esakal | सावधान! महिला चोरट्यांकडून कपड्याच्या दुकानात डल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

सावधान! महिला चोरट्यांकडून कपड्याच्या दुकानात डल्ला

शहरात चोरींचे प्रमाण वाढले असून बंद घरांवर वॉच ठेवून घरफोडीचे प्रकार केले जात आहेत.

सावधान! महिला चोरट्यांकडून कपड्याच्या दुकानात डल्ला

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : वेळ सकाळी अकराची, सोरेगाव एसआरपीएफ कॅम्प परिसरातील प्रियंका नगरातील दुकान मालक घरातील सदस्याला दवाखान्यात घेऊन गेले. जाताना त्यांनी नियमित ग्राहक परत जावू नयेत म्हणून त्यांच्या लहान मुलाला दुकानात बसविले. हीच संधी साधून तीन महिला व एक वयस्कर पुरूष दुकानात शिरले. त्या पुरुषाने एका महिलेच्या मदतीने त्या मुलासमोर साडी धरत दर विचारायला सुरवात केली. त्याचेवळी दुकानातील महागड्या साड्या उर्वरित दोघांनी त्यांच्या अंगातील कपड्यात लपवून पोबारा केला.

हेही वाचा: परीक्षा न दिलेल्यांना पुन्हा मिळणार संधी! सोलापूर विद्यापीठ

शहरात चोरींचे प्रमाण वाढले असून बंद घरांवर वॉच ठेवून घरफोडीचे प्रकार केले जात आहेत. तत्पूर्वी, रिक्षातून प्रवास करताना सहप्रवासी बनून काही महिला चोरी करीत होत्या. पोलिसांनी वेळोवेळी त्यांना अटक करून चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळविला. मात्र, कोरोनामुळे खासगी वाहतुकीवर निर्बंध असल्याने त्या महिला चोरट्यांनी चोरीचा नवा फंडा अवलंबला आहे.

हेही वाचा: सोलापूर जिल्ह्याचा दहावी निकाल 99.27 टक्के

प्रियंका नगरातील (उध्दव नगर भाग-एक) लक्ष्मण तद्देवाडी यांच्या दुकानात मागील दोन दिवसांपूर्वी असाच प्रकार घडला. त्यांच्या मुलाला संशय आला, परंतु त्या महिलांनी त्याला काही समजायच्या आत तिथून पोबारा केला. काहीवेळाने त्या मुलाचे वडील दुकानात आल्यानंतर त्यांनी दुकानातील साड्या पाहिल्या. त्यावेळी 22 हजारांच्या महागड्या साड्या चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी विजापूर नाका पोलिस ठाणे गाठले आणि पोलिसांना संपूर्ण हकीकत सांगितली.

हेही वाचा: सोलापूर जिल्ह्यातील 199 शाळा मुख्याध्यापकांविनाच !

चोरीचा 'असा' आहे नवा फंडा

शहरातील कपड्यांच्या दुकानातील परिस्थितीचा अंदाज घेऊन महिला चोरटे महागडा ऐवज लंपास करीत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. कपड्याच्या दुकानात एकट्या व्यक्‍तीला पाहून तीन-चार महिला दुकानात शिरतात. काही कपडे काढून त्याचे दर विचारण्यात दुकानदाराला गुंतवून दुकानातील महागड्या वस्तू अंगातील सैल कपड्यात लपवतात. त्यानंतर दुकानातून बाहेर पडताना किरकोळ वस्तू खरेदी करतात अथवा पसंत नसल्याचे सांगून तिथून निघून जातात, असे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे दुकानात आलेल्या संशयितांवर दुकानदाराने बारकाईने लक्ष ठेवायला हवे. तसेच दुकानात लहान मुलाला अथवा शक्‍यतो एकट्या महिलेला बसवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा: तिसऱ्या लाटेच्या नियोजनात सोलापूर पुढे - सीईओ स्वामी

महिला चोरट्यांची गॅंग कपड्याच्या दुकानात जाऊन दुकानदारांचे लक्ष विचलित करून महागडा मुद्देमाल चोरून नेत आहेत. पोलिस ठाण्यांकडे फिर्याद दाखल झाल्यानंतर संबंधित चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.

- संजय साळुंखे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा, सोलापूर

loading image