esakal | Solapur : सिटू करणार ई-श्रम पोर्टलवर एक लाख असंघटित कामगारांची नोंदणी!
sakal

बोलून बातमी शोधा

सिटू करणार ई-श्रम पोर्टलवर एक लाख असंघटित कामगारांची नोंदणी!

भारत सरकारमार्फत ई-श्रम पोर्टलची सुरवात करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पोर्टलवर एक लाख असंघटित कामगारांची नोंदणी करून त्यांना लाभ मिळवून देण्याचा निर्धार सिटूने घेतला आहे.

सिटू करणार ई-श्रम पोर्टलवर एक लाख असंघटित कामगारांची नोंदणी!

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : संघटित व असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा (Social Security) मिळावी व कल्याणकारी लाभ मिळावेत म्हणून सिटू व केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने अनेक लढे केले गेले. या अथक लढ्यानंतर या देशातील असंघटित कामगारांची अधिकृत नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्यासाठी भारत सरकारमार्फत ई-श्रम पोर्टलची सुरवात करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पोर्टलवर एक लाख असंघटित कामगारांची नोंदणी करून त्यांना लाभ मिळवून देण्याचा निर्धार सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनने (Center of Indian Trade Union - CITU) घेतला आहे, अशी माहिती मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम (Narsayya Adam) यांनी दिली.

माजी आमदार आडम म्हणाले, वास्तविक पाहता, यासंबंधी 2008 साली कायदा पारित करण्यात आला. परंतु त्याची अंमलबजावणी केली गेली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन घोषित करण्यात आला. तेव्हा या देशातील संघटित - असंघटित कामगारांना केंद्र सरकारमार्फत आर्थिक मदत करण्यासाठी लागणारी कामगारांची अधिकृत माहिती सरकारकडे उपलब्ध नव्हती. यादरम्यान सर्वोच्च न्यायालयाने यासंबंधी अधिकृत नोंदणी करून असंघटित कामगारांची माहिती संगणकीय पद्धतीने संकलन करण्याचे आदेश दिले. म्हणून केंद्र सरकारने हे पाऊल उचलले. एकंदरीत, कामगार संघटनांचा पाठपुरावा व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे देशातील असंघटित कामगारांची नोंदणी करून ओळखपत्र मिळणार आहे. यासाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्या वतीने सोलापुरात 31 डिसेंबरअखेरपर्यंत ई-श्रम ओळखपत्रासाठी एक लाख असंघटित कामगारांची नोंदणी करण्याकरिता मोफत यंत्रणा राबविण्यात आली आहे.

हेही वाचा: Solapur : 'विठ्ठल'च्या संचालकांचा वाद पवारांच्या दरबारात!

शुक्रवारी (1 ऑक्‍टोबर) सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन कार्यालयात ई-श्रम ओळखपत्र नोंदणी मोहिमेची सुरवात शहिदांना पुष्पांजली व अभिवादन करून ज्येष्ठ नेते नरसय्या आडम यांच्या हस्ते करण्यात आली. यासाठी सनी शेट्टी, शर्विल माने, विघ्नेश पाटील, पुष्पा पाटील, सिद्धाराम उमराणी, बाळकृष्ण मल्याळ, श्‍याम आडम, अश्विनी मामड्याल हे संगणकीय व तांत्रिक सुविधेचे काम पाहात आहेत. सर्व कामगारांना याचा लाभ घेता यावा म्हणून शहरात दत्तनगर, शहापूर चाळ, मुमताज नगर, कॉ. गोदुताई परुळेकर वसाहत या ठिकाणी नोंदणी केंद्र सिटूमार्फत सुरु करण्यात आले आहेत. या केंद्रांवर याची माहिती देऊन नोंदणी करून घेण्यात येत आहे.

हेही वाचा: राष्ट्रपती शौर्यपदक विजेते! खाकी वर्दीतील सिंघम हर्षद काळे

या वेळी सिटूचे महासचिव ऍड. एम. एच. शेख हे ई-श्रम पोर्टलची माहिती देताना म्हणाले, सर्व असंघटित कामगारांना केंद्र सरकारकडून सामाजिक सुरक्षा मिळवून देण्यासाठी अत्यावश्‍यक असे ओळखपत्र हे ई-श्रम नोंदणीच्या माध्यमातून मिळणार असून, ज्या कामगारांना आयकर लागू नाही तसेच भविष्य निर्वाह निधीधारक नाहीत अशा असंघटित कामगारांनी याची नोंदणी करणे अनिवार्य आहे. याचा प्राथमिक फायदा नोंदणी केल्यानंतर एका वर्षासाठी दोन लाख रुपयांचा अपघाती विमा केंद्र सरकारकडून मिळणार आहे. याचा सर्वांनी लाभ घेण्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

loading image
go to top