नारायणआबानं साधली गेम..! 

Narayan Patil
Narayan Patil

सोलापूर : भर दुपारचा वकत... गणपा शेतातून धावत- पळत जेऊरच्या ग्रामपंचायतीत आला अन्‌ हातातला मोबाईल, डोस्क्‍यावरली टोपी सांभाळत आबांना नमस्कार ठोकला. आबालाही कळंना धापा टाकत आलेला गणपा पाहून नेमकं काय झालंय ते... गणपा हा जिल्हा परिषद सदस्य अनिरुद्धअण्णा कांबळे यांचा कट्टर समर्थक... आबांचाही कार्यकर्ता. पण थेट नव्हं व्हाया अण्णा कांबळे..! गेल्या कित्येक दिवसांपास्न अण्णाचं नाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत हुतं. परंतु बैठकांमध्ये ते "फायनल' व्हत नव्हतं. 

हेही वाचा- मंगळवेढा तालुक्‍यातील कॉंग्रेस का गेली कोमात 
पण तिकीट मिळालं नाही... 

नारायणआबांनी करमाळा तालुक्‍यात जिल्हा परिषदेच्या पाचपैकी शिवसेनेचे चार सदस्य निवडून आणले. पंचायत समितीवरही झेंडा फडकावला. जिल्ह्यात शिवसेनेचे फक्त पाचच सदस्य असताना आपला अध्यक्ष कसा हुईल.. असं आबांना वाटू लागलं व्हतं. अण्णाच्या अध्यक्षपदावर निवडीनंतरच सर्वांची चलबिचल थांबली. गणपाचं शिक्षण असं-तसंच. परंतु सोशल मीडियावर व्हॉट्‌सऍप का काय ते... त्यामधी तो लई पटाईत... अध्यक्षपदाचं आरक्षण निघाल्यापास्नं तो अण्णाला अध्यक्ष करायचंच म्हनूनशान आबांच्या पाठी लागला हुता... पण संख्याबळाचं गणित जमत नसल्यामुळं आबा बिचकत हुता... दोन पावलं माघार घेत हुता... आबांनी करमाळा तालुक्‍यात शिवसेनेचं तसं चांगलं काम उभं केलं हुतं. पण राजकारण लईच विचित्र... तानाजीसरांनी आबाचा पत्ताच कट केला तवापास्न आबा लईच बिथरलं हुतं... प्रयत्न तर शेवटपर्यंत केलं. पण तिकीट मिळालं नाही.. म्हणून आबानं बंडाचं निशाण फडकावलं... निवडणुकीत पडल्यानंतरबी अजूनही मी शिवसेनेतंच हाय... असं सगळ्यांना सांगू लागलं... मंत्रिमंडळातून तानाजीसराचं नाव कापलं अन्‌ सेनापतींनी त्यांना "जय महाराष्ट्र' म्हटल्यापास्नं आबाचं विमान पुन्हा आकाशात घिरट्याच घालू लागलं. आबाला सेनेतलं मोठं पद मिळण्यासाठी समर्थकांनी कंबर कसली. सत्ताधारी पक्षाचं बळ मिळणार म्हटल्यावर.. तेव्हापास्न आबाचं पाय जमिनीवरच नाय..! 

हेही वाचा- राष्ट्रवादी "येथे' गुंडाळला महाआघाडीचा फॉर्म्युला 
कुकवाचं केम पुन्हा चर्चेत
 
गणपाच्या कानावर उडत-उडत म्हंजे व्हॉट्‌स ऍपवर हे सारं येऊ लागलं, त्याचं सामान्यज्ञान लईच वाढू लागलं. तवापास्न त्यो सर्वांना आबाचं त्वांडभरून कौतुक सांगू लागला... त्याच्या मागं अण्णाला अध्यक्ष करण्याचं इंगित हाय... हे सगळ्यांच्या लक्षात येत हुतं. परंतु समविचारी आणि महाआघाडीचं ते कायबी ठरत नव्हतं. शिवसेनेला मोहिते-पाटील गट व भाजप पाठबळ देणार म्हटल्यावर गणपा लईच खुश झाला. थेट शेतातून जेऊर ग्रामपंचायत गाठून आबाला नमस्कार ठाकत आमच्या अण्णाला अध्यक्ष करा.. अशी विनंती करू लागला... कार्यकर्ताच तो ! अध्यक्षपदासाठी अण्णाचं नाव फायनल झाल्याचं कळल्यापास्न गणा प्रचंड खूष झाला. आता अण्णा अध्यक्ष झाला की कुकवाचं केम पुन्हा चर्चेत येणार असं त्यास्नी वाटू लागलं हुतं. 

हेही वाचा- उस्मानाबादच्या साहित्य संमेलनाला सोलापूरी साज 
बघू आता 

झालं एकदाचं... मोहिते-पाटील गटानं हीप म्हणतात ते काय ते सोडून थेट अण्णाची पाठराखण केली, आबासाठीच..! तानाजीसर यासाठीच मोहोळमध्ये बोललं हुतं. त्याचा पुनः प्रत्ययच आला... पण आबाबी लई हुशार गडी... निवडून आल्यावर आपला नेता मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं अण्णाला नेलं... आणि आम्ही जिल्ह्यात महाआघाडीत नसलो तर काय... राज्यात तुमच्या बरुबरच हाय... असं सांगून आपला हुकमी एक्का पुढं केला... जिल्ह्यातील काही नेत्यांना काय होऊ लागलंय हे कळलंच नाय... मग झालं की पक्कं ! बघू आता...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com