
महापालिकेचा अजब कारभार ! बॅरिकेडिंग साहित्याची किंमत 20 लाख, पण खर्च झाला दोन कोटी
सोलापूर : शहरात कोरोनाचे आगमन झाल्यानंतर ज्या भागात रुग्ण आढळतील, तो परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून महापालिकेच्या माध्यमातून बॅरिकेडिंग केले जात होते. त्यावर महापालिकेने आतापर्यंत तब्बल दोन कोटी 13 लाखांचा खर्च केला. त्यासाठी खर्च मोठा होत असल्याने महापालिकेने काही दिवसांपूर्वी वासे (लाकडी बांबू), पत्रे खरेदी केले. त्यासाठी अवघे 19 लाख रुपये खर्च झाले, हे विशेष !
कोरोना काळात अत्यावश्यक साहित्य खरेदीसाठी महापालिका प्रशासनाला निधी खर्च करण्याचा अधिकार शासनाने दिला. शासन निर्णयाचा धागा पकडत सोलापूर महापालिका प्रशासनाने कोरोना काळात (एक वर्ष) 14 कोटी 23 लाखांचे साहित्य खरेदी केले आहे. त्यात मास्क, सॅनिटायझर, सोडियम क्लोराईड खरेदी व फवारणी, ऑक्सिमीटर, थर्मामीटर, हॅंडग्लोव्ह्ज, अँटिजेन टेस्ट किट, बॅरिकेडिंग व त्याचे साहित्य, कोव्हिड केअर सेंटरमधील रुग्णांसाठी जेवण अशा विविध खर्चाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, त्यात एकाही वस्तूची किंमत एकसारखी नाही. मास्क, सॅनिटायझरसह अन्य वस्तूंच्या किमती कमी-अधिक दाखविण्यात आल्या आहेत. तत्पूर्वी, सत्ताधारी व विरोधकांनीही या खर्चात अनियमितता झाल्याचा आरोप केला असून, त्या खर्चाची चौकशी करण्याचीही मागणी केली आहे. तर बॅरिकेडिंगचे साहित्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने- आण करणे, बॅरिकेडिंग करण्यासाठी मजुरी (प्रत्येक फुटासाठी 129 रुपये) यावर मोठा खर्च झाल्याचे अधिकारी सांगत आहेत.
हेही वाचा: पालकमंत्री खोटे बोलले? "उजनी'तूनच द्यावे लागणार इंदापूरला पाच टीएमसी पाणी
आतापर्यंतचा ठळक खर्च
मास्क : 1.02 कोटी
सॅनिटायझर : 9.19 लाख
थर्मा-ऑक्सिमीटर : 63 लाख
हॅंडग्लोव्ह्ज : 7 लाख
फवारणीसाठी खर्च : 33.29 लाख
बॅरिकेडिंग : 2.09 कोटी
साहित्याच्या दहापट खर्च भाड्यावरच
शहरातील हाउसिंग सोसायटी, बंग्लोज तथा झोपडपट्टी व नगरांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्यास त्या ठिकाणी महापालिका पोलिसांच्या माध्यमातून लाकडी बांबू व पत्रे लावते; जेणेकरून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरातील लोक बाहेर येणार नाहीत अथवा त्यांच्याकडे कोणी जाणार नाही हा त्यामागे हेतू होता. मात्र, महापालिकेने बॅरिकेडिंग करण्यासाठी दोन कोटींचे भाडे संबंधित मक्तेदाराला दिले. त्यानंतर काही नगरसेवकांनी विरोध केल्यानंतर महापालिकेने बॅरिकेडिंगचे साहित्य स्वत:च खरेदी केले. त्यासाठी अवघा 19 ते 20 लाखांचा खर्च झाला आहे.
हेही वाचा: "चुलते गेल्यानंतर आमच्या कुटुंबीयांनी घेतला कोरोनाचा अनुभव ! वेळीच उपचार हाच रामबाण उपाय'
"आरोग्य'कडून काढून घेतले खरेदीचे अधिकार
आरोग्य विभागाचे मध्यवर्ती औषध भांडार असून त्याद्वारे महापालिकेचे दवाखाने व नागरी आरोग्य केंद्रांसाठी लागणारी औषधे व साहित्याची खरेदी आणि वितरण होते. दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाकडे स्वतंत्र भांडार असून त्यातूनही प्रशासकीय कामकाजाचे साहित्य खरेदी होते. या दोन्ही भांडारांचे काम स्वतंत्रपणे चालत होते. मात्र, दोन्ही भांडारांची खरेदी व वितरण व्यवस्था सारखीच असल्याने एकसूत्रतेचे कारण पुढे करून आयुक्त पी. शिवशंकर यांनी त्याची जबाबदारी सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार यांच्याकडे सोपविली आहे. तर त्यावर नियंत्रण अधिकारी म्हणून उपायुक्त जमीर लेंगरेकर यांची नियुक्ती केली आहे. मात्र, आरोग्य विभाग आणि प्रशासकीय कामकाजाच्या साहित्यात मोठा फरक असतानाही आयुक्तांनी हा निर्णय का घेतला, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
आता खर्चात बचत होऊ लागली
बॅरिकेडिंगसाठी कोरोनाच्या सुरवातीला महापालिकेकडे स्वत:चे साहित्य नसल्याने मक्तेदार नियुक्त करून खर्च करण्यात आला. परंतु, त्यासाठी मोठी रक्कम खर्च होत असल्याने माझ्याकडे जबाबदारी आल्यानंतर स्वत:चे साहित्य खरेदी केल्याने आता खर्चात बचत होऊ लागली आहे.
- शिरीष धनवे, वित्त व लेखा अधिकारी, सोलापूर महापालिका
Web Title: Strange Work Is Seen In The Procurement Of Materials Of Solapur Municipal
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..