 13 घरे पाडून टाकली होती. या कारवाईवेळी काही नगरसेवकांनी आक्षेप घेतला होता. यानंतर या विषयावर पडसाद 18 जून रोजीच्या महापालिका सभेत उमटले. या वेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाच्या घरे पाडण्याच्या धोरणाबाबत तीव्र हरकत घेत गदारोळ केला. (Complaint against Municipal Corporation office bearers and corporators for encouraging encroachment)

हेही वाचा: दर तासाच्या कामाचा द्या अहवाल! आयुक्तांचा फतवा; कामगार संघटनेचा विरोध

सभेत या विषयासंदर्भात आपल्याला बोलण्याची संधी द्यावी, अशी मागणी सुरेश पाटील यांनी वारंवार केली होती, मात्र त्यांना महापौर श्रीकांचना यन्नम (Mayor Srikanchana Yannam) यांनी बोलण्याची संधी दिली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या पाटील यांनी महापौरांना घरचा आहेर दिला. यास सर्वपक्षीयांनी हरकत घेत पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केली. त्यानुसार महापौरांनी पाटील यांचे नगरसेवक पद एका दिवसासाठी निलंबित केले. यानंतर महापौरांनी पोलिसांकडून पाटील यांना सभागृहाबाहेर काढले. महापौरांनी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेऊन केलेल्या कारवाईमुळे बेघर झालेल्या लोकांचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. (Complaint against Municipal Corporation office bearers and corporators for encouraging encroachment)

हेही वाचा: आणि बनीराम पाटील झाला सखाराम कदम..!

सभेत ठरल्यानुसार महापौरांनी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेतली. यामध्ये बेघरांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याचे ठरले. या लोकांना प्रत्येकी 15 हजारांची आर्थिक मदत महापौर सहाय्यता निधीतून करण्याचाही निर्णय झाला. यानुसार गत आठवड्यात धनादेशाचे वाटपही झाले. दरम्यान, या प्रकरणावरून पित्त खवळलेल्या सुरेश पाटील यांनी अतिक्रमण केलेल्या घरांना पर्यायाने बेकायदेशीर बाबीला अभय देण्याची भूमिका घेतल्याबद्दल आक्षेप घेत महापौरांसह 15 जणांचे नगरसेवक रद्द करावे, अशी मागणी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली. एवढेच नव्हे, तर या घरांचे पुनर्वसन होऊ नये यासाठी न्यायालयातही धाव घेतली आहे.

"या' 15 जणांचे पद धोक्‍यात

महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृह नेता शिवानंद पाटील, विरोधी पक्षनेता अमोल शिंदे, नगरसेवक तौफीक शेख, रियाज खरादी, महेश कोठे, आनंद चंदनशिवे, श्रीनिवास करली, तस्लीम शेख, श्रीदेवी फुलारे, अंबिका पाटील, वहिदाबी शेख, नागेश भोगडे, चेतन नरोटे, परवीन इनामदार या 15 जणांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी सुरेश पाटील यांनी केली आहे. यामुळे या सर्वांचे पद धोक्‍यात आले आहे.

महापौरांसह 15 जणांनी संगनमताने सर्वसाधारण सभेमध्ये कामकाज व बैठक बोलावून प्रशासनाने केलेल्या कायदेशीर कामकाजास आक्षेप घेतला. तसेच बेकायदेशीर बांधकामास पाठिंबा दिला. या बाबीवरून त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे, अशी माझी मागणी आहे.

- सुरेश पाटील, नगरसेवक

loading image