rohit pawar
rohit pawar

दौरा रोहित पवारांचा, आठवण शरद पवारांची 

सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि सोलापूर जिल्हा यांच्यामध्ये पूर्वीपासूनच ऋणानुबंधाचे संबंध आहेत. सोलापूरला कोणत्याही मदतीची गरज असेल तेंव्हा शरद पवार सोलापूरचे हे नाते सातत्याने जपत आले आहेत. शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच सोलापूर जिल्ह्याचा दोन दिवसांचा व्यापक दौरा केला. या दौऱ्याला निमित्त जरी विधान परिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचे असले तरीही या दौऱ्याच्या माध्यमातून आमदार रोहित पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील नव्या-जुन्या कार्यकर्त्यांची मोट अधिक घट्ट केली आहे. 

राज्याच्या सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व कॉंग्रेसमधील सोलापूर शहर व जिल्ह्यातील नव्या-जुन्या कार्यकर्त्यांचा मेळ आमदार रोहित पवार यांनी या दौऱ्यात साधला आहे. शरद पवार ज्या - ज्या वेळी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतात. त्यावेळी सोलापूर जिल्ह्यातील सर्वच गटांना ज्या पद्धतीने सोबत घेऊन आखणी करतात, त्याचीच प्रचिती आमदार रोहित पवार यांच्या सोलापूर दौऱ्यातून आली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नव्या जुन्या कार्यकर्त्यांच्या आमदार रोहित पवार यांनी या दौऱ्यात आवर्जून घेतल्या आहेत. 

करमाळ्यातील माजी आमदार जयवंतराव जगताप व विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांच्या भेटीपासून सुरू झालेला आमदार रोहित पवार यांचा हा दौरा पंढरपूर तालुक्‍यातील भोसे येथील कै. राजूबापू पाटील यांचे चिरंजीव व सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष गणेश पाटील यांच्या निवासस्थानापर्यंत झाला. आमदार रोहित पवारांच्या दौऱ्यावेळी पंढरपूरचे आमदार कै. भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक असल्याने आमदार रोहित पवारांनी हा दौरा त्याच ठिकाणी थांबविला. त्यांच्या या दौऱ्यातील पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला आणि माळशिरस या तालुक्‍यातील नव्या-जुन्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी राहून गेल्या आहेत. 

"माझा पक्ष शरद पवार पक्ष" असे ठणकावून सांगणारे माजी मंत्री दिलीप सोपल यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला. त्या दिलीप सोपल यांचीही आवर्जून भेट आमदार रोहित पवार यांनी या दौऱ्यात घेतली. शरद पवार यांच्या एकेकाळच्या कट्टर समर्थक असलेल्या माजी आमदार प्रभाताई झाडबुके यांचीही भेट व त्यांच्या घरी भोजनाचा अस्वाद आमदार रोहित पवार यांनी घेतला. याच दौऱ्यात आमदार रोहित पवार यांनी बार्शीतील शिवसेनेचे नेते भाऊसाहेब आंधळकर आणि राष्ट्रवादीचे युवा नेते निरंजन भूमकर यांचीही भेट घेतली. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष बळीराम साठे, सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या निवासस्थानी व संस्थांमध्ये जाऊनही आमदार रोहित पवारांनी नव्या जुन्या कार्यकर्त्यांना वेळ दिला. 

सोलापूर शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्या घरी आमदार रोहित पवार यांनी भोजन घेतले मुक्काम मात्र राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष महेश गादेकर यांच्या हॉटेल सिटी पार्कमध्ये केला. काही दिवसांपूर्वी शरद पवार सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्या दौऱ्यात सोलापूर शहर राष्ट्रवादीतील जुन्या कार्यकर्त्यांना शरद पवार यांची भेट न झाल्याने ते कार्यकर्ते नाराज झाले होते. त्यांनी आपली नाराजी प्रसारमाध्यमांसमोरही व्यक्त केली होती. त्यांची काहीशी नाराजीही आमदार रोहित पवार यांनी या दौऱ्याच्या माध्यमातून दूर केली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे युवा नेते व जिल्हाप्रमुख गणेश वानकर, कॉंग्रेसचे युवा नेते व नगरसेवक विनोद भोसले यांच्यासह शिवसेना व कॉंग्रेसमधील युवा कार्यकर्त्यांच्याही भेटी गाठी आमदार रोहित पवार या दौऱ्यात घेतल्या आहेत. वेळेचे गणित हुकल्याने आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी रात्री अक्कलकोटचा नियोजित दौरा रद्द केला. शुक्रवारी सकाळी सकाळी त्यांनी स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटचा दौरा. या दौऱ्यात त्यांनी अक्कलकोटमधील राष्ट्रवादीचे जुने नेते दिलीप सिध्दे व अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेंजेयराजे भोसले यांच्यासह इतर महत्वाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर मोहोळमध्ये माजी आमदार राजन पाटील, युवा नेते विक्रांत पाटील, अजिंक्‍यराणा पाटील व मोहोळ तालुक्‍यातील इतर नव्या जुन्या कार्यकर्त्यांच्या आवर्जून भेटी घेतल्या. त्यांच्या या सोलापूर दौऱ्यातून जिल्ह्याला सहाजिकच शरद पवार यांची दौऱ्याची प्रकर्षाने आठवण झाली. 

युवकांची प्रचंड झुंबड 
राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे नातू व राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार सोलापूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यासह महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील पदाधिकारी व सर्वसामान्य युवकांची मोठी झुंबड आमदार रोहित पवार यांच्या भेटीसाठी उडाली होती. आमदार रोहित पवार यांच्या सोबत आपलाही एक सेल्फी असावा यासाठी आमदार रोहित पवार ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी युवकांचा घोळका दिसत होता. आमदार रोहित पवार यांच्या बद्दल युवकांमध्ये असलेली क्रेझ या दौऱ्यात स्पष्टपणे जाणवली.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com