
युवकांनी सोडवला माकडांच्या अन्नपाण्याचा प्रश्न ! विविध स्तरांतून सुरू मदतीचा ओघ
माळीनगर (सोलापूर) : लॉकडाउनमुळे (Lockdown) गरीब, असहाय्य व बेघर लोकांची उपासमार घडत आहे. दानशूर व सेवाभावी संस्थांतर्फे या लोकांची भूक शमवली जात आहे. मात्र मुक्या प्राण्यांचं काय? महाळुंग येथील माकडांची (Monkeys) उपासमार होत होती. त्यांची होणारी उपासमार गट नंबर दोन येथील युवकांना पाहवलं नाही. त्यांनी त्याबाबत सोशल मीडियावर (Social Media) एक पोस्ट व्हायरल करून मदतीचे आवाहन करत माकडांच्या अन्न-पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून त्यामुळे माकडांसाठी सर्व स्तरातून खाद्यपदार्थांचा ओघ सुरू झाला आहे. परिणामी माकडांच्या अन्न-पाण्याची समस्या सुटली आहे. (The youth solved the problem of food and water for the monkeys in Mahalung)
हेही वाचा: तब्बल 19 महिन्यांनंतर शिवसेना संपर्कप्रमुख आमदार सावंत ऍक्टिव्ह !
महाळुंग येथील यमाईदेवी मंदिराच्या परिसरात 400 ते 500 माकडे आहेत. सध्या लॉकडाउन सुरू असल्याने तेथील दुकाने, बाजार, मंदिर व गाव बंद आहे. मंदिर बंद असल्याने भाविकांची तेथील वर्दळ पूर्णपणे थंडावली आहे. त्यामुळे तेथील माकडे अन्न-पाण्यासाठी वणवण भटकत होती. ही बाब गट नंबर दोन येथील युवक रामचंद्र धंगेकर यांच्या निदर्शनास आली. त्यांनी गावातील हरी साबळे, विशाल शिंदे, अनिल कांबळे या मित्रांना सोबत घेऊन आसपासच्या परिसरात मदतीचे आवाहन केले.
हेही वाचा: शहर-जिल्ह्यात कोरोना मृत्यूचे थैमान सुरूच ! मंगळवारी 60 बळी; 2703 जणांना डिस्चार्ज
शेतकऱ्यांनी पाण्याअभावी सोडून दिलेले केळी, काकडी, टोमॅटो, कोबी गोळा करून माकडांची भूक भागविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती सर्वत्र पसरली. माकडांची उपासमार होऊ नये यासाठी सोलापूर, कोल्हापूर, सातारा, पुणे भागातून देखील दानशूर मदत पाठवू लागले आहेत. सोशल मीडियामुळे पाच हजार रुपयांची रोख स्वरूपात मदत माकडांसाठी मिळाली आहे.
अनेकजण अन्नपदार्थ, फळे, भाजीपाला, बिस्किटे मदत म्हणून देत आहेत. महाळुंग गावातील संजयकुमार घोंगाणे, अभिजित मुंडफणे यांनी माकडांसाठी आलेले अन्नपदार्थ ठेवण्यासाठी तेथे एक गाळा उपलब्ध करून दिला आहे. गट नंबर दोन येथील युवक दररोज चार किलोमीटर अंतरावर असलेल्या महाळुंगला जाऊन माकडांच्या अन्नपाण्याची व्यवस्था पाहत आहेत. अकलूजच्या जैन बांधवांनी देखील माकडांसाठी अन्नपदार्थ पुरविले आहेत. लॉकडाउन असेपर्यंत एकाही माकडाचा अन्न-पाण्यावाचून भूकबळी जाऊ देणार नाही, असा निर्धार हरी साबळे, रामचंद्र धंगेकर व त्यांच्या मित्रांनी केला आहे. तसेच माकडांसाठी मदतीचे आवाहनही त्यांनी केले आहे.
Web Title: The Youth Solved The Problem Of Food And Water For The Monkeys In
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..