'लक्ष्मी' च्या 92 हजार ठेवीदारांना मिळणार 208 कोटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

lakshmi banks

सर्वप्रकारच्या ठेवीदारांना प्रत्येकी पाच लाखांपर्यंतची रक्‍कम ठेवी विमा व पत हमी महामंडळाच्या माध्यमातून परत केली जाणार आहे.

'लक्ष्मी' च्या 92 हजार ठेवीदारांना मिळणार 208 कोटी

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : लक्ष्मी बॅंकेची स्थापना 6 जून 1929 रोजी झाली, आज बॅंकेने 92 वर्षे पूर्ण केली आहेत. मात्र, काही बड्या कर्जदारांकडे थकबाकी वाढल्याने बॅंकेसमोरील अडचणीत वाढ झाली. कोरोनामुळेही बॅंकेची थकबाकी वाढली. बॅंकेत 92 हजार ठेवीदारांची 224 कोटींची ठेव होती. परंतु, बॅंकेच्या अडचणीमुळे त्यांना ते पैसे मिळू शकले नाहीत. आता सर्वप्रकारच्या ठेवीदारांना प्रत्येकी पाच लाखांपर्यंतची रक्‍कम ठेवी विमा व पत हमी महामंडळाच्या माध्यमातून परत केली जाणार आहे.

थकबाकी वाढल्याने ठेवीदारांच्या हक्‍काचा पैसाही त्यांना देणे बॅंकेला कठीण झाले. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने बॅंकेवर प्रशासकीय मंडळाची नियुक्‍ती केली. शहर उपनिबंधक नागनाथ कंजेरी यांची प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदी तर, सदस्य म्हणून सहायक निबंधक अमर झालटे यांची नियुक्‍ती केली आहे. ठेवीदारांकडून फॉर्म भरुन घेऊन त्यासोबत आवश्‍यक ती कागदपत्रे घेतली जाणार आहेत. त्यानंतर त्यांच्या ठेव रकमेची पडताळणी करून ते अर्ज ठेवी विमा व पत हमी महामंडळाला सादर केले जाणार आहेत. त्यांच्याकडून त्या संपूर्ण अर्जाची पडताळणी होऊन ठेवीदारांना रक्‍कम वितरीत केली जाणार आहे. तत्पूर्वी, रिझर्व्ह बॅंकेने सहा महिन्यांसाठी प्रशासकीय मंडळ बॅंकेवर नियुक्‍त केल्याने ठेवीदारांना सहा महिन्यांतून एकदाच एक हजार रुपये काढता येणार आहेत. कर्ज देणे, कर्जाचे नूतनीकरण हे प्रकार तुर्तास बंद करण्यात आले आहेत. आता प्रामुख्याने ठेवीदारांना पाच लाखांपर्यंतची रक्‍कम परत करणे हेच उद्दिष्ट असल्याचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष कंजेरी यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

हेही वाचा: ठेवीदारांसाठी 'लक्ष्मी'चे संचालक कर्जदारांच्या दारी!

लक्ष्मी बॅंकेच्या जवळपास 92 हजार ठेवीदारांना पाच लाखांपर्यंतच्या ठेवी परत मिळणार आहेत. त्यासाठी सर्वांनी एका अर्जासोबत आवश्‍यक कागदपत्रे जोडावीत. ठेवी विमा व पत हमी महामंडळाकडे त्याचा प्रस्ताव पाठविल्यानंतर काही दिवसांत ती रक्‍कम संबंधित ठेवीदारांना मिळेल.

- नागनाथ कंजेरी, अध्यक्ष, प्रशासकीय मंडळ, लक्ष्मी बॅंक, सोलापूर

बॅंकेची स्थिती...

- एकूण ठेवीदार- 92,000

- ठेवींची रक्‍कम- 224 कोटी

- विम्यातून परत मिळणारी रक्‍कम- 208 कोटी

- बॅंकेचे कर्जवाटप- 204 कोटी

- "एनपीए'तील कर्ज- 105 कोटी

- बॅंकेला झालेला तोटा- 65 कोटी

हेही वाचा: सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवींचे 45 फुटी स्मारक!

पुढील महिन्यात थकबाकीदारांवर कारवाई

सोलापूर शहरात 13 तर ग्रामीणमध्ये अक्‍कलकोट, बार्शी, पंढरपूर व नातेपुते याठिकाणी लक्ष्मी बॅंकेच्या शाखा आहेत. बँकेने 204 कोटींचे कर्ज वाटप केले आहे. त्यातील 105 कोटी रुपयांचे कर्ज सध्या थकबाकीत गेले आहे. "एनपीए' वाढल्याने बॅंकेला त्याची तरतूद करावी लागली. या पार्श्‍वभूमीवर बॅंकेला जवळपास 65 कोटींचा तोटा झाल्याचेही प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष नागनाथ कंजेरी यांनी सांगितले. थकबाकीदारांवर सुरवातीला कायदेशीर नोटीस बजावण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. ठेवीदारांच्या विमा संरक्षित रकमेचे प्रस्ताव महामंडळाकडे पाठविल्यानंतर पुढील महिन्यात थकबाकी वसुलीवर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

loading image
go to top