'ते' मुलीस फरशी पुसयाला लावत; फिर्यादीत सावकारांची नावे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

वडूज पोलिसांत चार खासगी सावकारांच्या विराेधात गुन्हा दाखल झाला आहे. सावकारांच्या भीतीपोटी वडिलांनी आत्महत्या केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिस निरीक्षक अशोक पाटील तपास करीत आहेत. 

वडूज (जि. सातारा) : खासगी सावकारांच्या तगाद्यास कंटाळून येथील पांडुरंग ऊर्फ दादासाहेब ज्ञानदेव यादव (वय 70) यांनी नुकतीच गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी त्यांच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून सतीशकुमार परशुराम चव्हाण, बाबासाहेब पवार (दोघेही रा. वडूज), संजय किसन जाधव, किरण नारायण लोहारा (दोघेही रा. पुसेसावळी) या चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
 
वडूज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार विजय यादव यांनी त्यांच्या वडिलांच्या बहिणीचे हक्कसोडपत्र करण्यासाठी 2015 साली संजय जाधव याच्याकडून 10 टक्के व्याजदराने चार लाख रुपये घेतले होते. त्या बदल्यात त्यांच्या वडिलांकडून कराड मर्चंट बॅंकेकडून चेक व गहाणखत करून घेतले होते. या रकमेपैकी त्यास दोन लाख रुपये दिले होते व दोन लाख 72 हजार रुपये चेकने दिले होते. हे चेक त्याने अकाउंटवर वटवून घेतले होते. तरीही तो तक्रारदारास व्याजाचे पैसे व मुद्दल दे म्हणून वारंवार पैशाची मागणी करत होता. त्याने तक्रारदार व वडिलांना दमदाटी करून पिस्तूल दाखवून जमिनीचा दस्त करून द्या, अशी दमदाटी केली होती. जमीन वडील व चुलत्यांच्या आणेवारीत असून त्या जमिनीचे वाटप 2017 ला झाले असून ती जमीन चुलते संजय यादव यांच्या वाटणीत गेली आहे. परंतु, सातबारामध्ये कंस नाही, असे विजय हे त्याला सांगत होते, तरीही संजय जाधवने दमदाटी करत तुझ्या मुलीचे अपहरण करू, अशी धमकी देऊन वडिलांकडून दस्त करून घेतला. या दस्तामध्ये 20 लाख 75 हजार अशी रक्कम दाखवली. परंतु, त्यातील एकही पैसा दिला नाही. या दस्ताच्यावेळी आपणास एक लाख 35 हजारांचा चेक दिला. परंतु, ही रक्कम त्याचा साथीदार किरण लोहारा याने बॅंकेत नेऊन माझ्याकडून जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर संजय जाधव याचे व्याजाचे पैसे देण्याकरिता किरण लोहारा याच्याकडून 40 हजार रुपये व्याजाने घेतले होते. या व्याजाच्या पैशापोटी किरण यास आपण वेळोवेळी 75 हजार रुपये दिले. तरीही तो आणखी पैशाची मागणी करू लागला. त्याने माझ्या भावाची चारचाकी (क्र. एमएच 02 ओएल 7362) दारातून नेली.
 
किरण याने व्याजाच्या पैशासाठी वेळोवेळी मारहाण केली. तसेच माझ्या आत्याचे हक्कसोडपत्र घेण्यासाठी किरण व संजय यांचे व्याजाचे पैसे देण्यासाठी सतीशकुमार चव्हाण याच्याकडून तीन लाख रुपये व्याजाने घेतले. या व्याजाच्या पैशापोटी सतीश यास चेक व रोख स्वरूपात पैसे देऊनसुद्धा त्याने अजून पैसे येणे असल्याचे म्हणत "तुझी जमीन माझ्या बहिणीस तारण व गहाणवट ठेवण्यास तयार करतो. तू तिच्याकडून पैसे घेऊन ते पैसे माझे मला दे,' असे म्हणाला. 2017 साली मला दमदाटी करून सतीश याने त्याची बहीण जयश्री मारुती गाडीवद्द हिचे व त्याच्या नावाने नोटरी करून घेतली. वारंवार पैशाची मागणी करून व दमदाटी करून 17-18 मध्ये पेडगाव रस्त्यावरील माझ्या घराची नोटरी करून घेतली. त्यानंतर त्याने व्याजाच्या पैशापोटी 2019 मध्ये वडूज येथील 9 गुंठे क्षेत्र जमिनीची नोटरी करून घेतली. मी त्यास तयार नसताना माझ्या आई, वडील, पत्नी व मुलांना दमदाटी व शिवीगाळ केली. पिस्तुलाचा धाक दाखवून माझ्याकडून नोटरी करून घेतली.
 
सतीश याने आपला मानसिक व शारीरिक छळ केला. दररोज सकाळी तो त्याची गाडी धुण्यासाठी, संडास-बाथरूम धुण्यासाठी मला व माझ्या कुटुंबास बोलवत होता. माझ्या सहा वर्षांच्या मुलीस घरातील फरशी पुसण्यास लावत होता. या सावकाराच्या भीतीपोटी वडिलांनी आत्महत्या केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिस निरीक्षक अशोक पाटील तपास करीत आहेत. 

हेही वाचा : मित्रानेच मित्राला नऊ लाखांना फसविले

जरुर वाचा : 'या' बहाद्दराने मागितली चक्क वडापावाची खंडणी

हेही वाचा : ...म्हणून वडिलांनी घातला मुलावर कुऱ्हाडीचा घाव

वाचा : आता साताऱ्यासाठी सचिन तेंडूलकर घेणार पुढाकार ?

हेही वाचा : इकडे मनसे जाेमात तिकडे राष्ट्रवादी काेमात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vaduz Police Registered Case Against Private Lenders