esakal | उत्पन्न घटल्याने नगरसेवकांना नाही भांडवली निधी ! आयुक्‍तांकडे निर्णय पेंडिंग

बोलून बातमी शोधा

SMC Funds
उत्पन्न घटल्याने नगरसेवकांना नाही भांडवली निधी ! आयुक्‍तांकडे निर्णय पेंडिंग
sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : महापालिकेच्या रुग्णालयांची स्थिती सुधारावी, कोरोना काळात रुग्णांना दर्जेदार सुविधा मिळावी आणि व्हेंटिलेटर व ऑक्‍सिजनअभावी कोणाचाही जीव जाऊ नये, या हेतूने आतापर्यंत तीन नगरसेवकांनी भांडवली निधीतून व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजनची सुविधा आणि रुग्णवाहिका उपलब्ध करून घ्यावी, अशी मागणी केली आहे. अनेक नगरसेवकांनीही प्रस्ताव तयार करायला सुरवात केली आहे. मात्र, 2020-21 मध्ये अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने नगरसेवकांना भांडवली निधी द्यायचा की नाही, यावर आयुक्‍तांनी अजून निर्णय घेतला नसल्याने नगरसेवकांचे प्रस्ताव तसेच धूळखात पडून आहेत.

कोरोनापूर्वी हद्दवाढ भागातील नगरसेवकांना 50 लाखांचा तर शहरातील नगरसेवकांना 40 लाखांचा भांडवली निधी देण्याचा ठराव सभागृहात मंजूर करण्यात आला. मात्र, कोरोनाच्या संकटात महापालिकेला अपेक्षित उत्पन्नच मिळाले नाही. तत्पूर्वी, 2018 पासून महापालिकेच्या तिजोरीत अपेक्षित उद्दिष्टाच्या साडेनऊशे कोटी रुपये कमी मिळाले. मागील वर्षी 172 कोटींची तूट आली. आता उत्पन्न वाढेल अशी अपेक्षा असतानाही एप्रिल महिन्यात अवघे सव्वा कोटी रुपये मिळाले आहेत. दरमहा महापालिकेचा वेतन, पेन्शन व अन्य सेवांसाठी अंदाजित 23 कोटींचा खर्च होतो. आता कोरोना काळात कोव्हिड केअर सेंटरवरील खर्च, औषधे, यंत्रसामुग्री खरेदीसाठी महापालिकेकडे पुरेसे पैसे नाहीत. सध्या खर्चाच्या तुलनेत दरमहा टक्केही उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी नगरसेवकांना भांडवली निधी न देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. यासंदर्भात आयुक्‍तांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही.

हेही वाचा: आमदार निधीला आचारसंहितेचा अडथळा ! राज्याच्या तिजोरीत खडखडाट; चारऐवजी दोन कोटीच मिळणार

महापालिकेच्या उत्पन्नाची स्थिती...

(2020-21)

  • उत्पन्नाचे उद्दिष्ट : 317.13 कोटी

  • मिळालेले उत्पन्न : 144.94 कोटी

  • उत्पन्नातील तूट : 172.19 कोटी

(2021-22)

  • एप्रिलमधील उत्पन्न : 1.29 लाख

हेही वाचा: "या' रुग्णालयात होतेय ऑक्‍सिजनची चाळीस टक्के बचत ! रिझर्वायर बॅंगसह नॉन रीब्रिदिंग मास्कचा वापर

सत्ताधारी नगरसेवकांचा प्रस्तावच नाही

महापालिकेत नगरसेवकांचे संख्याबळ 102 असून त्यातील एका नगरसेविकेचे निधन झाले आहे. तर पाच स्वीकृत नगरसेवक आहेत, त्यातील अवघ्या तीन नगरसेवकांनीच म्हणजे विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, देवेंद्र कोठे आणि सारिका पिसे यांनी त्यांच्या भांडवली निधीतून व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन सिलिंडर व रुग्णवाहिका घ्यावी, असा प्रस्ताव महापालिकेकडे दिला आहे. विशेष म्हणजे सत्ताधाऱ्यांमधील एकाही नगरसेवकाने अथवा पदाधिकाऱ्याने तसा प्रस्ताव दिलेला नाही. दरम्यान, मागच्या वर्षी महापालिकेला उद्दिष्टाच्या तुलनेत 172 कोटींचे उत्पन्न कमी मिळाले. त्यामुळे नगरसेवकांना भांडवली निधी देता येणार नाही, अशी भूमिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी घेतल्याचे बोलले जात आहे. त्यावर अजून आयुक्‍तांनी स्पष्टीकरण दिले नसून निर्णय प्रलंबित ठेवला आहे.

भांडवली व वॉर्डवाईज निधी द्यावाच लागेल

कोरोना काळात नागरिकांची गरज ओळखून प्रशासनाने ठरल्याप्रमाणे नगरसेवकांना भांडवली निधी द्यावा. तो पैसा कसा आणि कुठून मिळू शकतो, हे प्रशासनाला आम्ही स्पष्टपणे दाखवून देऊ. आता निवडणुकीसाठी एक वर्षाचा कालावधी शिल्लक असून 107 नगरसेवकांना हक्‍काचा वॉर्डवाईज व भांडवली द्यायलाच पाहिजे.

- अमोल शिंदे, विरोधी पक्षनेते, महापालिका