यंदा तंबाखू उत्पादनात होणार वाढ? पोषक वातावरणामुळं कामांना वेग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यंदा तंबाखू उत्पादनात होणार वाढ? पोषक वातावरणामुळं कामांना वेग

येत्या चार दिवसात चांगला पाऊस झाल्यास तंबाखू पिकाला तो पोषक ठरणार आहे.

यंदा तंबाखू उत्पादनात होणार वाढ? पोषक वातावरणामुळं कामांना वेग

जत्राट : गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण, अधूनमधून पावसाच्या तुरळक सरी येत आहेत. त्यामुळे तंबाखू पिकातील आंतरमशागतीसह इतर कामांना वेग आला आहे. सध्या तंबाखू पिकांना पाणी देण्याची शेतकऱ्यांची घाई सुरु झाली आहे. या वातावरणात काही ठिकाणी पाऊस झाल्याने तंबाखू उत्पादक सुखावला आहे. येत्या चार दिवसात चांगला पाऊस झाल्यास तंबाखू पिकाला तो पोषक ठरणार आहे.

ढगाळ वातावरण असल्यामुळे मजूर सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत तंबाखू पिकात आंतरमशागतीसह खुडा, खुरपणीची कामे उरकत आहेत. तंबाखू पिकाच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने पिकाची जोमदार वाढ झाली आहे. अतिवृष्टी आणि महापुरामुळे यंदा सहा हजार एकरमध्ये तंबाखू लावण झाली आहे. गेल्या दोन वर्षात केवळ 3500 एकरमध्ये तंबाखू लावण झाली होती. योग्य दर मिळत नसल्याने गतवर्षी तंबाखू पिकाला बगल देऊन फळभाज्यांची पीके घेतली होती. मात्र यंदा महापूर, अतिवृष्टीने काही प्रमाणात या पिकांचे नुकसान झाल्याने तंबाखूची लागवड केली आहे.

हेही वाचा: '1993 ला बाळासाहेबांमुळे हिंदू जिवंत, त्यांचे वारसदार मात्र भूमिकाहिन'

गतवर्षी निपाणी बाजार पेढीवर तंबाखूचा तुटवडा असून व्यापाऱ्यांना केवळ सुरुवातीच्या काळातच तंबाखू चांगला दर दिला. त्यानंतर मागणी कमी असल्याचे दाखवत तंबाखूचे दर पाडले. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा कसरत करावी लागली. यंदा दर्जेदार तंबाखूचे पीक असल्याने उत्पादनात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या बाजारपेठेतील तंबाखू वखारी रिकाम्या झाल्याने चांगला दर देऊन तातडीने तंबाखू खरेदी होण्याची चिन्हे दिसत आहे. जानेवारीपासूनच खरेदीची शक्यता वर्तविली जात आहे.

"चार दिवसापासून तुरळक पाऊस व ढगाळ वातावरण असल्याने तंबाखू पिकाला हे वातावरण पोषक आहे. उन्हाचा तडाखा कमी असल्यामुळे खुडा, खुरपणीसह औषध फवारणीच्या कामाला चांगलीच गती आली आहे."

- विठ्ठल परीट, शेतकरी, नांगनूर

हेही वाचा: कोल्हापूर Breaking - इचलकरंजीत हनी ट्रॅपचा तिसरा बळी?

loading image
go to top