कोर्टी-आवाटी रस्त्याची दुरवस्था! प्रवाशांचे होताहेत हाल | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

road

रस्ता उकरून ठेवल्यामुळे इथल्या प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय.

कोर्टी-आवाटी रस्त्याची दुरवस्था! प्रवाशांचे होताहेत हाल

करमाळा (सोलापूर) : सगळा रस्ता नुसता उकरून ठेवलाय. रोज या रस्त्यावर ट्रॅक्टर पलटी होतात. गाड्या घसरून पडतात. कुठे रस्त्यावर ती व्यवस्थित सूचना फलक लावलेले नाहीत, कामबी बंदय. आणि रस्ता उकरून ठेवल्यामुळे इथल्या प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. आरे या रस्त्याच्या कामाला कुणी वाली आहे की नाही? असा थेट सवाल या रस्त्यावरुन प्रवास करणारे प्रवासी विचारत आहेत.

हेही वाचा: करमाळा शहर व तालुक्यात बंदला संमिश्र प्रतिसाद; दुपारी बारा नंतर सर्व व्यवहार सुरळीत

करमाळा तालुक्यातील कोर्टी ते आवाटी रस्त्याच्या कामासाठी 189 कोटी 59 लाख एवढा निधी मंजूर झाला आहे. तर आशियन डेव्हलपमेंट बॅक(एडीबी) या बॅंकेने अर्थसाहाय्य केले आहे. या रस्त्याच्या कामाला गेली एक वर्षापासून सुरूवात करण्यात आली. 50 किलोमीटर रस्ता ठेकेदाराने उकरून ठेवला आहे. सध्या काम कुठे सुरू कुठे बंद आहे. त्या रस्त्याचे वझंवाटुळ करून टाकले आहे. नवीन चांगला मोठा रस्ता होणार म्हणून लोकांच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र सध्या या रस्त्याचे काम पूर्णपणे बंद असून रस्त्यांची मोठी दुरावस्था झालेली आहे. एवढे सगळे झालेले असताना विशेष म्हणजे याकडे कुणी लक्ष देण्यास तयार नाही ही हास्यास्पद बाब असून या रस्त्यावरून प्रवास करणारे प्रवाशी "आरे या रस्त्याच्या कामाला कुणी वाली आहे की नाही?" असा प्रश्न विचारू लागले आहेत.

हेही वाचा: मायलेकीच्या खुनाने हादरला करमाळा तालुका! संशयित आरोपी पती फरार

कोर्टी-आवाटी या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाल्यानंतर कोर्टी पासून आवटी पर्यंत रस्ता खोदला आहे. वास्तविक पाहता या रस्त्यावरील वाहतुकी लक्षात घेता टप्प्याटप्प्याने ठराविक अंतरात रस्त्याचे खोदकाम करून रस्त्याचे काम करणे गरजेचे होते. ठेकेदाराने कोर्टी ते थेट आवाटी हा संपूर्ण रस्ता उखडून ठेवलेला आहे. रस्त्याच्या एका बाजूला खोदकाम करून काम करून काही ठिकाणी मुरमीकरण सुरू आहे, तर काही ठिकाणी खडीकरण करण्यात आले आहे. या रस्त्याच्या कामाच्या दर्जाचा प्रश्न तर नंतर उपस्थित होईल. मात्र सद्य परिस्थितीत ज्या पध्दतीने हे रस्त्याची दुरावस्था झाली आहे, याकडे ना अधिकारी लक्ष द्यायला तयार आहे ना ठेकेदार. याबाबत बाजार समितीचे संचालक आनंदकुमार ढेरे यांनी तक्रार केली आहे.

हेही वाचा: अखेर भोंदू मनोहरमामा करमाळा पोलिसांच्या ताब्यात!

सध्या साखर कारखाने सुरू झाल्याने या रस्त्यावरून तालुक्यातील अनेक गावांतून ऊस वाहतूक केली जात आहे. करमाळ्याच्या पुर्व भागातील साडे, सालसे, मिरगव्हाण, करंजे सह अनेक गावातून ऊस बारामती अॅग्रो, अंबालिका शुगर, भैरवनाथ शुगर कमलाभवानी साखर कारखाना ऊस वाहतूक या रस्त्यावरून केली जात आहे. मकाई सहकारी साखर कारखान्याचीही मोळी टाकली आहे. लवकरच त्यांच्या वाहनांची आणखीन यात भर पडेल. ऊस वाहतूक करत असताना ट्रॅक्टर व ट्रकचालकांना मोठी कसरत करावी लागत आहेत असे असूनदेखील या रस्त्यावर दररोज दोन ते तीन उसाचे ट्रॅक्टर पलटी झालेले दिसून येतात. ट्रॅक्टर खराब रस्त्यावरून बाहेर काढण्यासाठी जागोजागी ट्रॅक्टर चालकांनी चाकाला लावलेली दगड तसेच रस्त्यावर पडलेले असल्याने आणखीनच अपघाताची शक्यता वाढली आहेत.

हेही वाचा: सचिव निवडीवरून करमाळा बाजार समिती पुन्हा एकदा चर्चेत!

अनेकांचे हितसंबंध गुंतल्याने यावर कुणीच बोलायला तयार नाही. कोर्टी-आवटी रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर या रस्त्यावर सर्व गटातटाच्या कार्यकर्त्यांचे हितसंबंध गुंतले आहेत. या रस्त्यावर सर्वांची तोंड गप्प करण्यासाठी ठेकेदारांनी चांगली शक्कल लढवत कोणाचा टिपर, कोणाचा जेसीबी, कोणाचा ट्रॅक्टर कामाला लावला आहेत, तर कुणाच्या सांगण्यावरून कार्यकर्त्यांला या रस्त्याचे तोडून ठराविक किलोमीटरचे काम दिले आहे. त्यामुळे या ठेकेदाराला जाब विचारत नसल्याचीही चर्चा आहे.

पाऊस पडत असल्याने कोर्टी आवटी रस्त्याचे काम थांबले होते. दोन दिवसांत डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात येत आहे. 

- के.एम.उबाळे, उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, करमाळा.

कोर्टी-आवाटी या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाच्या पध्दतीने सुरू आहे. ठेकेदारांनी जागोजागी रस्ता उकरून ठेवल्याने अनेक अडचणी येत आहेत. याबाबत बांधकाम विभागाकडे तक्रार केली. मात्र तात्पुरती रस्त्याची डागडुजी करण्याचा दिखावा करण्यात आला. सध्या रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे.

- संजय चोपडे, विहाळ, ता.करमाळा, जि.सोलापूर

loading image
go to top