साखर विकली कारखान्याने, पैशावर दावा सांगितला बॅंकेने...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

- सीताराम महाराज कारखान्याची सुमारे 34 हजार 100 क्विंटल साखर विक्री विकली

- मुंबई येथील अभिषेक इंटरप्रायजेस या कंपनीने साखर खरेदी केली

- त्या पैशावर पुणे येथील युनियन बॅंकेने केला दावा

- यावर न्यायालयात 2 डिसेंबर रोजी निर्णय होण्याची शक्‍यता

पंढरपूर : एफआरपीची थकीत रक्कम वसुलीसाठी महसूल प्रशासनाने खर्डी (ता. पंढरपूर) येथील सीताराम महाराज साखर कारखान्याची सुमारे 34 हजार 100 क्विंटल साखर लिलाव करून विक्री केली आहे. दरम्यान, साखर विक्रीतून आलेल्या पैशावर पुणे येथील युनियन बॅंकेने दावा केला आहे. पैसे मिळावेत यासाठी या बॅंकेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर पहिली सुनावरणी 19 नोव्हेंबर रोजी झाली असूून आता अंतिम निर्णय 2 डिसेंबर रोजी होणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. 

हे ही वाचा... माढा मतदारसंघात राजकीय समिकरणे बदलली

भाजप नेते कल्याणराव काळे यांची मालकी असलेल्या खर्डी (ता. पंढरपूर) येथील सीताराम महाराज साखर कारखान्याला पंढरपूर, माळशिरस, मोहोळ या भागातील अनेक शेतकऱ्यांनी मागील हंगामात (2018-19) ऊसपुरवठा केला होता. कारखान्याला ऊसपुरवठा करून जवळपास एक वर्ष उलटून गेल्यानंतरही शेतकऱ्यांना आतापर्यंत एक दमडाही मिळाला नाही. एफआरपीची रक्कम मिळावी, अशी वारंवार मागणी शेतकऱ्यांनी केली होती. परंतु पैसे दिले गेले नाहीत. अखेर महसूल प्रशासनाने कायदेशीर मार्गाने कारखान्याची जवळपास 41 हजार क्विंटल साखर ताब्यात घेतली आहे. त्यापैकी 34 हजार 100 क्विंटल साखर 5 नोव्हेंबर रोजी लिलाव करून विक्री केली. मुंबई येथील अभिषेक इंटरप्रायजेस या कंपनीने साखर खरेदी केली आहे. त्यानुसार कंपनीने 10 कोटी 57 लाख रुपये महसूल प्रशासनाकडे जमा देखील केले आहेत. 

हे ही वाचा... पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरास केलेली रंगरंगोटी काढण्याला सुरूवात

या याचिकेवर 19 नोव्हेंबर रोजी न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकील ऍड. गोखले यांनी व शेतकऱ्यांच्या बाजूने ऍड. पांडे यांनी साखर विक्रीतून आलेल्या पैशावर शेतकऱ्यांचा पहिला हक्क असल्याचे न्यायालयासमोर म्हणणे मांडले आहे. यावर येत्या 2 डिसेंबर रोजी निर्णय होण्याची शक्‍यता आहे. न्यायालयाच्या निकालानंतरच हे पैसे शेतकऱ्यांना मिळणार की बॅंकेला जाणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

हे ही वाचा.... पुणे पदवीधरचे 25 हजार अर्ज नामंजूर

14 कोटी रुपयांची दुसरी नोटीस 
सीताराम महाराज साखर कारखान्याकडे थकीत असलेली एफआरपीची रक्कम वसूल करण्यासाठी महसूल प्रशासनाने पहिल्या टप्प्यात 10 कोटी 57 लाख रुपयांची नोटीस कारखान्याला दिली होती. कारखान्याने या नोटिसाला दाद न दिल्याने अखेर साखरेचा लिलाव करून रक्कम वसूल केली आहे. आणखी काही शेतकऱ्यांची थकीत रक्कम आहे. ती वसूल करण्यासाठी महसूल प्रशासनाने आणखी 14 कोटी रुपयांच्या वसुलीची नोटीस कारखाना व्यवस्थापनाला दिली आहे. 

साखरेचा लिलाव करणार

कारखान्याकडे शेतकऱ्यांच्या उसाची सुमारे 25 कोटी रुपयांची एफआरपीची रक्कम थकीत आहे. ती वसूल करून शेतकऱ्यांना देण्यासाठी महसूल प्रशासनाने कारखान्याकडील सुमारे 41 हजार क्विंटल साखर ताब्यात घेतली. यापैकी 34 हजार क्विंटल साखरेचा लिलाव करून ती विक्री केली. यातून 10 कोटी 57 लाख रुपये जमा झाले. आणखी 14 कोटी वसुलीसाठी कारखान्याला नोटीस दिली. मुदतीनंतर उर्वरित साखरेचा लिलाव करण्यात येईल. 
- वैशाली वाघमारे, तहसीलदार, पंढरपूर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sugar factory sells money, bank claims ...