esakal | कामगारांना दिलासा : निवारागृहे, भोजन व्यवस्थेसाठी 45 कोटी 
sakal

बोलून बातमी शोधा

2Labour_with_Family.jpg

ठळक बाबी... 

  • लॉकडाउनमुळे परराज्यातील अडकलेल्या व विस्थापीत कामगारांसाठी निधी मंजूर 
  • निवारागृहे, अन्नधान्य, भोजन व स्वच्छतागृहांची केली जाणार जागोजागी सोय 
  • नाशिक, नागपूर, अमरावती व औरंगाबाद विभागाला प्रत्येकी पाच कोटींची मदत 
  • कोकण विभागाला 15 कोटी तर पुणे विभागाला 10 कोटींचा निधी 
  • मुख्य सचिव अजोय मेहता यांनी घेतली आपत्ती व्यवस्थापनच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक 

कामगारांना दिलासा : निवारागृहे, भोजन व्यवस्थेसाठी 45 कोटी 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : देशभरातील लॉकडाउनमुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये परराज्यातील व परजिल्ह्यातील मजूर अडकून पडले आहेत. त्यांच्या राहण्याची, जेवणाची अद्याप सोय करण्यात आलेली नव्हती. या पार्श्‍वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सोमवारी (ता. 30) आपत्ती व्यवस्थापन समितीच्या राज्य कार्यकारणीची बैठक घेतली. त्यामध्ये या कामगारांसाठी 45 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. 

हेही नक्‍की वाचा : एमपीएससीसह विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर 


कोरोनाच्या वैश्‍विक संकटाला हद्दपार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्चला देशभर लॉकडाउनची घोषणा केली. प्रारंभी 31 मार्चपर्यंत लॉकडाउन असल्याचे स्पष्ट केले मात्र, त्यात बदल करुन 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउन असल्याचे जाहीर केले. कोरोना या विषाणूच्या संक्रमणाची साखळी खंडीत करण्याच्या हेतूने गर्दी होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. पोलिसांकडून नागरिकांवर नियंत्रण मिळविले जात आहे. बहूतांश नागरिक घरातच लॉकडाउन झाले आहेत, परंतु कामानिमित्त परजिल्ह्यात तथा परराज्यात गेलेले कामगार जागेवरच अडकून पडले आहेत. त्यांना राहण्याची व जेवणाची सोय नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्‍वभूमीवर अशा कामगारांसाठी राज्य सरकारने 45 कोटींची मदत जाहीर केली आहे. त्यातून त्यांच्यासाठी निवारागृहे उभारली जाणार असून त्याठिकाणी अन्नधान्य दिले जाणार असून काहींना भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच तात्पुरत्या स्वरुपात स्वच्छतागृहेही उभारली जाणार आहेत. 

हेही नक्‍की वाचा : गूड न्यूज ! यवतमाळचे तिन्ही रुग्ण : सोलापूरच्या डॉक्‍टरचे यश 


विभागनिहाय मिळालेला निधी 
कोकण : 15 कोटी 
पुणे : 10 कोटी 
नाशिक : 5 कोटी 
नागपूर : 5 कोटी 
अमरावती : 5 कोटी 
औरंगाबाद : 5 कोटी 


जिल्हाधिकाऱ्यांमार्फत होणार निधी खर्च 
आपत्ती व्यवस्थापनाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेला 45 कोटींचा निधी तत्काळ संबंधित विभागांना वितरीत करण्यात आला आहे. आता कोणत्या जिल्ह्यात किती विस्थापीत व परराज्यातील मजूर आहेत, त्यानुसार त्यांच्यासाठी निवारागृहे उभारली जाणार आहेत. राज्य सरकारने दिलेला निधी खर्चाची जबाबदारी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांवर असणार आहे. 

loading image