esakal | Solapur : पंढरपुरात महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद
sakal

बोलून बातमी शोधा

पंढरपुरात महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद

पंढरपुरातील अनेक भागातील दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून बंदला पाठिंबा दिला.

पंढरपुरात महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद

sakal_logo
By
- भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर): लखीमपूर दुर्घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला आज पंढरपुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. पंढरपुरातील अनेक भागातील दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून बंदला पाठिंबा दिला. तर मंदिर परिसरातील दुकाने मात्र सुरळीत सुरू होती. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पंढरपूर शहर बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील स्टेशन रोड, नवी पेठ, गांधी रोड, भाजी बाजार, सावरकर चौक, नवीन बस स्थानक या भागातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध केला.

हेही वाचा: ‘महाराष्ट्र बंद’मुळे एसटी महामंडळ सतर्क

दरम्यान सकाळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येत शहरातील विविध भागातून फेरी काढून बंदचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनीही बंदमध्ये सहभाग घेतला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करत आंदोलन केले. शिवसेनेचे पंढरपूर विभागाचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांनी सरकार विरोधात आसूड ओढून या घटनेचा निषेध नोंदवला.

हेही वाचा: 'महाराष्ट्र बंद'ला भाजपचा विरोध; जबरदस्तीनं दुकानं बंद केल्यास...

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर भोसले, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष संदीप मांडवे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा अनिता पवार, पंढरपूर तालुका अध्यक्ष विजयसिंह देशमुख, किसान सभेचे प्रदेश सरचिटणीस मारुती जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष स्वप्नील जगताप, युवती जिल्हाध्यक्ष श्रेया भोसले, संजय घोडके, सुभाष बागल, काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष राजेंद्र उराडे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. बंद काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

ग्रामीण भागात ही बंदला प्रतिसाद

पंढरपूर तालुक्याच्या ग्रामीण भागात ही अनेक ठिकाणी शेतकरी व व्यापाऱ्यांनी एकत्र येत या घटनेचा निषेध नोंदवला. भाळवणी येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्याध्यक्षा राजश्री ताड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. तर गादेगाव येथे या घटनेचा निषेध म्हणून गावकऱ्यांनी बंद पाळला. याशिवाय उपरी, भंडीशेगाव, वाखरी, सुस्ते, सरकोली, गोपाळपुर, आंबे, याठिकाणीही शेतकऱ्यांनी या घटनेच्या विरोधात आंदोलन करून बंद पाळला.

loading image
go to top