
शेतकऱ्यांची खतांची अडचण सोडवावी, अशी मागणी माजी आमदार दिलीप माने यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलीप माने यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट
सोलापूर : खरीप पेरणी (Kharif sowing) हंगाम आता सुरू झाला, परंतु शेतकऱ्यांना अद्यापही पुरेशा प्रमाणात खते (Fertilizers) मिळालेली नाहीत. पिकांची लागवड आणि पिकांच्या वाढीसाठी खतांची मागणी वाढत असतानाही जिल्हाभरात खते मिळत नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर काळाबाजार होऊन जादा दराने खते विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची खतांची अडचण सोडवावी, अशी मागणी माजी आमदार दिलीप माने (Former MLA Dilip Mane) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. (despite the increasing demand for fertilizers in solapur district, fertilizers are not available)
सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 84 मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. कांद्यासह फळपिकांची लागवड आता जोरात सुरू असून त्यासाठी युरिया व डीएपी खतांची मागणी वाढली आहे. जिल्हा (कृषी विभाग) प्रशासनाने यंदा (जूनमध्ये) शेतकऱ्यांसाठी चोवीस हजार पाचशे मेट्रिक टन युरियाची तर डीएपी खताची पाच हजार 700 मेट्रिक टन खतांची नोंदणी केली आहे. मात्र, आतापर्यंत केवळ चार हजार मेट्रिक टनापर्यंत युरिया तर 600 ते साडेसहाशे मेट्रिक टन डीएपी खत जिल्ह्यासाठी उपलब्ध झाला आहे. जून महिना संपत आला, तरीही मागणीप्रमाणे खत मिळत नसल्याने बळीराजाला वाढीव दराने खते घ्यावी लागत आहेत, अशी स्थिती आहे.
कोरोनाच्या काळात अडचणीत सापडलेला बळीराजा आता अडचणीतून मार्ग काढत आहे. अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्यात निर्माण झालेले खत टंचाई दूर करावी, अशीही मागणी दिलीप माने यांनी अजित पवार यांच्याकडे केली आहे. यंदा जिल्ह्यात अंदाजित पावणेचार लाख हेक्टरवर नव्या पिकांची लागवड होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. तर दुसरीकडे यंदा पाऊसमान चांगले असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर बळीराजा आता मशागत करून बी-बियाणे लागवडीची तयारी करत आहे.
लवकरच उपलब्ध होतील खते
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उस्मानाबादहून सोलापूरमार्गे विमानाने पुण्याला गेले. विमानतळावर त्यांचे आगमन झाल्यानंतर माजी आमदार दिलीप माने यांनी त्यांना शेतकऱ्यांसाठी खते उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. त्यावेळी पुढील आठवड्यात जिल्ह्यासाठी पुरेशा प्रमाणात खते मिळतील, अशी ग्वाही दिल्याचे माने यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. (despite the increasing demand for fertilizers in solapur district, fertilizers are not available)