esakal | लसीकरणात "सांगोला पॅटर्न' ठरतोय यशस्वी ! दहा दिवसांत 33 हजार टेस्टही
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

लसीकरणात "सांगोला पॅटर्न' ठरतोय यशस्वी! दहा दिवसांत 33 हजार टेस्टही

sakal_logo
By
दत्तात्रय खंडागळे

मागील दहा दिवसांत तालुक्‍यात तब्बल 33 हजार कोविड टेस्ट करण्यात आल्या असल्याची माहिती गटविकास अधिकारी संतोष राऊत यांनी दिली.

सांगोला (सोलापूर) : कोविडची (Covid-19) रुग्णसंख्या राज्यात व सोलापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस कमी होत असली तरी कोविडचा धोका पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे तालुक्‍यात कोविडचा धोका कमी करायचा असेल तर कोविडच्या टेस्ट कमी करून चालणार नाही, याचा विचार करून सांगोला (Sangola) तालुक्‍यात सुरू केलेला कोविड टेस्टिंगचा "सांगोला पॅटर्न' (Sangola Pattern) पुन्हा एकदा यशस्वी होताना दिसत आहे. मागील दहा दिवसांत तालुक्‍यात तब्बल 33 हजार कोविड टेस्ट (Covid Test) करण्यात आल्या असल्याची माहिती गटविकास अधिकारी संतोष राऊत (Group Development Officer Santosh Raut) यांनी दिली. (Sangola pattern is succeeding in Corona vaccination and Corona testing)

हेही वाचा: चर्चेला उधाण ! बागल गटाच्या नगरसेवकांकडून जगतापांचे कौतुक

28 जून रोजी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Collector Milind Shambharkar) व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (Zilla Parishad Chief Executive Officer Dilip Swamy) यांनी जिल्ह्यात कोविड टेस्टचे प्रमाण कमी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना सर्व तालुकास्तरीय यंत्रणांना दिल्या. त्यानंतर गटविकास अधिकारी संतोष राऊत यांनी आरोग्य विभागाचे सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेऊन प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रनिहाय कोविड टेस्ट करण्याचे उद्दिष्ट ठरवून दिले. या उद्दिष्टानुसार दररोज टेस्ट होतात किंवा कसे याबाबत सर्व आरोग्य यंत्रणांचा आढावा दररोज संध्याकाळी पाच वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आला. तसेच गावातील कोणत्या नागरिकांच्या टेस्ट करायच्या, याविषयी सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे 28 जूनपासून तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात टेस्ट झाल्याचे दिसून येते. मागील दहा दिवसांत एकूण 32 हजार 63 रॅपिड टेस्ट व एक हजार 340 आरटीपीसीआर टेस्ट अशा 33 हजार 403 कोविड टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 449 नागरिक पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त दिसत असली तरी एकूण टेस्टच्या प्रमाणात हे प्रमाण दीड टक्केपेक्षाही कमी असल्याचे दिसून येते.

हेही वाचा: सर्वच कंपन्यांचे मोबाईल नेटवर्क गायब ! कॉल ड्रॉपमुळे ग्राहक हैराण

ग्रामपंचायत व शिक्षण विभागाचे सहकार्य

सदर टेस्टिंग करणे, पॉझिटिव्ह रुग्णांचे कॉन्टॅक्‍ट ट्रेंसिंग करणे, तसेच सर्व टेस्टिंगचा डेटा ऑनलाइन भरणे यासाठी ग्रामसेवक, ग्रामपंचायतच्या आपले सरकार सेवा केंद्राचे केंद्रचालक तसेच प्राथमिक शिक्षक यांनी आरोग्य विभागास अनमोल असे सहकार्य केले. 40 प्राथमिक शिक्षक व 62 ग्रामपंचायत ऑपरेटर असे एकूण 102 कर्मचारी मागील 10 दिवस ऑनलाइन डेटा एंट्रीचे काम करत आहेत. या काळात त्यांनी 40 हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा डेटा ऑनलाइन पोर्टलवर भरला आहे. या कामाचे तालुक्‍यातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

लसीकरणाचा सुद्धा सांगोला पॅटर्न

कोविड लसीकरण (Covid Vaccination) सुरू झाल्यानंतर सुरवातीला इतर ठिकाणांप्रमाणेच सांगोला तालुक्‍यात सुद्धा गोंधळ झाल्याचे दिसून आले. लसीकरण केंद्राच्या बाहेर नागरिकांची होणारी प्रचंड गर्दी, लस मिळण्यासाठी होणारे वाद यामुळे पोलिस बंदोबस्त घेतल्याशिवाय लसीकरणाचे काम होत नव्हते. यासाठी सर्व ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामसेवक, ऑपरेटर, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन त्यांच्यामार्फत प्रत्येक गावातील 45 वर्षांवरील सर्व नागरिकांच्या याद्या तयार करून घेतल्या. सदर याद्या नागरिकांच्या वयाच्या उतरत्या क्रमाने तयार केल्या. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रनिहाय सदर याद्या एकत्रित केल्या व त्या ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आल्या. सदर याद्यांच्या अनुक्रमांकाप्रमाणेच नागरिकांचे लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या. लसीकरणासाठी नंबर आलेल्या नागरिकांना एक दिवस अगोदर कळवून त्यांना लसीकरण करून घेण्याची सूचना देण्यात येते. त्यामुळे ज्या नागरिकांचा नंबर लसीकरणासाठी आला आहे, तेच नागरिक केंद्रावर जाऊन लस घेऊ लागले. त्यामुळे लसीकरण केंद्रावर होणारी अनावश्‍यक गर्दी कमी झाली आहे.

हेही वाचा: खरीप हंगामाच्या पीक विम्याची मुदत 15 जुलैपर्यंत !

कोविडचा प्रसार कमी करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या ट्रेसिंग, टेस्टिंग व ट्रिटमेंट या त्रिसूत्रीनुसार आम्ही काम करत असून कोविड टेस्ट मोठ्या प्रमाणात केल्याने पॉझिटिव्ह व्यक्ती लवकर समजतील व कोविडचा प्रसार कमी होण्यास नक्कीच मदत होईल. सर्व पदाधिकारी, सांगोल्याचे नागरिक यांनी याबाबत प्रशासनास अत्यंत चांगले सहकार्य केले आहे. आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले तर नक्कीच कोविडचा यशस्वीपणे मुकाबला करू शकतो

- संतोष राऊत, गटविकास अधिकारी, सांगोला

कोरोनाच्या संकटातून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी शासन स्तरावरून सर्व आवश्‍यक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी आवश्‍यक सर्व सोयीसुविधा पुरवण्यासाठी आम्ही नेहमीच पाठपुरावा करत आहोत. सांगोला तालुक्‍यात कोरोनाचा प्रसार नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासन करत असलेले प्रयत्न अभिनंदनीय आहेत. नागरिकांनी कोविड नियंत्रणासाठी सहकार्य करावे, आपले व आपल्या कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी आवश्‍यक खबरदारी घ्यावी

- शहाजी पाटील, आमदार, सांगोला

loading image