अध्यक्षपदाची लॉटरी कुणाला लागणार? 

संतोष सिरसट
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

- पहिल्यांदाच होणार "एससी'चा अध्यक्ष

- धाईंजे, सोनवणे, कांबळे, खरात, गायकवाड दावेदार 

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आहे. पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा मान अनुसूचित जातीच्या उमेदवाराला मिळणार आहे. जिल्ह्याचे राजकीय समीकरण पाहता सत्ता कुणाची येणार यावरच अध्यक्ष कोण होणार याची गणिते अवलंबून आहेत. अनुसूचित जातीचे पाच पुरुष व पाच महिला सदस्या जिल्हा परिषदेत आहेत. 

हेही वाचा : सुशिलकुमार शिंदेंनाही "का' वाटली काळजी

फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीवेळी तत्कालीन सदस्य संजय शिंदे हे अपक्ष असतानाही त्यांनी भाजपच्या मदतीने अध्यक्षपद मिळविले होते. पण, जिल्हा परिषदेतील सध्याची राजकीय स्थिती खूपच किचकट झाली आहे. कोण कोणत्या पक्षासोबत आहे हेच कळत नाही. त्यामुळे अध्यक्षपद कोणत्या पक्षाला मिळणार याबाबत संभ्रमावस्था आहे. माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख व भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भाजपचाच होणार असल्याचे यापूर्वीच सांगितले आहे. त्यामुळे अध्यक्ष नेमक्‍या कोणत्या पक्षाचा होणार हे आताच सांगणे घाईचे ठरणार आहे. 

हेही वाचा : इंदिरा गांधींनी महाराष्ट्रातील "या' शहरात केली कोकण रेल्वेसह चार मार्गाची घोषणा

जिल्हा परिषदेच्या 68 सदस्यांमध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले अनिरुद्ध कांबळे (करमाळा), राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेले शिवाजी सोनवणे (मोहोळ), अतुल खरात (पंढरपूर), त्रिभुवन धाईंजे (पण, आता मोहिते-पाटील समर्थक), कॉंग्रेसचे संजय गायकवाड (दक्षिण सोलापूर) हे पुरुषांमध्ये तर महिलांमध्ये भाजपच्या साक्षी सोरटे (माळशिरस), शेकाप-राष्ट्रवादी आघाडीच्या स्वाती कांबळे, संगीता धांडोरे (सांगोला), मंगळवेढ्यातील आवताडेंच्या जनहित आघाडीच्या विद्यमान समाजकल्याण सभापती शीला शिवशरण, कॉंग्रेसच्या रेखा गायकवाड (दक्षिण सोलापूर) हे अनुसूचित जातीच्या प्रवर्गातून जिल्हा परिषदेवर निवडून आले आहेत. या 10 जणांपैकीच एकाची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड होणार आहे. पण, त्यातील नेमका कोण? याबाबत संभ्रमावस्था कायम आहे. 

राष्ट्रवादी सर्वांत मोठा पक्ष 
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी हा सर्वांत मोठा पक्ष आहे. पण, अडीच वर्षांपूर्वी माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील समर्थकांना अध्यक्षपदापासून दूर ठेवण्यासाठी तत्कालीन अध्यक्ष संजय शिंदे हे भाजपच्या मदतीने अध्यक्ष झाले होते. पण, यावेळचे चित्र वेगळेच आहे. पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे असलेले माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने श्री. शिंदे समर्थक काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल 
राष्ट्रवादी कॉंग्रेस-23 (मोहिते-पाटील समर्थक सात), भाजप-14, कॉंग्रेस-7, शिवसेना-5, आमदार प्रशांत परिचारक यांची विकास आघाडी-3, अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांची भीमा आघाडी-3, मंगळवेढ्याच्या आवताडेंची जनहित आघाडी-3, सांगोल्यातील महायुती-2, सांगोल्यातील राष्ट्रवादी-शेकाप आघाडी-5 तर अपक्ष-3 असे जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who will win the zp presiden lottery?