'या' अपक्षांचा कोणाला असेल कौल? 

अशोक मुरूमकर 
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

  •  करमाळा, बार्शी मतदारसंघात अपक्ष आमदार 

  • संजय शिंदेंना होता राष्ट्रवादीचा पाठिंबा 

  • राजेंद्र राऊत यांना शिवसेना, भाजपच्या युतीची उमेदवारी मिळाली नाही 

  • शिंदेंनी वाढवली होती फडणवीस यांच्याशी जवळीक 

सोलापूर : महिनाभरापासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा शनिवारी विधिमंडळात बहुमत सिद्ध करण्याने शेवट होणार आहे. मात्र, या बहुमत चाचणीत सोलापूर जिल्ह्यातील संजयमामा शिंदे व राजेंद्रभाऊ राऊत कोणाच्या पारड्यात मत टाकणार, याची उत्सुकता करमाळा व बार्शी मतदारसंघातील मतदारांना लागली आहे. 

हेही वाचा : उद्याच होणार "ठाकरे' सरकारची अग्निपरीक्षा... 

फडणवीस यांच्याशी जवळीक 
करमाळा विधानसभा मतदारसंघातून संजय शिंदे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यांना राष्ट्रवादीने जाहीर पाठिंबा दिला होता. निकालानंतर मात्र भाजप सरकार येईल आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील, या आशेने त्यांच्याशी जवळीक वाढवली होती. मात्र मध्यंतरी राजकीय नाट्यात ते कोठेही दिसले नव्हते. दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार येईल, अशी शक्‍यता निर्माण झाल्यानंतर आमदार शिंदे यांनी सावध पवित्रा घेऊन सोलापुरात पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली होती. बार्शी मतदारसंघात शिवसेना व भाजप महायुतीमध्ये शिवसेना वाट्याला आली अन्‌ शिवसेनेकडून दिलीप सोपल यांनी निवडणूक लढवली होती. तर उमेदवारी न मिळाल्याने राजेंद्र राऊत हे अपक्ष रिंगणात उतरले होते. त्यात ते विजयी झाले. भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून ते प्रयत्नात होते; मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. 

हेही वाचा : फडणवीस आक्रमक; पहिल्याच दिवशी ठाकरे सरकारवर बाण... 
लोकसभा राष्ट्रवादीकडून विधानसभेला अपक्ष 

शिंदे हे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादीला शेवटपर्यंत करमाळा मतदारसंघात सक्षम उमेदवार मिळाला नाही. शेवटच्या क्षणी संजय घाटणेकर यांना उमेदवारी दिली. परंतु प्रचाराची खरी रणधुमाळी सुरू होताच राष्ट्रवादीने संजयमामा शिंदे यांना पाठिंबा दिला. याची घोषणा अजित पवार यांनीच केली होती. त्यानंतर घाटणेकर हे देखील त्यांच्या प्रचार सभांमध्ये हजेरी लावली होती. 

हेही वाचा : शिवसेनेचा प्रवास : 1995 ते 2019

घाटणेकरांना संधी मिळणार का? 
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने करमाळा मतदारसंघात घाटणेकर यांना उमेदवारी दिली होती. मात्र ऐनवेळी शिंदे यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. आता महाराष्ट्रात कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. त्यामुळे घाटणेकर यांना राष्ट्रवादी कोणते पद देणार, हे पाहावे लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who is the opinion of these leaders